Next
महासमन्वयाची वारी!
उल्हास पवार
Friday, July 12 | 02:45 PM
15 0 0
Share this story


विचार, विवेक आणि वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे वारी. माणूस विचार करायला शिकतो, पण विचारांना विवेकाची जोड नसेल तर त्याचे काय होते हे आपण पाहतो. विचारांना विवेकाची जोड लाभते तेव्हा त्यातून वैराग्य प्राप्त होते. वैराग्य म्हणजे सगळे सोडून हिमालयात जायचे असा अर्थ नाही, तर सगळंकाही असूनदेखील माझं काहीही नाही हा विचार आहे. हे सारे आपल्याला वारीतून शिकायला मिळते म्हणून पंढरीची वारी महत्त्वाची आहे.

वारकरी संप्रदायाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. वारकरी संप्रदाय हा अद्वैत भक्ती तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आणि वैश्विक मानवता यांचा पुरस्कार करणारा भागवत संप्रदाय आहे. पुराणकाळात शैव आणि वैष्णव यांचा संघर्ष झालेला होता. आणखी एक नाथसंप्रदायदेखील होता. या तिन्ही संप्रदायांना जोडणारा भागवत संप्रदाय आहे.

लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी विठ्ठलाचे वर्णन ‘विठठल : एक महासमन्वय’ या शब्दांत केला आहे. भारतीय आध्यात्मिक संस्कृतीच्या नात्याने जगाला ही देणगी वारकरी अर्थात भागवत संप्रदायाने दिलेली आहे, अशी श्रद्धा असणारा मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे. ते अभंग गाताना ते प्रथमत: संतशिरोमणी ज्ञानेश्वरांना ते वंदन करतात. त्यानंतर ‘जय जय राम कृष्ण हरी’ या हरीनामाचा गजर करतात. नंतर पांडुरंगाच्या रुपाचे वर्णन करणारे अभंग गातात. वारकरी संप्रदाय हा अद्वैत भक्तीचा सिद्धांत मांडणारा, त्याचे तत्त्वज्ञान सांगणारा आहे. या नामगजराचे महत्त्व सांगताना बाळासाहेब भारदे सांगायचे, की रामायण, महाभारत आणि भागवत अशा तिन्हींचे सार नामगजरामध्ये आहे. म्हणून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.’

हनुमंत हा दास्यभक्तीमध्ये सर्वोच्च शिखरावर असणारा भक्त आहे. रामायणामध्ये जेव्हा सेतू बांधायचा होता तेव्हा हनुमंत व त्याची वानरसेना रामनाम लिहून दगड टाकताहेत, साक्षात प्रभू रामचंद्र तिथे उभे आहेत. वानरांनी व हनुमंताने टाकलेले दगड पाण्यावर तरंगताहेत हे पाहून प्रत्यक्ष रामाने एक दगड समुद्रात टाकला असता तो मात्र बुडाला. याचे कारण त्याने हनुमंताला  विचारले असता तो म्हणाला, हे सामर्थ्य रामनामाचे आहे. त्यामुळेच आम्ही श्रद्धेने टाकलेले दगडसुद्धा तरंगत आहेत. नामसंकीर्तनाचे महत्त्व असते ते असे. आणि त्यालाच पंढरीच्या वारीमध्ये महत्त्व असल्याचे दिसून येते. कारण हाच जयघोष करीत साधा भोळा वारकरी पंढरीला चालत जातो. 

राजकारण्यांना स्तुती आवडत असते. बाळासाहेब भारदे नेहमी असं म्हणायचे, ‘तीन क, का आणि की माणसाला आयुष्यातून उठवण्यासाठी पुरेसे असतात. ते म्हणजे कनक, कांता आणि कीर्ती.’ ते खरेच आहे. त्याच्या आहारी जो जातो त्याचे अध:पतन सुरू होते. परंतु देवाची स्तुती ही काही मिळवण्यासाठी नसते, तर भवसागरात तरून जाण्यासाठी आणि ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ याची अनुभूती घेण्यासाठी देवाची स्तुती संतजनांनी केली आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती अशा क्रमाने प्रवास करायचा असे अध्यात्मात सांगितलेले आहे. 

बाळासाहेब भारदे सांगायचे, ‘सामान्य माणूस देहवादी असतो. ज्ञानी माणूस हा संदेहवादी असतो आणि संत हे विदेहवादी असतात. त्याचे दर्शन अनेकानेक अभंगातून आपल्याला होत असते.’ 

पंढरीच्या वारीच्या निमित्ताने सर्वच संतजनांनी सामाजिक समरसता काय असते, हे जगाला दाखवून दिले आहे. भागवत संप्रदायातील सर्व संतांनी कायम वैश्विकहिताची कल्पना केलेली आहे. नामदेवमहाराजांना विचारले, की आपण कोण त्यावर नामदेवांनी सांगितले होते, की मी जातीचा शिंपी आहे मात्र मी माणसाच्या कपड्याचे माप घेत नाही तर विश्वाचे माप घेतो.’ असा वैश्विक विचार करणारे संतजन हे आपले वैभव आहे. या आनंदात लीन होत पंढरीच्या वारीचा आनंद घेत विठ्ठलभेट घेणे हा नुसता सोहळा नाही, तर त्याला व्यापक असा सामाजिक अर्थ आहे. तो जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच डॉ. ढेरे हे विठ्ठलाला महासमन्वय का म्हणतात हे आपल्या लक्षात येऊ शकेल.

(शब्दांकन : पराग पोतदार)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link