Next
तो बाउंडरीहिटरच !
विशेष प्रतिनिधी
Friday, October 05 | 01:00 PM
15 0 0
Share this story

तो मुळातच बाउंडरीहिटर आहे...त्याचे बॅकलिफ्टचे कौशल्य एवढे जोरदार आहे, की त्याच्याच जोरावर त्याचा धावा काढण्याचा झपाटा जोरदार असतो.... साडेआठ वर्षांचा असताना तो एमआयजीच्या अकादमीत प्रथम आला, तेव्हा त्याच्या स्ट्रोकची रेंज, शरीराजवळ खेळण्याची शैली आणि बॅकफूट गेम पाहूनच खात्री पटली होती... हा चमकणारच! … कसोटीच्या पदार्पणातच १३४ धावा फटकावणाऱ्या पृथ्वी शॉचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी सांगत होते. दररोज विरारपासूनचा प्रवास आणि अतोनात कष्ट करत वर आलेल्या पृथ्वी शॉने गुरुवारी राजकोटच्या मैदानावर पदार्पणातलेच पहिले शतक झळकावले, तेव्हा मुंबईत जल्लोष साजरा झाला. त्याचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणेच त्याच्या आजच्या खेळातही चौकारांचा झपाटा जबरदस्त होता. अवघ्या ९९ चेंडूंमध्ये त्याने शतक ठोकलेच, त्याचबरोबर आपल्या १३४ धावांच्या वेगवान कामगिरीतही अर्ध्याहून अधिक धावा १९ चौकारांमधून कमावल्या.

 प्रशांत शेट्टी यांनी ‘झी मराठी दिशा’ला सांगितले, सचिन तेंडुलकरही आज म्हणाला,   की पृथ्वी नऊ वर्षांचा असताना मी त्याचा खेळ बघितला होता व तेव्हाच खात्री पटली होती की याची कामगिरी लक्षवेधी ठरणार. पृथ्वीने गेल्या २० महिन्यांत अंडर नाइनटीन, रणजीपासून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटपर्यंत वाटचाल करताना घेतलेले परिश्रम अफाट आहेत. त्याच्या बॅकलिफ्टचा त्याला त्रास होईल, अशी काहींना भीती होती. मात्र त्याची या शैलीवर हुकमत जबरदस्त असल्याने त्याला ती कधी आड आलेली नाही. व्हाइट बॉलवरून रेड बॉलवर खेळताना त्याने व्यवस्थित जुळवून घेतले. व्हाइट बॉल व रणजीचे पिच या दोन्ही गोष्टी फलंदाजांना अनुकूल असतात. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र रेड बॉल मऊ असल्याने स्विंग अधिक होतो आणि गोलंदाजांना अनुकूलता असते. परंतु पृथ्वीच्या अंगात मुळातच वेगवेगळ्या वातावरणात जुळवून घेण्याची क्षमता असल्याने त्याने २० महिन्यांत कसून तयारी केली.

खडतर आयुष्य
पृथ्वीचे वडील पंकज शॉ यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय होता. पृथ्वी आठ वर्षे विरारमध्ये राहायचा. तिथे संतोष पिंगुळकर यांनी पृथ्वीची क्रिकेटमधील गुणवत्ता हेरली. पृथ्वीने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच पिंगुळकरांच्या क्रिकेटगोल्ड क्रिकेट अकादमीमध्ये धडे गिरवण्यास सुरुवात केली. मग मात्र, त्याच्यातील गुणवत्ता पाहून त्याला अधिक चांगल्या सुविधा असलेल्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवण्यासाठी वडील आणि प्रशिक्षकांनी हालचाली सुरू केल्या आणि वांद्रे येथील रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेत त्याला प्रवेश घेतला. त्यावेळी पृथ्वी तिसरीत शिकत होता. त्या काळात त्याचे वडील पहाटे पाच वाजता उठून, डबा बनवून, त्याला विरारहून वांद्र्याला घेऊन यायचे. तो अभ्यास आणि क्रिकेटचा सराव असे दोन्ही करत असे. ती दोन वर्ष पृथ्वी आणि त्याच्या वडिलांसाठी फारच कठीण गेली. कारण दररोज विरार ते वांद्रे किंवा विरार ते चर्चगेट या लोकलच्या प्रवासानं पृथ्वीची चांगलीच दमछाक होत होती. शाळेत शिकताना तो एमआयजी क्रिकेट अकादमीमध्येही सराव करीत होता. एमआयजीमध्ये प्रशांत शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीचा पाया पक्का होऊ लागला. तर रिझवी शाळेचे कोच राजू पाठक यांचेही या काळात मोलाचे मार्गदर्शन लाभले.

लहानपणी विरार-वांद्रे प्रवास करून आल्यावर कित्येकदा त्याची झोप पूर्ण व्हायची नाही, जेवणाची आबाळ व्हायची, पण या सर्व समस्यांनीच त्याला कणखर बनवले. धावा काढण्यावाचून आपल्याला पर्याय नाही, असा दृढनिश्चय त्याने केला आणि त्यानंतर मुंबईकरांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतच त्याचे क्रिकेट बहरले, असे प्रशांत शेट्टी सांगतात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link