Next
अपयशाची धास्ती
डॉ. शिरीषा साठे
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story

वाणिज्य शाखेची पहिल्या वर्षात असलेली एक गोड मुलगी माझ्यासमोर बसली होती. काउन्सिलरला भेटायला आली होती, कारण मनात खूप गोंधळ सुरू होते आणि ते सगळे सोडवायचे होते. १० वी, १२ वी खूप चांगल्या गुणांनी पास झालेली, अत्यंत हुशार म्हणून ओळखली जाणारी ही मुलगी. ११ वी कॉमर्सला जाण्याचा आणि आता सीए करण्याचा निर्णय अॅप्टिट्यूड टेस्ट, स्वत:ची आवड, स्वत:च्या क्षमता या सर्वांचा विचार करून स्वेच्छेनं घेतलेला. आई-वडिलांशी उत्तम संवाद. म्हणजे निर्णयप्रक्रियेमध्ये काही उणं नव्हतं. मग आता गोंधळ कशाचा, याविषयी माझ्या मनात खूप उत्सुकता होती. स्वत:चं म्हणणं अतिशय स्पष्ट शब्दांत मांडत ती म्हणाली, “मला फारसा अभ्यास न करता उत्तम मार्क मिळत होते. त्यामुळे मला खूप अभ्यास करायची सवय नाही. सीएची परीक्षा देणारी बरोबरीची मित्रमंडळी अभ्यासिकेत जातात. मी त्यांना फोन करते तेव्हा कळतं की त्यांनी ८ तास, १० तास अभ्यास केला आहे. मग मला खूप टेन्शन येतं.”
“आतापर्यंत टॉपर असल्यानं नापास होणं, नापास होण्याची अजिबात सवय नाही आणि जर या सीएच्या प्राथमिक परीक्षेत नापास झाले तर?”
“आताच्या अभ्यासातले सगळे विषय आवडतात, जमतात; पण ‘कायदा’ मात्र जमत असला तरी विषय म्हणून अजिबात आवडत नाही. आजपासून १०-१५ वर्षांनी मी कायद्यासकट सगळ्या बाबतींत काम करत असेन, असं चित्र मला कल्पना केली तरी अस्वस्थ करतं आणि वाटतं, कॉमर्स आणि सीए करण्याचा निर्णय चुकला की काय? मला ब्युटी आणि कॉस्मेटिक्स या गोष्टींमध्येही खूप रस आहे. असं वाटतं की फील्ड बदलायचं का? पण मग आई-बाबांना कसं सांगू? त्यांनी कधीही निर्णय किंवा अपेक्षांचं ओझं लादलं नाही. तरीही त्यांच्यासाठी असा निर्णय धक्कादायक असेल का?”
या मुलीची परिस्थिती अगदी प्रातिनिधिक नसली तरी तिचा गोंधळ ज्या विचारांनी झाला ते विचार मात्र सार्वत्रिक आहेत. म्हणून त्यांचा ऊहापोह करणं जरुरीचं आहे. परीक्षा, नापास होणं या गोष्टीकडे शाळेत असताना मुलं जसं बघतात, तोच दृष्टिकोन पदवी/पदव्युत्तर/व्यावसायिक परीक्षा देताना ठेवला तर त्याचा अर्थ आपण परीक्षा, पास-नापास या पद्धतीला समजूनच घेतलं नाही, असा होतो.
पुस्तक वाचायला आवडतं म्हणून एखादं पुस्तक वाचणं आणि त्या पुस्तकाचं समीक्षण करायचं आहे म्हणून, त्या विषयावर व्याख्यान द्यायचं आहे म्हणून, त्या संदर्भात एखादा लेख लिहायचा आहे म्हणून वाचणं वेगळं असतं. पुस्तक तेच असलं तरी आवड म्हणून वाचणं आणि एखादं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून वाचणं या दोन्ही प्रक्रियांमध्ये फरक असतो, हे आपण सर्वांनी केव्हा ना केव्हा नक्की अनुभवलेलं असतं. उद्दिष्ट समोर ठेवून केलेल्या वाचनामध्ये आपली गुंतवणूक अधिक असते. वाचलेल्या गोष्टी समजून घेणं, त्यावर मनन, चिंतन करणं, त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणं यासाठी आपण कष्ट घेतो. म्हणजेच मेंदूमध्ये त्या त्या प्रकारच्या जोडण्या तयार होतात आणि त्यालाच आपण माहितीचं ज्ञानात रूपांतर होणं असं म्हणतो.
आपण शिकत असताना परीक्षेसाठी अभ्यास करतो तेव्हा याच प्रक्रिया मेंदूत घडतात. परीक्षेचा पेपर लिहितो तेव्हा हेच ज्ञान स्मृतीमधून काढतो आणि कागदावर लिहितो. स्मृतीमध्ये साठवलेली माहिती गरजेनुसार बाहेर येणं हा शिकण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे. या सर्वांचं सार असं, की परीक्षेसाठी अभ्यास करणं आणि परीक्षा देणं या शिकण्याच्या प्रक्रियेला भक्कम करणाऱ्या गोष्टी आहेत.
पुढचा मुद्दा पास-नापास किंवा मार्कांचा. मार्कांचा अर्थ त्या त्या विषयाचं आकलन, स्मृती आणि प्रेझेंटेशन स्किल चांगलं असणं असा आहे. त्याचा संपूर्ण बुद्धिमत्तेशी अगदी नगण्य संबंध आहे, हे आपण यापूर्वीच्या अनेक लेखांमधून समजून घेतलं आहेच. मग प्रश्न आहे तो पास-नापास या संकल्पनेचा. ३२ आणि ३४ मार्कांमध्ये २ चा फरक असतो, ३६ आणि ३८ मध्येही २ चाच फरक असतो. तसाच ३४ आणि ३६ मध्येही २ चाच फरक असतो. परंतु ३४ मार्क मिळवणारा नापास होतो आणि ३६ मिळवणारा पास होऊन पुढे जातो. हे विस्तारानं लिहिण्याचं कारण एवढंच, की प्रश्न मार्कांच्या फरकाचा नसून त्या त्या परीक्षेला ‘कट ऑफ’ काय आहे, याचा आहे. कारण त्याच ‘कट ऑफ’नुसार पास/फेल हे ठरतं आणि हा ‘कट ऑफ’ इच्छुकांची संख्या आणि संधींची संख्या यानुसार ठरतो. म्हणजे एखाद्या कोर्सला इच्छुक उमेदवारांची संख्या १०,००० असेल आणि सीट्स फक्त ५० असतील तर स्वाभाविकरीत्या ‘कट ऑफ’ वर जाईल. याउलट इच्छुकांची संख्या १०० असेल आणि सीट्स २०० असतील तर त्या ‘कट ऑफ’चा प्रश्नच येणार नाही. म्हणजे पास आणि नापास ज्या ‘कट ऑफ’वर ठरतं, त्या ‘कट ऑफ’चा संबंध व्यक्तीच्या क्षमतेशी नसून इच्छुक आणि संधी यांच्या गुणोत्तराशी असतो. पालकांनी, शिक्षकांनी ज्या शिक्षणपद्धतीचा आणि परीक्षा व गुणांकनपद्धतीचा आपण भाग आहोत ती पद्धत तार्किकदृष्ट्या समजून घेतली तरच ते आपल्या मुलांमध्ये हा दृष्टिकोन रुजवू शकतील आणि ही पद्धत शिक्षणकेंद्री होईल; ती परीक्षाकेंद्री राहणार नाही.
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेली मुलगी या विचारांची स्पष्टता नसल्यामुळे गोंधळात पडली होती. ‘सीएच्या प्राथमिक परीक्षेत फेल झाले तर...?’ हा प्रचंड ताण तिला होता. नापास होण्यापेक्षा हा मार्गच सोडून द्यावा का, या विचारानं तिला जास्त घेरलं होतं.
पालक, शिक्षक आणि १०/११ वी नंतरची मुलं यांनी किमान हे लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षेतील पास-नापासचा अपयशाशी काहीही संबंध नाही. इच्छुक आणि संधी या गुणोत्तरात आपण बसलो तर आपल्याला हवी ती संधी मिळते. नाहीतर काय राहून गेलं याचा विचार करून पुन्हा प्रयत्न करता येतात. त्या अर्थानं ‘अपयश’ नावाचं काही नसतंच. तुम्ही यशस्वी होता किंवा शिकता. करिअरविषयी पुढच्या लेखात बोलूया.
n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link