Next
आजोळ
स्वाती क्षीरसागर
Friday, January 18 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आजी म्हणजे दरारा असतो, आजी म्हणजे शहारा असतो
कुठलंही पाऊल चुकत नाही,नजरेचा खडा पहारा असतो
आजी म्हणजे प्रेम आहे, आजी म्हणजे दडपण आहे
पाहताक्षणी डोळ्यांत भरणारे, घराचे भारदस्त घरपण आहे…


आजोळ म्हणलं की आपल्याला पहिली आठवण होते ती आपल्या आजीची. आजीचे गाव म्हणजे आजोळ. मला कायमच माझ्या आजोळी जाण्याची उत्सुकता असायची आणि अजूनही आहे. जायच्या दिवशी आम्ही सर्वजण सकाळी सहा वाजता आवरून तयार होतो. माझ्या आजीची आम्ही एकूण सात नातवंडे. तीन तासांचा प्रवास होता परंतु आम्हाला तो खूप अवघड होता. कारण माझी आजी आयुष्याशी झुंज देत होती. तिथे पोहोचल्यानंतर दारातून आत पाऊल टाकल्यावर मला तिच्या समोर जायचे धाडस होईना, तिची ती अवस्था पाहून मला याची जाणीव झाली की आपल्याला काळ जसा चांगले दिवस दाखवतो तसा आयुष्याचा शेवटी चांगलाच असेल असे नाही.  तिच्या डोक्यावरून हात फिरवताना, तिचा थरथरता हात हातात घेताना आमच्या लहानपणीचा सर्व काळ माझ्या डोळ्यांसमोरून गेला. तिचा त्या घरातील वावर त्या घराला घरपण देत होता, तिच्या नजरेतच एक प्रकारचा दरारा असायचा आणि तितकेच प्रेम पण असायचे, गच्चीवरून ती नऊवारीच्या ओच्यातून आमच्यासाठी पेरू तोडून आणायची, तिच्या हातचे दडपे पोहे आणि साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी आम्ही धडपडायचो. इतके नि:स्वार्थी प्रेम तिच्यात होते की अंगणातील झाडेपण तिच्या प्रेमाने फुलली होती.
आई जितकी प्रेमळ असते त्यापेक्षा कितीतरी पटींनी आजी प्रेमळ असते आणि त्यात नातवंडे म्हणजे दुधावरची साय. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आजी नावाचं एक सुंदर वळण असते आणि ते आपल्याला सतत आपल्याजवळ असावे असे वाटत असते. माझे आजोबा काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर संपूर्ण घराचा डोलारा आजीने सांभाळला. तीन मुली असूनही ती कधी डगमगली नाही. कुठून एवढी हिंमत आणली हा प्रश्न मला कायम पडत राहिला. आम्ही लहानपणी महिना महिना आजोळी जात असू, मे महिन्याची सुट्टी लागली की आम्हाला आजीच्या गावी जायची ओढ लागायची. कधी एकदा तिच्या गावी जातो असे व्हायचे. तिथे पोचले की दारातच आजी उभी असायची.  आजी कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण होती ती. लांबसडक केस आणि त्या केसांच्या वेणीचा अंबाडा बांधायची ती आणि त्या अंबाड्यात ती आकडे अशा पद्धतीने लावायची की अंबाडा  दुसऱ्या दिवशीपर्यंत जसाच्या तसा असायचा. ब्राह्मणी पद्धतीची ओच्याची  नऊवारी साडी, हातात पाटल्या बांगड्या, घारे डोळे. डोळ्यांत पहिलं की आयुष्यात घेतलेले अनेक अनुभव दडलेले आहेत असे वाटायचे. तिचा तो सात्त्विक स्वयंपाक, ते मायेने सर्वाना आग्रह करून वाढणे, आम्हाला सर्व नातवंडांना कृष्णा नदीवर अंघोळीला ती घेऊन जायची.  हातात कायम रामनामाची जपमाळ असायची आणि आता हातात ताकद नाही पण मुखात कायम रामनाम आहे.
तिची आताची  ही अवस्था आता बघवत नव्हती, दारातील पारिजातकपण सुकून गेला होता, कशातच काही अर्थ नाही असे वाटत होते.  
मनात एक प्रश्न आला, की आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झटणारी, सतत दुसऱ्याचा विचार करणारी माझी आजी तिच्या आयुष्यातच असे गादीला खिळून राहणे का? गेली दोन वर्षे ती अशीच एका जागेवर खिळून आहे.  परंतु अजूनही घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात तिच्या आठवणी ताज्या आहेत. काळ किती पटपट सरून जातो आपल्यासमोर एक वेगळच वास्तव उभे ठाकते की ज्याचा सामना करणे आपल्याला खूप कठीण असते.
मनात आले की आताच्या या धकाधकीच्या काळात कुणालाच कुणासाठी वेळ राहिलेला नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात इतका गुंतून गेला आहे की आपल्याला आठवणही राहत नाही की आपल्या लहानपणी असाच आजी-आजोबांनी आपल्या डोक्यावरून हात फिरवला असेल. मायेने खाऊपिऊ घातले असेल, आपल्यासाठी आई-बाबांशी कट्टी केली असेल, आपल्याला बागेत फिरायला घेऊन गेले असतील. तसे जर असेल तर मग आपण पण त्यांच्या अशा काळात त्यांना आधार दिला तर कुठे बिघडले? त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांचा हात हातात घेतला तर काय होईल? आयुष्याच्या उतरणीच्या काळात त्यांच्याबरोबर हेच तर जाईल आणि आपल्या मनालापण शांतता लाभेल. शेवटी प्रत्येकाला अशा प्रसंगांना समोर जावेच लागणार आहे हे विसरून चालणार नाही.
 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link