Next
स्टेम सेल्स तंत्र- जरा सावध राहा!
ममता आठल्ये
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story
गेल्या वीस वर्षांत केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगात ‘स्टेम सेल्स’वर आधारित उपचारपद्धती देणारी खाजगी हॉस्पिटल्स व दवाखाने यांचा सुळसुळाट झाला आहे. ‘स्टेम सेल पर्यटन’सुद्धा फोफावत चालले आहे. ते पाहता सर्व प्रकारच्या रोगनिवारणासाठी ही थेरपी म्हणजे जणू ‘जादूचा दिवा’ आहे, असे चित्र उभे केले जात आहे.
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूंवर सातत्याने चर्चा होत असते. स्टेम सेल्सचे तंत्रज्ञान तरी त्याला अपवाद कसे असणार? या थेरपीच्या वापरातील सत्य, गैरसमज आणि नियम समजून घेण्याची गरज आहे.
स्टेम सेल्स म्हणजे सजीव प्राण्यांच्या शरीरातील पेशी, ज्या वेगवेगळया प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरीत होऊ शकतात. तीन ते पाच दिवसांच्या गर्भातील अंतःस्तरातील पेशींपासून पूर्ण शरीराची निर्मिती होते. या प्रत्येक पेशीमध्ये स्वविभाजनाचा म्हणजेच पुन्हा वाढ होण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. म्हणूनच एखादा अवयव निकामी झाला, पंगू झाला किंवा खराब झाला तर त्या ठिकाणी सेल कल्चर तंत्राची मदत घेऊन या पेशी पुनरुज्जीवित करता येतात. नाळ आणि हाडांच्या आतल्या पोकळ बाजूला म्हणजे बोन मॅरोमध्ये या रक्तपेशी मोठ्या प्रमाणात असतात. अवयव निकामी होण्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये निदान होऊन ही थेरपी केली तर प्रत्यारोपण करण्याची गरज भासणार नाही, यादृष्टीने आता स्टेम सेल्स तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये संशोधन सुरू आहे. अंधत्व, बहिरेपणा, दातांचे विकार, मेंदूच्या व्याधी, अल्झायमर, सांधेदुखी, डायबेटिस अशा अनेक आजारांवर ही थेरपी कामी येईल, असा संशोधकांचा
दावा आहे.
स्टेम सेल्स दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे, गर्भातील स्टेम सेल्स, यांच्यात स्वतःला निरनिराळ्या प्रकारच्या सेल्समध्ये रूपांतरित करण्याची क्षमता असते. दोन, प्रौढ स्टेम सेल्स. या पूर्ण वाढ झालेल्या उतींमध्ये आढळून येतात उदाहरणार्थ त्वचा, मेंदू, अस्थिमज्जा. प्रयोगशाळेत त्यांच्यात जनुकीय बदल घडवून आणून गर्भातील स्टेम सेल्सप्रमाणे कार्य करण्याची क्षमता निर्माण केली जाते.
स्टेम सेल्स थेरपीमध्ये रुग्णाच्या शरीरातील पेशी त्याच्यासाठी वापरणे या प्रक्रियेला ‘ऑटोलॉगस’ पद्धती म्हणतात. इतरांच्या पेशी रुग्णाला देण्याच्या प्रक्रियेस ‘हिटरोलॉगस’ प्रक्रिया म्हणतात. शरीरातून मिळालेल्या पेशी पुन्हा शरीरामध्येच प्रक्रिया करून रुजवल्या जातात.
बाळाचा जन्म झाल्यावर वारेतील पेशी जतन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासंदर्भात अनेक प्रसूतिगृहांच्या माध्यमातून जाहिरातही केली जाते. २० हजार ते एक लाख आणि शिवाय वार्षिक फी अशी भरभक्कम रक्कम घेऊन ही वार जतन केली जाते. त्यासाठी विम्याचे गाजरही दाखवले जाते. पुढील २० वर्षांत मुलाला काही आजार झाला तर त्याच्याच पेशींनी तो बरा होऊ शकतो, असे सांगितले जाते. मात्र कॅन्सरसारख्या आजारात अशी एखादी संसर्गित पेशी शरीरामध्ये सुप्तावस्थेत असतेच, हे विसरता कामा नये. तसेच, आनुवंशिक विकृतींमध्येही ही उपचारपद्धती उपयोगी पडत नाही.
भारतात आणि जागतिक स्तरावर अस्थिमज्जा (बोन मॅरो) आणि मानवी नाळेतील रक्तपेशींचा वापर रक्ताचा कॅन्सर (ल्युकेमिया) आणि रक्ताशी संबंधित अन्य व्याधींच्या निवारणासाठी करणे, हेच फक्त कायद्याने अधिकृत मानले जाते. अस्थिमज्जा प्रत्यारोपणालाही मान्यता आहे. स्टेम सेल्सचा अन्य रोगनिवारणासाठी वापर किंवा शरीरातील इतर स्टेम सेल्सची उपयुक्तता हा विषय अजूनही संशोधनाच्या पातळीवरच आहे. स्टेम सेल्सवर आधारित अन्य उपचार पद्धतींची परिणामकारता व सुरक्षितता कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांद्वारे अजूनतरी सिद्ध झालेली नाही.
हे लक्षात घेऊन २०१७ साली भारत सरकारचा जैवतंत्रविभाग (डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्सचे संशोधन, वापर आणि उपयुक्तता या तिन्ही पातळ्यांवर राष्ट्रीय मार्गदर्शक नियमावली लागू करण्यात आली आहे.
हे संशोधन करणाऱ्या संस्थांना एक वेगळी ‘स्टेम सेल्स एथिकल कमिटी’ स्थापन करण्याची गरज आहे. त्यात संशोधनाच्या अंगाने निर्माण होणाऱ्या नैतिक प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागणार आहेत. फलन झालेल्या गर्भाशयापासून पेशी मिळवताना गर्भ नष्ट होण्याचा धोका टाळता येत नाही. मेंदूचे आजार बरे करताना इतरही काही व्याधी (ट्युमर किंवा कॅन्सर) निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जतन केलेल्या वारेतील रक्तपेशींचा नक्की उपयोग होईल, याची खात्री मात्र आज देता येत नाही.
आयसीएमआरने घालून दिलेल्या नव्या नियमावलीमध्ये या प्रत्येक मुद्दयाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो. २० ते २५ वर्षांनंतर हे तंत्रज्ञान गुरुकिल्ली ठरेल, असा दावा केला जातो, मात्र याला अद्याप कोणताही वैज्ञानिक आधार नाही. या थेरपीचा वापर करण्यापूर्वी त्याला कायदेशीर मान्यता असायला हवी. चुकीची वा दिशाभूल करणारी माहिती पेशी देणाऱ्या वा पेशी स्वीकारणाऱ्यास देता कामा नये.
२०१८ साली भारतात पहिल्यांदाच औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा व नियमांच्या अंतर्गत स्टेम सेल्स व त्यावर आधारित उपचारपद्धती अंतर्भूत करण्यात आली आहे. त्याअंतर्गत थेरपीच्या वापरासाठी वैद्यकीय चाचण्यांचा डेटा तसेच उत्पादन आणि विक्रीसाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे.
स्टेम सेल्सवर आधारित उपचारपद्धतींची कोणत्याही माध्यमाद्वारे जाहिरात आणि प्रसिद्धी करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबत मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि स्टेट मेडिकल काउन्सिलकडे तक्रार दाखल करता येते. ‘आस्की’कडेही (ASCI) तक्रार करता येते. ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज कायद्यात अवैध, अनैतिक व क्लीनिकली सिद्ध न झालेल्या स्टेम सेल्स उपचारपद्धतींचा अवलंब करणारी हॉस्पिटल्स आणि दवाखान्यांविरुद्ध कारवाईची तरतूद आहे. ‘मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया’ने एथिक्स समितीची स्थापना केली आहे. स्टेम सेल्सवर आधारित उपचारपद्धती घेण्यापूर्वी या सर्व गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link