Next
उत्सव भारताचा, भारतीयांचा…
सुप्रिया देवस्थळी-कोलते
Thursday, August 15 | 07:00 PM
15 0 0
Share this story

प्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्यदिन हे आपल्या देशाचे महत्त्वाचे राष्ट्रीय सण आहेत. या दोन्ही दिवशी देशभर विविध कार्यक्रम होतात. महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी या निमित्तानं सत्यनारायणाच्या महापूजा केल्या जातात. नवी दिल्लीत हे दोन्ही दिवस शानदार पद्धतीनं साजरे होतात. स्वातंत्र्यदिन दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर साजरा होतो, तर प्रजासत्ताकदिन राष्ट्रपती भवनासमोरच्या प्रशस्त राजपथावर मोठ्या दिमाखात साजरा होतो. प्रजासत्ताकदिनाची परेडसुद्धा राजपथापासून लाल किल्ल्यापर्यंत जाते. महाराष्ट्रातल्या लोकांना वाचून आश्चर्य वाटेल, दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पतंग उडवले जातात. स्वातंत्र्यदिनाच्या आठ दिवस आधीपासून आकाशात अधूनमधून पतंग उडत असताना दिसतात. भारत देशाच्या स्वतंत्र वृत्तीचं प्रतीक म्हणून पतंग
उडवले जातात.
दिल्लीत आल्यावर आम्हालाही लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनसमारंभाची मोठी उत्सुकता लागून राहिली होती. मी सरकारी नोकरीत आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका मिळते. पहिल्या वर्षी ही निमंत्रणपत्रिका घेऊन आम्ही घरून निघालो. वाटेत ठिकठिकाणी पोलिस तपासणी होत होती. गाडीवरचा पास पाहून गाडी पुढे जायला देत होते. लाल किल्ल्याच्या आसपासचा परिसर अतिशय गर्दी, दाटीवाटी असणारा आहे. शिवाय गाड्या पार्क करण्याची व्यवस्थादेखील किल्ल्यापासून बऱ्यापैकी लांब असते. गाडी पार्क करून, सेक्युरिटी चेक होऊन आम्ही आमच्यासाठी असणाऱ्या जागेवर बसलो. समोर ऐतिहासिक लाल किल्ल्याची वास्तू होती, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा लाल किल्ला, मुघलांपासून इंग्रजांपर्यंत अनेक राज्यकर्ते अनुभवलेला लाल किल्ला पाहत असतानाच पार्श्वभूमीवर बिस्मिल्ला खान यांची शहनाई सुरू होती. लाल किल्ला झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आला होता, वातावरणात प्रचंड उत्साह होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला उद्देशून भाषण याच लाल किल्ल्यावरून केलं होतं.
स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पाहायला मी गेले, तेव्हा लाल किल्ल्यावरून देशाला हुरूप देणारे पंडित नेहरू डोळ्यांसमोर उभे राहिले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरचं वातावरण कसं भारलेलं असेल याची कल्पना आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून होतं. वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे इंग्रजी आवश्यक असतं. खरं तर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम छोटा असतो. सेनादलांचं संचलन, शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, तोफांची सलामी, पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावणं आणि पंतप्रधानांचं भाषण. सेनादलांचं संचलन किंवा परेड नेहमीच शिस्तबद्ध आणि रुबाबदार असते. परेड कमांडरच्या आवाजातला जोश आणि दम अंगावर काटा आणणारा असतो. या संचलनानंतर होते तोफांची सलामी! तोफांच्या आवाजांनी लाल किल्ल्याचा संपूर्ण परिसर दणाणून उठतो. तोफांच्या सलामीनंतर पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतात, राष्ट्रगीत होतं, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं लाल किल्ला परिसरात राष्ट्रगीत वाजतं, तेव्हा मन देशाभिमानानं उचंबळून येतं, भारताची विविधता नेमक्या शब्दांत मांडणाऱ्या रवींद्रनाथ ठाकूरांच्या प्रतिभेबद्दल आदर वाटतो, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपली आयुष्यं खर्च करणाऱ्या नेत्यांची, सामान्य माणसांची आठवण येते. आपण ज्या स्वतंत्र देशात वावरतो आहोत त्या स्वातंत्र्याची किंमत लाल किल्ल्यावर मला जेवढी जाणवली तेवढी पूर्वी कधीच जाणवली नव्हती.
याच लाल किल्ल्यावरून भारताच्या अनेक पंतप्रधानांनी अनेक प्रभावी भाषणं केली आहेत. त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीचं प्रतिबिंब त्या भाषणांमधून आलेलं आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी देशाच्या सर्व नागरिकांपर्यंत या भाषणाच्या निमित्तानं पोचवता येतात. पंतप्रधानांचं भाषण झाल्यावर कार्यक्रमाची सांगता होते. त्यानंतर आपण परत जायला निघतो तेव्हा मन भरून आलेलं असतं, ते कार्यक्रमाच्या भव्यतेमुळे, इतिहासाच्या आठवणीनं आणि देशप्रेमानं!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link