Next
सांग दर्पणा...
अनुजा हर्डीकर
Friday, August 23 | 03:00 PM
15 0 0
Share this story

कोणीतरी माझं कौतुक करावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. माझ्या दिसण्याचं, मी केलेल्या प्रत्येक कामाचं, माझ्या अभ्यासाचं कौतुक व्हावं, ही एक स्वाभाविक अपेक्षा सर्वांच्या मनात असते. मग तो मुलगा असो वा मुलगी! पण प्रत्यक्षात असं घडेलच, याची खात्री नाही. माझी एक छोटीशी मैत्रीण आहे – आभा. सतत हसरी, खेळकर, मजा-मस्ती करणारी, जेमतेम १०-११ वर्षांची ही मुलगी. अभ्यासात तशी जेमतेम, पण साऱ्यांना आवडायची ती तिची निरागसता. मात्र अचानक काय झालं काही कळेना. ती मुलगी एकदम अबोल झाली. हसण्याखिदळण्याचा तिचा आवाजही बंद झाला. नेमकं काय झालं असावं?
तिच्याच वयाचा, तिचा एक मित्र आहे शुभम. तोही अचानक गप्प झालेला. खरंतर तसा तो चुणचुणीत, घरातलं शेंडेफळ म्हणून सगळ्यांचा लाडोबा. प्रत्येक स्पर्धेत, परीक्षेत भाग घ्यायला तत्पर असायचा. त्याच्या बोलण्यातून, प्रश्न विचारण्यातून त्याची हुशारी लपणं शक्यच नव्हतं. परंतु काहीतरी, कुठेतरी बिनसलं आणि ‘नाही’ हा शब्द जणू डिक्शनरीतच नसलेला हा मुलगा काहीही करायला ‘नाही’ म्हणू लागला. अगदी लोकांमध्ये मिसळायलाही तयार होईनासा झाला.
या दोन्ही मुलांच्या बाबतीत नेमकं काय झालं असावं? मित्रमैत्रिणींत, घरात तर तसं काही विशेष जाणवण्याइतपत घडलं नव्हतं. पुन्हा पुन्हा काय झालं, असं विचारण्यानं उत्तरही मिळणार नव्हतं. सुरुवातीला ‘किती दिवस गप्प बसणार हा?’, ‘हिला गोंधळ न घालता राहायला थोडीच जमणार?’ अशा काहीशा घरच्यांच्या प्रतिक्रिया होत्या. दोघांमध्ये काही बिनसलंही नव्हतं. दिवसेंदिवस अलिप्त होत जाणारी ही मुलं मात्र सगळ्यांच्याच चिंतेचा विषय बनली. तोंडाला अडकवलेल्या कुलपाची चावी काही केल्या कोणालाच मिळेना! एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडे किंवा समुपदेशकाकडे घेऊन जावं काय, इथपर्यंत मनात विचार येऊ लागले. प्रत्येकाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू होते; पण म्हणावं तसं यश काही मिळत नव्हतं.
एके दिवशी त्या दोघांच्या शिक्षिकेनं त्यांना एक आरसा हातात दिला. “कसा आहे रे हा?” ह्या प्रश्नानं दोघंही थोडेसे गोंधळलेच. ते जणू मनातल्या मनात म्हणू लागले- ‘हा काय प्रश्न आहे? आरसा कसा असणार?, ‘वाह! किती सुंदर आरसा आहे... असं आपण कधी म्हणतो का? आणि एखादा आरसा खरंच सुंदर असेल तर त्याच्यावरचं नक्षीकाम किंवा त्याला जर कोणत्या आकर्षक चौकटीमध्ये बसवलं तर तो आरसा सुंदर असतो! बरोबर ना?’ मॅडमना काय झालं कळायला काही मार्ग नव्हता. दोघं अजूनही गोंधळलेलेच होते. मॅडम पुढे बोलू लागल्या, “एखाद्या आरशावर धूळ बसली असेल तर आपण साफ का करतो?” मॅडमचे प्रश्न आज अगदीच विचित्र होते.
“अर्थात, स्वच्छ दिसण्यासाठी.” शुभमकडून उत्तर आलं.
“कोण स्वच्छ दिसण्यासाठी? आरसा की तुझं प्रतिबिंब?” शुभम पुन्हा गोंधळला. “अर्थात, दोन्ही. कारण, तो स्वच्छ असल्याशिवाय मी कशी नीट दिसणार?” आभानंही बोलायला सुरुवात केली.
“म्हणजेच तुझ्या स्वार्थासाठी तू त्याची काळजी घेतेस. बरोबर? त्या बदल्यात त्याला काय मिळतं?” आणखी एक प्रश्न.
“त्याला कशाला काय मिळायला हवं?” शुभमनं तुटकच उत्तर दिलं.
“नक्की?” मॅडमना काय सांगायचं ते बहुतेक शुभमला कळलं. “पण तो निर्जीव आहे ना!” त्यानं अगदी थेट मॅडमना विचारलं. “अगदी बरोबर. पण तो त्याचं काम अगदी चोख करतो. त्याच्याशिवाय आपलं अडतं म्हणून आपण त्याची काळजी घेतो. इतरांचं अडून राहावं, माझी किंमत ह्या सगळ्या माणसांना कळावी असं त्याला वाटत असेल का?”
मॅडम प्रश्न विचारायच्या काही थांबत नव्हत्या. “पण जर वाटलं तरी त्याला काय करता येणार? पारा गेलेला आरसा फेकूनच द्यायचा असतो.” शुभम आता पटापट उत्तरं देऊ लागला.
“हो ना? पण म्हणून आपणही आपल्यावरचा पारा जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची असते. माझं काम मी चोख करत असेन, कोणत्याही अपेक्षेशिवाय, तर नक्कीच आपल्याकडे कोणाचं दुर्लक्ष होणार नाही ह्याची खात्री हवी.”
मॅडमचा मुद्दा दोघांच्याही चांगला लक्षात आला. मॅडमनी पुन्हा विचारल, “तुमची सर्वाधिक जवळची किंवा आवडती व्यक्ती कोणती?”
दोघंही विचारात पडले.
“मला सांगायलाच हवं असं नाही काही. पण जी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते ती छान दिसते, खूप सुंदर राहते, फॅशनेबल असते म्हणून आवडते की तुम्हाला तिचा स्वभाव आवडतो? आपला रंग, दिसणं ह्यापेक्षा आपल्यामधल्या गुणांच्या तेजानं लकाकायला हवं, आरशासारखं! नाही का?”
अगदी सोप्या उदाहरणातून मॅडमनी प्रश्न सोडवायला घेतला. परंतु खरी गरज आहे ती आपण आपल्या आरशाकडे वेळोवेळी लक्ष द्यायची. आपण आपल्या कामात, व्यापात अडकतो आणि नकळत आपला मुलांशी संवाद कमी होतो. मुलांचे-आपले संबंध हे मुलांच्या वागण्यातून दिसत असतात. जणू काही आपली मुलं हा आपला आरसा! आपलं प्रतिबिंब त्यांच्यात दिसतं. म्हणूनच, त्यांच्यावर धूळ बसत नाही ना, तो आरसा चकाकतो तर आहे ना, ह्याकडे आपणच बघायला हवं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link