Next
पैशासाठी कुठल्याही थराला!
दिलीप नेर्लीकर
Friday, April 05 | 03:30 PM
15 0 0
Share this story


‘खोटं बोल, पण रेटून बोल’ ही नीती खनिजतेल आणि खनिजकोळशाच्या बाबतीत कशी वापरली गेली ते आपण पाहिलं. या आधी तंबाखूचे मानवाच्या आरोग्यावर होणारे परिणाम जेव्हा जगासमोर प्रथम मांडले गेले तेव्हाही जगभरातील सिगारेट आणि चिरूट बनवणाऱ्या कंपन्यांनी अमाप पैसा ओतून असाच खोटा प्रचार सुरू केला होता. यावेळी प्रगत राष्ट्रांतील काही लोकांनी आणि सामाजिक संस्थांनी या कंपन्यांना कोर्टात खेचलं होतं आणि खोटा प्रचार करून लोकांना उल्लू बनवल्याबद्दल त्यांना खूप मोठा दंडही ठोठावण्यात आला होता. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत राष्ट्रात तर तेल आणि कोळसा यातून मिळणारं अमर्याद उत्पन्न हातातून जाऊ नये म्हणून या कंपन्यांनी १६० राष्ट्रांनी सही केलेल्या क्योटो करारातून अमेरिकेला बाहेर पडायला भाग पाडलं. जगातील जवळपास सर्व राष्ट्रांनी स्वीकारलेल्या या करारातून बाहेर पडताना त्यांनी कारण काय दिलं तर म्हणे अमेरिकेच्या अर्थकारणावर त्याचे विपरीत परिणाम होतील. इकडे उर्वरित जगाचे बारा वाजले तरी चालतील, पण अमेरिकेतील औद्योगिकीकरणाला धक्का लागू नये, हा त्या मागचा त्यांचा ‘उदात्त’ हेतू होता! आणि यामागे अदृश्य हात होता तो जगातील सर्वात मोठ्या तेलशुद्धीकरण आणि खनिजकोळसा उत्खनन करणाऱ्या कंपन्यांचा.
या कंपन्यांचं सरकारशी असलेल साटंलोटं उघड होऊन आपलं बिंग बाहेर फुटेपर्यंत, लवकरात लवकर आणखी पैसा कमावण्यासाठी त्यांनी सरकारवर दबाव आणून, डिझेल आणि पेट्रोलचा मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या मोठमोठ्या सेडान गाड्या, अजस्र ट्रक, भरमसाठ डिझेल पिऊन वातावरणात विषारी वायू ओतणारी यंत्रं यांचं उत्पादन वाढण्यासाठी अशा कारखान्यांना भराभर परवाने देण्यात आले. त्यामुळे हवेचं प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलं. वाहनांतून, कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणावर असणारे बरेच निर्बंधही शिथील करण्यात आले, इतकं की ते असून नसल्यासारखेच झाले. याही पुढे एक पाऊल अमेरिकन सरकारनं उचललं ते म्हणजे पर्यावरणरक्षणासाठी झटणाऱ्या इपीए या संस्थेकडील पर्यावरणसंबंधातील सर्व कागदपत्रं कोणालाही अभ्यासासाठी मिळू नयेत म्हणून ती कागदपत्रं असणारी वाचनालयंच बंद करून टाकली. या कृत्यावर पडदा टाकण्यासाठी कारण दिलं गेलं, की सरकारजवळ ही वाचनालय चालू ठेवण्यासाठी पुरेसा पैसा नाही! या अपप्रचारात त्यांनी ख्रिश्चन धर्मग्रंथ बायबलचा आधार घेतला आणि सांगायला सुरुवात केली की जे काय हवामानबदल होत आहेत ते बायबलमध्ये सांगितलेल्या, येणाऱ्या प्रलयाची नांदी आहेत आणि जागतिक तापमानवाढ वगैरे सर्व थोतांड आहे. परंतु यातला खोटेपणा आणि दांभिकपणा धर्मावर अगदी अढळ श्रद्धा असणाऱ्यानांही लक्षात येऊ लागला. देवानं आपल्याला दिलेली ही वसुंधरा सदैव हिरवीगार राहावी यासाठी प्रयत्न करणं हीच बायबलची शिकवण आहे आणि ती जनसामान्यांपर्यंत पोचवली पाहिजे, असं ख्रिश्चन धर्मगुरूंनी ठासून सांगितलं. Is God Green? देव स्वत: पर्यावरणवादी आहे का? या विषयावर अनेक संवाद जगात आजवर गाजलेत. त्यातून निघालेला सूर मात्र एकच आहे, तो रेव्ह. राबिन्सन यांच्या वक्तव्यातून व्यक्त होतो. ते म्हणतात, आपण पृथ्वीला आपली माय मानतो, पण ही धरा ज्या कोणी अस्तित्वात आणली त्या बापाला आपण तिचं रक्षण करण्याचं अभिवचन द्यायला नको का?
या सगळ्या प्रकारातून आपणाला लक्षात आलं असेलच, की अमाप पैसा मिळवण्याच्या नादात काही कंपन्या कशा कोणत्याही थराला जातात आणि मानवजातीच्या मुळावरच उठतात. त्यावेळी मग ते साम-दाम-भेद-दंड याचा उपयोग तर करतातच शिवाय माणसाच्या देवावरच्या श्रद्धेलाही आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करतात. निसर्गाची मनमानी ही मानवाच्या करणीमुळे होत आहे हे मान्य न करता तो दैवी प्रकोप आहे, असा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा समज समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो.
आपण अनेक प्रकारे वातावरणात सोडत असलेला कार्बन-डाय-ऑक्साइड वायू हाच खरा वातावरणबदलातील प्रक्रियेचा खलनायक आहे हे तर आता सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलं आहे. तरीही खनिजकोळशातून आणखीही एक अत्यंत धोकादायक रसायन बाहेर पडतं आणि ते मानवाला हानिकारक ठरू शकतं. औष्णिक ऊर्जा वापरून वीज तयार करणाऱ्या अनेक वीजकंपन्या खनिजकोळसाच वापरतात. त्याच्या ज्वलनातून तयार झालेल्या धुरात दगडी कोळशात असलेला पारा (Mercury} बाहेर पडतो. पारा आणि पाऱ्याची इतर संयुगं  त्यांच्या जडत्वामुळे ती आकाशातून खाली धरतीवर उतरतात आणि ती इथल्या पाण्याच्या साठ्यात मिसळतात. या दूषित पाण्यातून ही संयुगं मानवाच्या शरीरात शिरतात. त्याचा परिणाम म्हणून ऑटिझमसारखे अपंग बनवणारे आजार आणि मेंदूचे अनेक विकार संभवतात. याचा परिणाम लहान मुलांवर, गर्भवतींवर होतो आणि त्यांच्या रक्तातील पाऱ्याची पातळी धोक्याच्या स्तरांपर्यंत गेली की मग जन्माला येणारी ती निरागस बालकं जन्मताच ऑटिझम आणि मेंदूच्या इतर आजारांची शिकार होतात. आज अनेक पुढारलेल्या राष्ट्रांत १५ टक्क्यांहून अधिक मुलांच्या रक्तात असणारी पाऱ्याची पातळी ही धोकादायक आहे, पण हे लक्षात कोण घेतो?
एकट्या अमेरिकेत दरवर्षी एक अब्ज टन खनिजकोळसा वीज तयार करणाऱ्या आणि इतर कारखान्यांतून जाळला जातो. यातून दोन अब्ज टनांहून अधिक कार्बन-डाय-ऑक्साइड वायू वातावरणात पसरतो. याच ज्वलनातून साधारण पन्नासएक टन पाराही हवेत शिरतो. तिथून शेवटी तो तुमच्या पाण्याच्या स्रोतात मिसळतो. ही थर्मल वीज तयार करताना प्रतिवर्षी लहानसहान अपघातही होतात आणि त्यातून अंदाजे १,२५,००० लिटर खनिजतेलही पाण्यात मिसळतं. हे झालं फक्त एका अमेरिकेतलं. इतर पुढारलेली राष्ट्रंही या प्रदूषणात फारशी मागे नाहीत.
पर्यावरणातील हे सर्व धोके जेव्हा आपला प्रताप दाखवायला लागले तेव्हा या खनिजतेलाच्या आणि कोळशाच्या कंपन्यांनी आणखी एक नामी युक्ती अनेक राष्ट्रांच्या गळी उतरवली. पर्यावरणाचं रक्षण करता करता विकसनशील देशांना आणि तिथल्या कंपन्यांना कसा पैसा मिळवता येईल यासाठी एक यंत्रणा उभी केली. त्याचं पद्धतशीर मार्केटिंग केलं. त्याला एक गोंडस नाव दिलं ‘कार्बन क्रेडिट.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link