Next
अनाथांचे असेही पालकत्व!
पल्लवी मुजुमदार
Friday, August 23 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पुण्यात एका सिग्नलला होर्डिंग पडल्याची बातमी आली. त्याबरोबरीने त्यात जखमी व्यक्तीला दुचाकीवर घेऊन, रक्ताळलेल्या कपड्यांची पर्वा न करता पोलिसांच्या मदतीने इस्पितळात दाखल करणे, बरोबरीने घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रिक्षावाल्याच्या निराधार मुलांना सांभाळणे यासाठी एक व्यक्ती स्वतःहून पुढे आली. या होत्या गायत्री पाठक! ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’च्या संचालिका. गायत्री पाठक मिरज येथील अनाथाश्रमात १२वी पर्यंत राहिल्या होत्या. संस्थाचालकांचे आडनाव पाठक त्यामुळे त्या आश्रमातल्या सगळ्या मुलांचे आडनाव पाठक. संस्थेत येणारी मंडळी, साजरे होणारे वाढदिवस, वेगवेगळ्या मंडळींकडून येणारे खाऊ हे सारे अनुभवताना आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत, हे गायत्री पाठक यांना उमगत गेले. काही हवे असेल तर मोठ्या ताईशी बोलायचे हेच विश्व असल्याची भावना होती. शालेय शिक्षणाचा पाठ गिरवताना, अनाथाश्रमात वाढताना, इथे येणाऱ्या विविध मानसिकतेच्या अनेकविध मंडळींना भेटणे, या अनुभवांची पोतडी भरलेली होती.
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर नियमानुसार अनाथाश्रम सोडणे क्रमप्राप्त होते. त्यापुढे लग्न करून किंवा स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडणे आणि आपली वाट आपण निवडणे असे पर्याय होते. जिद्दी गायत्रीने दुसरा पर्याय निवडला. त्या पुण्यात पोचल्या. प्रसंगी पुण्याच्या शनिवारवाड्याच्या पायऱ्यांवर दोन रात्री घालवल्या. तिथल्या रखवालदाराने विद्यार्थी साहाय्यक संघाची माहिती दिली. ‘कमवा आणि शिका’ या मार्गाने बीएची पदवी प्राप्त केली. शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण पूर्ण केली. त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी सुरू केली. हौस म्हणून त्यांनी शास्त्रीय संगीतात एम.ए. ची पदवी संपादन केली.
या सगळ्या प्रवासात लक्षात आले की, अनाथालयातून १८ वर्षांनंतर मुले-मुली बाहेर पडतात. त्यांनतर खुल्या आभाळाखाली त्यांना भेडसावणारे भौतिक प्रश्न फार भयावह आहेत. वसतिगृहात जागा मिळवणे, शिष्यवृत्तीवर अभ्यास करणे हे मार्ग सर्वांना सापडतात असे नाही. काही मुलींवर लग्न लादले जाते. त्यातून मग नैतिकतेची वाट निवडायची की क्षणिक आनंद घेत वाममार्गाला आपलेसे करायचे हा मानसिक गोंधळ या मुलामुलींना सैरभैर करून टाकतो.
या टप्प्यावर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले, कौशल्य विकासातून स्वतःला सक्षम करता आले तर चित्र नक्कीच वेगळे असेल, या मानसिकतेतून १८ वर्षांवरील अनाथ मुलांच्या प्रश्नांची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. ‘अनाथ’ हे ओळखपत्र यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे, यासाठी त्यांनी सरकार, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. वसतिगृह, शिष्यवृत्ती, नोकरी या प्रत्येक ठिकाणी एक टक्का आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. तसा अध्यादेश काढला गेला, यात मोलाची भूमिका गायत्री पाठक यांनी
बजावली आहे.
आश्रमातून बाहेर पडलेल्या अठरा वर्षांवरील मुलामुलींना भेडसावणारे प्रश्न गायत्री पाठक यांना स्वानुभवाने माहीत होते. आता इतरांना ते भेडसावू नयेत, आपल्याला चांगली माणसे भेटली म्हणून आयुष्याची दिशा गवसली, तशी आता इतरांनाही ती सापडावी या भावनेने त्यांनी ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’ची स्थापना केली.
‘कमवा आणि शिका’ या धर्तीवर आयुष्यात काही करू इच्छिणाऱ्या युवांसाठी ‘सनाथ’ कार्यरत आहे. सांगली-सातारा भागातल्या १८ वर्षे ओलांडलेल्या, अनाथालयातून बाहेर पडलेल्या होतकरू मुलामुलींना ‘सनाथ’चे ट्रस्टी घेऊन येतात. आज सनाथच्या आश्रयाला १२ मुली आणि ४ मुले आहेत. या मुलामुलींना भाड्याने घर घेऊन राहताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते, म्हणून मग गायत्री यांनी स्वतःच्या घरात या मुलांच्या राहण्याची सोय केली आणि स्वतः भाड्याच्या घरात वास्तव्य करण्यास सुरुवात केली.
‘सनाथ’मध्ये असलेले सात ट्रस्टी म्हणजे गायत्री यांच्या लहानपणीच्या काळात असणारे सवंगडी आहेत. त्यांना अनाथांचे प्रश्न, त्यांच्या समस्या यांची जाण आहे. स्वाभिमान, आत्मसन्मान, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास यासाठी या युवावर्गाला प्रशिक्षित केले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वत:ची ओळख सांगणारी कागदपत्रे मिळवणे, ती व्यवस्थित प्रकारे सांभाळून त्याचा योग्य तो वापर करणे हेही प्रशिक्षण ‘सनाथ’मध्ये देण्यात येते. उपकरणेदुरुस्ती आणि अनेक प्रकारचे कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात येते. या माध्यमातून अनेक प्रशिक्षित मुली आज गॅरेजमध्ये काम करतात, चार चाकी गाड्या आत्मविश्वासाने दुरुस्त करतात आणि स्वाभिमानाने राहतात.
गायत्री पाठक म्हणतात, ‘अठरा वर्षावरील अनाथ युवावर्गासाठी आसरा देणाऱ्यांची गरज आहे. मुलींच्या बाबतीत त्यांचे लग्न करून दिल्याने जबाबदारी संपत नाही तर त्यांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायांवर उभे करणे अत्यावश्यक आहे. लग्नाचा निर्णय हा संस्थेने लादून नाही तर त्यांच्या मर्जीने व्हायला हवा.’ अशा तरुणांना स्वबळावर उभे करण्यासाठी गायत्री पाठक सातत्याने धडपडत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link