Next
मुखवट्यामागचं वास्तव
वंदना खरे
Friday, October 04 | 03:30 AM
15 0 0
Share this story


नवरात्री सुरू झाल्यापासून फेसबुक आणि whatssapp वर रोज दुर्गा, लक्ष्मी, अन्नपूर्णा, सरस्वती अशा विविध रूपांची चित्रं आणि त्यांचं संस्कृतिक महत्त्व सांगणारे ढीगभर मेसेजेस येऊन पडत असतात. शिवाय अनेक उत्साही मित्रमैत्रिणी ठरावीक रंगांचे कपडे घातलेले आपले फोटो दाखवत असतात. आपआपल्या घरातल्या देवीपूजेचे फोटोही डकवत असतात. त्यासोबत आपल्या संस्कृतीत स्त्रियांना किती मनाचं स्थान आहे, याचीही आठवण करून देणारे संदेश पसरत राहतात. सगळ्याच माध्यमांतून जित्याजागत्या कर्तृत्ववान स्त्रियांचं गुणगान चाललेलं असतं. हे घणाघाती आवाज ऐकून आणि हा सगळा चकचकाट पाहून डोळे दिपून जातात!
आपल्या देशात जर स्त्रियांना वर्षातले दहा दिवस इतका मानसन्मान देण्याची संस्कृती असेल तर उरलेल्या ३५५ दिवसांत स्त्रियांवर ठिकठिकाणी जे अत्याचार होत असतात, ते कशामुळे?
स्त्री हे अन्नपूर्णेचं रूप असेल तर आपल्या देशातल्या अर्ध्याहून अधिक स्त्रिया अॅनिमियानं ग्रासलेल्या का असतात? घरासाठी रांधणाऱ्या बाईला सर्वांच्या जेवणानंतर उरलंसुरलं का खावं लागतं? जर सरस्वतीला आपण विद्येची देवता मानत असू तर भारतात स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण नेहमी पुरुषांपेक्षा कमी का असतं? आपल्या देशात ३५ टक्के मुलींना अक्षरओळख करून घेण्याची संधी मिळत नाही. ग्रामीण भागात शंभरात एखादी मुलगी बारावीच्या पुढचं शिक्षण घेते. घरोघर बाईला जर ‘लक्ष्मी’ मानत असतील तर ते राहतं घर तरी नावावर असतं का? बऱ्याचदा दारावर तिच्या नावाची पाटीसुद्धा नसते. अनेक जणींचं बँकेत स्वत:चं खातं नसतं आणि बहुतेक जणींना नवऱ्याचा पगार किती आहे, तेदेखील माहीत नसतं.
नवरात्रीतल्या नऊ दिवसांत अनेकांच्या घरी कुमारिकांना कौतुकानं जेवायला घालण्याची प्रथा आहे, पण समाजात बहुसंख्य मुली कुपोषित असतात या कटू वास्तवाकडे त्यांचं लक्ष नसतं. देशात एक ते पाच वयोगटात जे बालमृत्यू होतात, त्यात मुलींची संख्या मुलग्यांपेक्षा १७ टक्क्यांनी जास्त आहे, असं युनिसेफच्या ताज्या आकडेवारीत म्हटलं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या शेजारी देशांपेक्षाही हे प्रमाण जास्त आहे. अन्न, पोषण आणि आरोग्याची काळजी या तिन्ही बाबतीत मुलींकडे होणारं दुर्लक्ष हे याचं मुख्य कारण असल्याचं समाजशास्त्रज्ञांचं मत आहे. देशात बालकांच्या कुपोषणाचं प्रमाण जरी जास्त असलं तरी त्यातही मुलींचं प्रमाण जास्त असतं. कमालीच्या कुपोषणामुळे दवाखान्यात दाखल करण्यात येणाऱ्या मुलांमध्ये ६८ टक्के मुली असतात. मुलींना किशोरवयात तसंच गरोदरपणी आणि स्तनपानाच्या काळातही विशेष पोषक आहाराची गरज असते, पण भारतातल्या १० ते १८ वयोगटातल्या निम्म्यापेक्षा जास्त (५६%) मुलींना अॅनिमिया असतो, असं सरकारी सर्वेक्षणातून दिसून येतं. याचाच अर्थ, किशोरवयीन मुलींच्या पोषणाकडे आपण कमालीचं दुर्लक्ष करतो. आपल्या देशात मुलींचं लग्नाचं सरासरी वय १७ वर्षं असतं. म्हणजे रक्तपांढरीला बळी पडलेल्या याच मुली मोठ्या होऊन जेव्हा आई बनतात, तेव्हा कमी वजनाच्या मुलांना जन्म देतात. भारतातल्या कुपोषित मुलांचं प्रमाण सबसहारन आफ्रिकेतल्या प्रमाणापेक्षाही जास्त आहे. एवढंच नाही तर अॅनिमिया हेच देशात बाळंतपणातल्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे. ‘आंतरराष्ट्रीय अन्न धोरण’ विषयात संशोधन करणाऱ्या पूर्णिमा मेनन म्हणतात, की स्त्री-पुरुषांमधली विषमता हे भारतातल्या कुपोषणाचं महत्त्वाचं कारण आहे.
स्त्रीमध्ये देवीचं रूप बघणाऱ्या संस्कृतीत हे सगळं वर्षानुवर्षं का घडतंय? देवीच्या नावानं ढोल बडवणाऱ्या माणसांना आपल्या संस्कृतीत असलेला हा विरोधाभास कधी टोचत नसेल का? की ह्या विरोधाभासाकडे सोयिस्कर दुर्लक्ष करता यावं म्हणूनच वर्षातून दहा दिवस हा लखलखाट आणि दणदणाट केला जातो? मला तर तीच शक्यता जास्त वाटते.
वृत्तपत्रांमध्ये जेव्हा महिलांच्या विषयी बातम्या येतात, तेव्हा बहुतेक वेळा त्यात महिलेचा उल्लेख एखाद्या दुर्घटनेची बळी म्हणूनच केलेला असतो. महिलांच्या कर्तृत्वाबद्दलच्या बातम्या अगदी कमी प्रमाणात दिसतात. वृत्तवाहिन्यांवर जरी बातम्या सांगणाऱ्या व्यक्तींमध्ये महिलांचं प्रमाण निम्म्यानं असलं तरी चर्चात्मक कार्यक्रमात विशेषज्ञ या नात्यानं जेमतेम १४ टक्के महिला दिसतात असं ‘नेटवर्क ऑफ विमेन इन मीडिया’नं वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात दिसलं आहे. त्यातल्या त्यात एखाद्या महिलाविषयक दुर्घटनेबद्दल चर्चा असेल तर महिलांचा समावेश होण्याची जास्त शक्यता असते, पण पक्षीय राजकारण, शेती किंवा पर्यावरण अशा विषयांच्या चर्चांमध्ये मात्र महिला विशेषज्ञांचा समावेश फारसा नसतो. पण बहुतांश वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रं नवरात्रौत्सवात मात्र दररोज एकेका कर्तृत्ववान महिलेची कहाणी सादर करतात. प्रसारमाध्यमं हीदेखील समाजमानसाचंच प्रतिबिंब दाखवत असतात. आपल्या एकूण समाजातच वर्षभर स्त्रियांकडे दुर्लक्ष करून फक्त वर्षातले ठरावीक दिवस त्यांचं कौतुक करण्याची पद्धत आहे. आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रीला आम्ही देवीचं स्थान देतो, असं दाखवून झालं की मग त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली करण्याचं पाप धुऊन टाकता येतं जणू! यातूनच आंतरराष्ट्रीय महिला दिवसाला ‘बायकांचा पोळा’ या शब्दात हिणवण्याची ‘गंमत’ जोपासली जाते!
स्त्रियांना देवीचं स्थान असल्याचे ढोल बडवण्यापेक्षा स्त्रियांच्या मानवी हक्कांची जपणूक करणारा समाज निर्माण व्हायला पाहिजे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link