Next
केक-कलाकार
पल्लवी मुजुमदार
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story


‘चमचमणाऱ्या चांदण्या जैसी,
मोगरीवरल्या दवाजैसी,
स्पर्श झाला तर कणाकणाने
विरघळणाऱ्या आसवाजैसी’
अशी गंमत आहे साखरेची! या विरघळणाऱ्या साखरेच्या स्फटिकांना सांधून करामती करत जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणाऱ्या भारतीय आहेत अंजली तांबडे! ‘आयरिश शुगर क्राफ्ट शो’, ‘डब्लिन केक इंटरनॅशनल’, ‘बर्मिंगहॅम केक इंटरनॅशनल’ या अनुक्रमे लंडन आणि बर्मिंगहॅम येथील स्पर्धा एकाच वर्षी जिकंण्याचा विक्रम अंजली तांबडे यांनी केला.
जवळपास २५ वर्षांपासून सुरू असलेल्या केकच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातून जवळपास १५०० ते १६०० स्पर्धक सहभागी होत असतात. यात, अंजली तांबडे या ‘बेस्ट इन शो’ हा सर्वोच्च पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या. त्यापुढील वर्षी त्या, त्याच स्पर्धेच्या पहिल्या भारतीय परीक्षक ठरल्या. ‘मला खूप खूप आनंद वाटला की या जागतिक स्पर्धेत आपल्या भारताची मोहोर मी उमटवू शकले,’ खळखळून हसत अंजलीताई सांगतात.
मूळच्या मुंबईच्या असलेल्या अंजलीताई लग्नानंतर लंडन आणि मग आयर्लंड इथे गेल्या. मुंबईत फॅशन डिझायनिंग क्षेत्रातल्या प्रशिक्षक म्हणून काम करणारी ही मुंबईची कन्या दूरदेशात गेली. काही कालावधी गेल्यावर मग घर-मुले सांभाळून काही करता येईल का, असा शोध सुरू झाला. त्यातून गवसला ‘केक टॉपर्स’ तयार करण्याचा मार्ग! सोप्या भाषेत सांगायचे तर केकवर सजावट करण्याच्या या फार सुंदर पद्धती आहेत. कल्पकतेला भरपूर वाव असलेली अशी ही देखणी कला आहे. फुलपाखरे, फुले-पाने, आवडते कार्टून, आकर्षक चित्रे या बरोबरीने चक्क वधू आणि वर साकारलेले केकसुद्धा अंजलीताई तयार करतात. किंबहुना परदेशात मागणी असलेले ‘वेडिंग केक टॉपर्स’ ही त्यांची खासियत आहे. उत्तम दर्जाचे, दीर्घकाळ टिकणारे, देखणे, हाताने तयार केलेले त्यांचे ‘केक टॉपर्स’ नावाजले जातात. सुमारे अकरा वर्षांपूर्वी त्यांनी या कलेचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांनतर ‘ग्लोबल केक टॉपर्स’ या नावाने व्यवसाय सुरू केला. खरेदी केलेल्या कच्चा मालाची किंमत तरी वसूल व्हावी, एवढेच किमान उद्दिष्ट त्या बाळगून होत्या. अल्पावधीतच त्यांचे केक टॉपर्स लोकप्रिय झाले. अतिशय कल्पकतेने, एकाग्रपणे साकारलेले आणि मुख्य म्हणजे हाताने केलेल्या ‘केक टॉपर्स’ना चांगली मागणी येऊ लागली.
एका टप्प्यावर त्यांना वाटले की आपण आता स्पर्धेत उतरायचे. मग सुरुवातीला त्या जिथे वास्तव्याला होत्या, त्या देशाच्या ‘आयरिश शुगर क्राफ्ट शो’मध्ये त्यांनी भाग घेतला आणि विजयी झाल्या. त्यांच्या कौशल्याचं कौतुक केलं गेलं. त्यातून हुरूप वाढला आणि त्यांनी थेट केकच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला.
ही स्पर्धा जिंकताच आज त्या जगभरातल्या केक संदर्भात कार्यरत असलेल्या संस्थाना परिचित झाल्या आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. जगभरातल्या केक संदर्भातल्या विविध कंपन्या त्यांना उत्पादनाच्या जाहिरातीसाठी, केक / शुगर क्राफ्ट परीक्षणासाठी बोलावत असतात. लंडनमधल्या एका ‘टूल मेकिंग, कंपनीने जगभरातले वेगळे वीस शुगर क्राफ्ट आर्टिस्ट निवडले. त्यात अंजलीताईंचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या नावाने ‘शुगर फ्लॉवर्स’ तयार करण्याचा ‘फँटसी फ्लॉवर्स अँड मॉडेलिंग’ हा एक डिप्लोमा आखण्यात आला आहे. त्यांनी एक खास बिल्ला अंजलीताई यांना बहाल केला आहे. त्या बिल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, लंडनच्या राणीसाहेबांसाठी असा बिल्ला तयार करणाऱ्या कपंनीतर्फे राणीसाहेबांच्या परवानगीने हा विशेष बिल्ला तयार करण्यात येतो.
अशी साखरेत घोळलेली नेत्रसुखद, चवदार अशी अंजलीताईंची कला आहे. त्यांची वेबसाइट बघणे म्हणजे एक वेगळी माहिती, छान फोटोंची सफर ठरते. त्यामागे अपरिमित मेहनत, संयम, जागरूकता, नावीन्य, नेटकेपणा राखावे लागते. परदेशात आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांपासून लांब घर-मुले यांना सांभाळून रात्रीचा दिवस करत त्या काम करत असतात. त्यावेळी बऱ्याचदा तर त्यांचे पती हर्षद तांबडे हेही आपला IT चा व्याप सांभाळून त्यांच्याबरोबर बसून असतात. अंजलीताई म्हणतात, या गोष्टी आपल्या भारतीय गृहिणीचा हुरूप वाढवतात आणि त्यांना घरातून मिळणारे प्रोत्साहन फार मोलाचे वाटते. सप्टेंबर महिन्यात मुंबईत पार पडलेल्या केकच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून त्या आवर्जून मुंबईत आल्या होत्या. भारतीय गृहिणींनी आता हळूहळू या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी त्या कार्यशाळा, मार्गदर्शन करत असतात. भारतीय महिला हुशार आहेत पण बऱ्याचदा एकटीने प्रवास कसा करावा किंवा शुगर क्राफ्टची अपुरी साधने, आधुनिक साधनाविषयी अज्ञान यामुळे त्या संभ्रमात राहतात, त्यासाठी अंजलीताई कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करत असतात. भारतीय महिलांनी आपल्या कक्षा विस्तृत करायला हव्यात, मार्गदर्शन न बिचकता घ्यायला हवे, ऑनलाइन माहितीच्या महाजालात असलेली माहिती, स्पर्धांची नियमावली यांचे वाचन नीट करायला हवे, सामाजिक माध्यमाचा मार्केटिंसाठी वापर करत आपली कला अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचवायला हवी, असे त्या म्हणतात.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link