Next
थंडीत भूक का वाढते?
वैद्य अश्विन सावंत
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

थंडीमध्ये भूक वाढण्यामागे शास्त्रीय, सांस्कृतिक व मानसिक कारणे आहेत. शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळ्यात वातावरणाचे व शरीराचे घटलेले तापमान. सभोवतालच्या घटलेल्या तापमानामुळे शरीराचे तापमानही घटते. मानवी शरीराचे तापमान हे सरासरी ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्य़क असते. शरीराचे तापमान घटणे हे आरोग्याला बाधक होणार असल्याने शरीर  तापमान वाढवण्याचे प्रयत्न सुरू करते. कमी झालेल्या तापमानाला वाढवण्याचा सहज मार्ग म्हणजे ऊर्जानिर्मिती आणि ऊर्जानिर्मितीचा सोपा मार्ग अन्नसेवन असे हे सरळ गणित आहे. शरीराला जाणवणाऱ्या  थंडीमुळे  उष्णता निर्माण करण्यासाठी शरीराची  आहारसेवनाची इच्छा वाढते  आणि आपल्याला या थंडीच्या दिवसांमध्ये भूक लागते.

थंडीमध्ये सारखे खावेसे वाटते, ते का?

‘थंडीमध्ये सारखे खावेसे वाटते’ याचे पुढचे  कारण शास्त्रीय व मानसिक दोन्ही प्रकारांत मोडणारे आहे. जे सूर्यप्रकाशाशी संबंधित आहे. थंडीमध्ये दिवस लहान असतो, सूर्य लवकर मावळतो आणि लवकर अंधार पडतो. मानवी मस्तिष्कामध्ये अंधाराचा संबंध अन्नसेवनाशी जुळलेला आहे. हजारो वर्षांपासून माणूस उदरनिर्वाहासाठी दिवसभर घराबाहेर राहायचा व अंधार पडला की प्राण्यापक्ष्यांप्रमाणेच आपल्या निवाऱ्याच्या जागी परतायचा. दिवसभर अंगमेहनत करून थकलेला तो घरी आल्यावर  अन्न सेवन करायचा. हजारो वर्षांच्या या स्मृती आपल्या मस्तिष्कामध्ये अजूनही जतन आहेत आणि अंधार पडला की त्या स्मृती आपल्याला अन्नग्रहणास उद्युक्त करतात. या सर्व स्मृतींच्या परिणामी  हिवाळ्यात जेव्हा अंधार लवकर पडतो तेव्हा अन्नसेवन अधिक आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा दिवस मोठा असतो, अंधार उशिरा पडतो, तेव्हा अन्नसेवन कमी, असे गणित मेंदूत तयार झालेले आहे. भले २१ व्या शतकात दिवसभर अंगमेहनत करत नसलो तरी किंवा दिवसभर चरत राहिलो तरी अंधार पडला की आपल्याला खावेसे वाटते, उगीच, शरीराला गरज नसतानाही !

आयुर्वेदीय दृष्टिकोन

थंडीमधल्या वातावरणाच्या परिणामी शरीरामध्ये होणारा अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजे ‘अग्नीप्रदीप्ती.’ इथे अग्नी म्हणताना ‘भूक व पचनशक्ती’ असे दोन्ही अर्थ घेतले आहेत. ‘थंडीमध्ये अग्नी का वाढतो?’ या प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदशास्त्रात पुढील शब्दांमध्ये दिले आहे, ‘थंड  ऋतूमधल्या गार वाऱ्यांमुळे  शरीराची त्वचेवरील सूक्ष्म रंध्रे संकोचतात, घाम येत नाही. त्यामुळे घामावाटे  शरीरातली उष्णता जी बाहेर टाकली जात असते ती फेकली जात नाही. याच्या परिणामी शरीरातली उष्णता आतल्या आत कोंडते आणि शरीरामधील अग्नीला भडकावते. जसजशी थंडी वाढत जाईल तसतसा अग्नी अधिकाधिक प्रदीप्त होत जातो व भूक अधिकाधिक वाढत जाते.’ एकंदरच थंडीमध्ये अग्नी इतका प्रदीप्त होतो की सामान्य मनुष्य एरवी त्याला न पचणारे अन्नपदार्थसुद्धा थंडीमध्ये पचवू शकतो. बलवान माणसाचा अग्नी तर इतका प्रदिप्त होतो की पचायला अतिशय जड आहारसुद्धा सहज पचवू शकतो. त्यामुळेच थंडीमध्ये पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते.

थंडीमध्ये पुन्हा पुन्हा गोड का खावेसे वाटते?

थंडीत आधिक्याने गोड का खावेसे वाटते, याचे शास्त्रीय कारण म्हणजे  एकदा  गोड खाल्ले की  त्या पदार्थामधील साखर रक्तामध्ये एकदम  वाढते आणि जशी वाढते तशीच अचानक कमीसुद्धा होते. प्रत्यक्षात समुद्राची लाट यावी त्याप्रमाणे साखरेची मोठी लाट रक्तामध्ये येते व  लाट निघून गेल्यावर जसे पाणी ओसरते तशीच वास्तवात रक्तातली साखरेची पातळी घटते. अचानक साखरेच्या पातळीमध्ये झालेली घट ऊर्जेचा अभाव निर्माण करते आणि ऊर्जेसाठी भूक जागरूक होते. दुसरीकडे रक्तात साखरेची  कमतरता झाली तरी त्यापूर्वी अतिप्रमाणात वाढलेल्या साखरेसाठी इन्शुलिनसुद्धा खूप प्रमाणात तयार झालेले असते. साखर घटली तरी ते इन्शुलिन तसेच राहते. रक्तामध्ये इन्शुलिन वाढलेले असल्याने पुन्हा आपली भूक जागरूक होते, अन्नसेवनाची इच्छा होते आणि आपण पुन्हा अन्नसेवन करू पाहतो, तेसुद्धा गोड. नेहमीच  गोड खाणाऱ्यांमध्ये गोड खाण्याचे हे चक्र इतर ऋतूंमध्येसुद्धा सुरू असते. मात्र थंडीमध्ये सर्वसामान्य लोकसुद्धा आवडीने गोड खातात. थंडी संपली तरी पुढेही गोड खाण्याचे प्रमाण तसेच राहते. त्यामुळे  स्थूलत्वासंबंधित विविध विकार निर्माण होऊ शकतात.

गोड खाण्यामागील मानसिक कारण
हिवाळ्यात गोड खाण्याचीच इच्छा का होते, याला हेसुद्धा एक मानसिक कारण असते की आपल्या थंडीच्या आठवणी या गोडधोड खाण्याशी जोडलेल्या असतात. थंडीत भूक लागतेय म्हणून चटणी-भाकरी, पोळी-भाजी किंवा वरण-भात खाण्याऐवजी तीळगूळ, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, उडदाचे लाडू, तीळपोळी, गूळपोळी, गाजरहलवा असे गोड पदार्थ खावेसे वाटतात. कारण थंडी म्हटले की पौष्टिक आहार असेच आपले गणित असते, कारण तसे संस्कारच लहानपणापासून झालेले आहेत.

थंडीत गोड खाण्यामागील सांस्कृतिक कारण

थंडीतल्या गोडधोड खाण्याचा संबंध सणसंस्कृतीशीसुद्धा जुळलेला आहे. लहानपणापासून दिवाळी आणि थंडी यांचा असा काही अतूट संबंध आपल्या स्मृतीमध्ये घट्ट बसलेला असतो की थंडी म्हटले की दिवाळी आठवते आणि दिवाळी आठवली की गोडधोड,चमचमीत खाणे आठवते. जो मुद्दा  दिवाळीला लागू होतो, अगदी तसाच तो जुळतो  ३१ डिसेंबरच्या रात्रीलासुद्धा! लहानपणापासून ३१ डिसेंबरच्या रात्री भरथंडीमध्ये केलेल्या धम्माल मेजवानीच्या अशा काही आठवणी मनात रुजलेल्या असतात की थंडीचे गार वारे अंगाला सुख देऊ लागले की त्या मेजवानीच्या आठवणी मनात फ़ेर  घालू लागतात आणि गोडधोड,रुचकर,चमचमीत, खाण्याची अनावर इच्छा आपल्याला होऊ लागते.

थंडीतला आहार : पुढची तजवीज!?

थंडीमध्ये माणूस खा-खा करतो, भरपूर खातो, याचे एक वेगळे स्पष्टीकरणसुद्धा दिले जाते. थंडी आली की माणसाला अतिरिक्त आहार सेवन करून शरीरावर चरबी जमवून ठेवावीशी वाटते. त्यासाठी साहजिकच भूक वाढते आणि माणूस अतिप्रमाणात अन्नसेवन करून शरीरामध्ये चरबीचा साठा करू पाहतो. मात्र आजच्या आधुनिक जगामधील संपन्न माणसाला अन्नाच्या दुर्भिक्षाला तोंड देण्याची वेळ येणार नसल्याने थंडीमध्ये केलेला चरबीचा साठा शरीराला स्थूल बनवून अनारोग्यास आमंत्रण देऊ शकतो, हेसुद्धा ध्यानात घ्यायला हवे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link