Next
वडे आणि आमसुलाची चटणी
वसुधा गवांदे
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


पुढच्या आठवड्यात पितृपंधरवडा सुरू होत आहे. या दिवसांत नैवेद्यासाठी जो स्वयंपाक केला जातो, तो वैशिष्ट्यपूर्ण असतो. म्हणजे गवार-भोपळ्याची भाजी, तांदळाची खीर, वडे, बटाट्याची सुकी भाजी, कोशिंबीर आणि आमसुलाची चटणी इत्यादी. आज मी तुम्हाला या पदार्थांपैकी वडे आणि आमसुलाची चटणी सांगणार आहे. आजकाल ही चटणी केली जात नाही आणि वडे बाहेरून करून घेतले जातात. परंतु हे वडे बाहेरून करवून घेण्याची गरज नाही, कारण ते करायला अतिशय सोपे आहेत. बरं, हे पदार्थ आपण एरवीही न्याहारीला करू शकतो. वड्यांसाठी दोन वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ व पाव वाटी चणाडाळ घ्या. तिन्ही जिन्नस एकत्र करून चक्कीतून जाडसर दळून आणा. आपण भरड काढतो तेवढं जाडसर पीठ हवं. त्यात आवडत असेल तर ओवा आणि चवीपुरतं मीठ घालून आपण पोळ्यांसाठी कणीक भिजवतो तसं ते पीठ भिजवायचं आणि छोटे छोटे गोळे करून त्याचे वडे थापायचे. कढईत तेल चांगलं गरम झालं की त्यात वडे सोडा म्हणजे आपोआप छान फुगून वर येतात. हे वडे पितृपक्षात तांदळच्या खिरीबरोबर खातात. परंतु जर खीर नसेल तर एरवी तुम्ही ते खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता. दुसरा पदार्थ म्हणजे आमसुलाची चटणी. ही चटणी फारच चविष्ट होते. चार-पाच आमसुले थोड्याशा कोमट पाण्यात भिजत घालायची. अर्ध्या-एक तासानं त्यात एक चमचा जिरं, थोडंसं आलं, आपल्या अंदाजानं गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून ते मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचं की झाली चटणी तयार. मिक्सरमध्ये चटणी वाटताना थोडंसं पाणी घाला म्हणजे चटणी सरसरीत होईल. जास्त पाणी घालून पातळ करू नका. ही चटणी आंबट-गोड-तिखट अशी छान लागते आणि जिभेला चव येते. तेव्हा ते दोन पदार्थ नक्की करून बघा.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link