Next
नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर
दिलीप नेर्लीकर
Monday, March 25 | 06:00 PM
15 0 0
Share this story

नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपण कसा गैरवापर करत आहोत आणि त्याचे आपल्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत हे आपण यापूर्वी पाहिलं. आपल्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या काही गोष्टी आपण आता समजून घेऊ. त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक तापमानवृद्धी. याचा आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतोय. पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट निसर्गानं इतकी तोलूनमापून बनवली आहे, की त्यात थोडा जरी बदल झाला तरी सृष्टीचं नैसर्गिक चक्रच बदलतं. ते निसर्गाला पटत नाही, मग तोही मनमानी करू लागतो. मग काय, चक्क उन्हाळ्यात थंडी, थंडीच्या दिवसांत कडक ऊन, पावसाळा सुरू व्हायला अनेकदा अनाकलनीय उशीर आणि पडला तर धोधो, नाहीतर काहीच नाही. मोठ्या प्रमाणावर विध्वंस करणारी वादळं, ज्वालामुखीचे उद्रेक, दूषित हवेमुळे आणि पाण्यामुळे पसरणारी जीवघेणी रोगराई इत्यादी आपल्याला आता सतावू लागले आहेतच.

या वातावरणातील बदलांचे, आयुष्य बदलून टाकणारे परिणाम ज्यांना आताच सतावू लागले आहेत आणि ज्यामुळे त्यांचं जीवनचक्रच बदलून गेलं आहे, अशी एक जमात आहे. उत्तर ध्रुवाच्या शेजारील प्रदेशात ग्रीनलंड, अलास्का आणि कॅनडाच्या उत्तरेकडील भागात राहणाऱ्या इन्यूट या जमातीला याचा फटका एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच बसायला सुरुवात झाली आहे. ही जमात ज्या भागात राहते तिथे बारमाही बर्फ पडतो. ही जमात आपलं अन्न म्हणून बर्फाच्या खाली आढळणारे मासे आणि तिथल्या इतर प्राण्यांच्या मांसावर अवलंबून असते. ते कडक थंडीच्या दिवसांत म्हणजे सूर्य दक्षिण गोलार्धात असतो तेव्हा सील, वालारस आणि व्हेल यांसारखे मासे मारून बर्फात पुरून ठेवतात. अशा प्रकारे ठेवलेलं अन्न ते मग पुरवून पुरवून खातात. ही जमात राहते तिथं म्हणजे आर्क्टिक खंडाच्या थोड्या दक्षिणेला पर्माफ्रोस्ट नावाचा बर्फवृष्टीमुळे तयार झालेला, बर्फाचा एक प्रकार आढळतो. त्यात बर्फाचे बारीक कण आणि वाळू यांचं मिश्रण असतं. हे पर्माफ्रोस्ट त्यांचं अन्न सुस्थितीत ठेवण्यासाठी वापरलं जातं. परंतु जागतिक तापमान हे अनेक कारणांनी हळूहळू वाढू लागल्यामुळे पर्माफ्रोस्ट वितळू लागलं आहे. त्यामुळे ही जमात आपलं अन्न सुरक्षित ठेवू शकत नाही. इतर कोणतंही अन्न त्यांनी आजवर खाल्लं नसल्यानं एक तर त्यांना दक्षिणेकडे स्थलांतर करून तिथं सर्व काही नव्यानं सुरू करावं लागणार आहे, नाहीतर उपासमारीला सामोरं जावं लागणार आहे. हा मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक धक्का ही जमात पचवू शकेल का, हा प्रश्न  समाजशास्त्रज्ञांच्या समोर आज उभा ठाकला आहे. आज इन्यूट जमातीसमोर जसा हा जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे तशाच प्रकाराच्या पण वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक शृंगापत्तींना लोकांना सामोरं जावं लागणार आहे, जर आपण जागतिक तापमानवाढ वेळीच रोखली नाही तर!

जागतिक तापमानवाढीमुळे आर्क्टिक आणि अंटार्क्टिक खंडावरील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. या वितळलेल्या बर्फामुळे समुद्राची पातळी वाढू लागली आहे. यामुळे समुद्रकाठावर वसाहत करून राहिलेल्या त्या खंडांवरील काही जमातींना आपली वसाहत पाण्याखाली जात असलेली असहाय्यपणे पाहायला लागतंय आणि याचा परिणाम म्हणून आपली घरंदारं सोडून स्थलांतरीतही व्हावं लागलंय. दक्षिण पॅसिफिक सागरात असणाऱ्या वनातू बेटांच्या मालिकेतील एक छोटं बेट तेग्गुआ. त्याच्या समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या आदिवासी लोकांना समुद्रापासून दूर हलवलं गेलं आहे. त्यांना तिथून हलवायला आणखी एक कारण म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या आक्रमणानं त्यांच्या भागातील गोड्या पाण्याचा स्रोत पूर्णपणे खाऱ्या पाण्याचा बनला आहे. यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी पावसाचं पाणी साठवून ठेवावयास सुरुवात केली, पण ते साठवलेलं पाणी त्यांना पुढे सहा महिन्यांहून अधिक काळ वापरावं लागायचं आणि तेही कमी पडायचं. पाण्यावाचून किती दिवस माणूस तग धरू शकतो हे आपण पाहिलंय. आठ एक दिवस म्हणजे खूप झालं पाण्यावाचून जिवंत राहायला. अशी वेळ आपल्यावर यायला नको आहे ना? तर मग द्या निसर्गाला साथ!

माणूस, वनस्पती आणि प्राणी यांच्यात जीव-प्रक्रिया व्यवस्थित सांभाळणारी एक यंत्रणा असते. याच यंत्रणेमुळे आपल्याला नेहमीच्या वेळेला भूक लागते, तहान लागते, झोप येते. या नेहमीच्या प्रक्रिया त्याच्या ठरलेल्यावेळी घडतात आणि सारं कसं ‘ऑल इज वेल’ चाललेलं असतं, पण यात काही बदल झाल्यास त्याचं एकूण गणितच बिघडतं. वनस्पतींवर, प्राण्यांवर आणि माणसांवर त्याचा परिणाम लगेच जाणवतो. या यंत्रणेला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात. विमानातून या खंडातून त्या खंडात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बदलाला नेहमी सामोरं जावं लागतं. मुंबईहून लंडनला जाणाऱ्या प्रवाशांना तिथली सवय होईपर्यंत संध्याकाळीच झोप येऊ लागते, याचप्रमाणे इतरही दिनक्रम बदलतात. याला जेट लॅग म्हणतात. तर अशाच प्रकारचं चक्र प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींतही असतं.

भूतलावरील सर्व प्राणिमात्रांच्या बायोलॉजिकल क्लॉकवर तापमानवाढीचा प्रभाव जाणवू लागला आहे. ध्रुवीय भागात आढळणाऱ्या पोलारबीअरसारखे प्राणी मुख्यत्वे करून बर्फाच्या खाली दडलेले मासे खाऊन जगतात. आज त्यांना त्यांचं अन्न त्यांच्या भागात लवकर मिळेनासे झालं आहं. त्यांना अन्नासाठी खूप पायपीट करावी लागते, त्यामुळे त्यांचं जीवनचक्रच बदलून गेलं आहे. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसू लागला आहे. ते पूर्वी जसे गुबगुबीत दिसायचे तसे दिसेनासे झाले आहेत. त्यातील काही तर खंगून मृत्युमुखी पडत आहेत. एका आकडेवारीनुसार त्यांची संख्या १७ टक्क्यांहून अधिक घटलेली आहे. हे असंच सुरू राहिलं, तर एक दिवस पोलारबीअर हा प्राणी आपल्याला फक्त चित्रातच पाहावा लागेल. भूतलावरून तो नामशेष होईल. जागतिक संवर्धन संघ (World Conservation Union) या संस्थेच्या अंदाजानुसार त्यांची संख्या आणखी ३० ते ३५ टक्क्यांनी येत्या पन्नास वर्षांत घटेल. हे सारं भयावह आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link