Next
पाण्यासाठी दाहीदिशा
दिलीप नेर्लीकर
Friday, January 25 | 05:00 PM
15 0 0
Share this storyविख्यात इंग्रजी लेखक जॉन डननं इसवी सन १६२४ मध्ये एक कविता लिहीली. त्यातल्या महत्त्वाच्या ओळी अशा आहेत “No man is an Island, Every Man is a piece of the continent, a part of the main, Therefore never send to know for whom the bell tolls, it tolls for thee”  डनचे हे शब्द पर्यावरणासाठी आणि आम्हा नागरिकांसाठी किती समर्पक आहेत बघा. दक्षिण आफ्रिकेत पाण्याचे हाल आहेत, हजारो मैल दूर मला त्याचे काय, असं म्हणत हात झटकणारे आपण सारे याच भयावह समस्येला लवकरच सामोरे जाणार आहोत, पण याचं भान कुणाला आहे? हजारो लिटर पाणी वापरून आपली कार चकचकीत करणाऱ्याला, शॉवरखाली तासभर अंघोळ करणाऱ्याला, आपले रसायनदूषित पाणी काहीही विचार न करता नदीत सोडणाऱ्या कारखान्यांना, पिकं तरारून यावीत म्हणून भरमसाठ रासायनिक खतं वापरणाऱ्या शेतकऱ्याला, कोणालाही त्याची खंत नाही, खेद तर नाहीच नाही!

The Day Zero म्हणजे एक थेंबभर पाणीही कोणालाही वापरायला मिळणार नाही असा दिवस. असा दिवस येईल का हो? हो, तो आलाय आणि तो लवकरच आपल्या देशातही येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे शहर बहुधा पहिलंवहिलं शहर असावं की तिथल्या राज्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करण्यास असमर्थता जाहीर केली. तिथल्या कूपनलिकाही कोरड्या ठणठणीत पडल्या. तिथल्या हॉटेलांत, सुपरमार्केटमध्ये, पाणी संपल्याचे बोर्ड लावण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. जे केप टाऊनमध्ये घडलं ते काही दिवसांत आपल्या मोठमोठ्या शहरांतही घडू शकतं, हे मानायला आपली मानसिकता बदलणं अनिवार्य आहे. एका पाहणीनुसार आपल्यास देशातही सन २०५०पर्यंत हा Day Zero नक्कीच येऊन थडकणार आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाशसंशोधन संस्थेनं ग्रेस (Gravity and climate Recovery Experiment- GRACE) या प्रकल्पाद्वारे १४ वर्षं अभ्यास करून पृथ्वीवरील १९ धोक्याच्या जागा शोधल्या आहेत. त्यात आपल्या देशातील उत्तरेकडील आणि पूर्वेकडचा काही भाग आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, चीनमधील उत्तर आणि पश्चिम भाग आणि मध्यपूर्वेतील काही भाग प्रामुख्यानं येतात. या ठिकाणी Day Zero इतर भागांपेक्षा लवकर अवतरेल असा कयास आहे. यावर उपाय करणं हे खरं म्हणजे आपल्याच हातात आहे. आपल्या देशातील राजेंद्रसिंह राणा यांच्यासारख्यांनी छोटे छोटे बंधारे बांधून सुरू केलेला जोहाडसारखा पाणी अडवा-पाणी जिरवा प्रकल्प, राजस्थानमधील वाळवंटात हिरवळीची किमया करू शकतो. अशा संकल्पना, असे प्रकल्प आपण एक अनिवार्यता म्हणून स्वीकारायला हवेत.

मंगळावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आणि सगळ्या शास्त्रज्ञांना आनंद झाला, कारण काय तर पाणी असणं म्हणजे जीवसृष्टी असण्याची शक्यता असं मानलं जातं. इतकं अनन्यसाधारण महत्त्व असणारं पाणी ही निसर्गानं मानवाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे. इतकंच नव्हे तर पाणी ही निसर्गातील शाश्वत असणारी गोष्ट. पृथ्वीवरील पाणी आकाशात बाष्प म्हणून जातं आणि तेच पाणी पुन्हा पावसाच्या रूपानं पृथ्वीवर परततं आणि हे जलचक्र अव्याहतपणे चालू आहे. पण, पावसाचं बहुतांश पाणी पृथ्वीचा तीनचतुर्थांश भाग व्यापणाऱ्या सागरात जातं आणि पिण्यासाठी अयोग्य बनतं. काही पाणी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या हिमनदांमध्ये जाऊन गोठतं आणि मानवाच्या हस्तक्षेपाच्या पलिकडे जातं.  उर्वरित पाण्याचा अगदी छोटा भाग आपल्या मानवजातीच्या वाट्याला येतो आणि हा अत्यल्प भाग आपण पाण्याचे अब्जाधीश असल्यासारखे उधळतो.

जगाची लोकसंख्या साधारण ७.५ अब्ज आहे आणि २०५०च्या आसपास ती १० अब्ज होईल. मग ‘पाण्यासाठी दाहीदिशा आम्हा फिरविशी जगदीशा’ असं म्हणत आपला भार देवावर सोडायला आम्ही तयारच आहोत. ही विषण्ण करणारी आकडेवारी पहिली की अंगावर काटा येतो. आज जगात सुमारे ८५ कोटी लोकांना स्वच्छ पाण्यापासून वंचित राहावं लागतं. जगभरात प्रतिवर्षी पाच वर्षांखालील किमान तीन लाख मुलं अस्वच्छ पाण्यामुळे मृत्युमुखी पडतात, पण लक्षात कोण घेतो?
आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो, की पृथ्वीवर निसर्गानं निर्माण केलेल्या कोणत्याही गोष्टीमागे कार्यकारणभाव असतोच. सागरतळाशी असणारे कोरल रीफ्स बनवतो पालीप नावाचा एक छोटा जीव. आपल्याभोवती कल्शियम कार्बोनेटचं कडक आवरण तयार करून त्याच्या समुद्रतळाशी तो वसाहती तयार करतो. रंगबिरंगी अशा त्या वसाहती डुबकी मारून पाहणं हा सागरकिनाऱ्यावरील पर्यटनाचा एक भाग मानला जातो. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे या वसाहती मोठ्या प्रमाणावर नामशेष होऊ लागल्या आहेत आणि त्याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारं पाण्याचं प्रदूषण, कारखान्यांनी नदीवाटे सोडलेलं ब्लिचिंग पावडरमिश्रीत पाणी यांच्या जिवावर उठतं, मग निसर्गानं त्यांच्यावरील अत्याचाराचा बदला घेतला तर मग दोष कुणाचा? सागराच्या उदरात साधारण वीस हजार प्रकारच्या वनस्पती सापडतात. यातल्या काही काही दुर्धर आजारावर मात करणारी औषधं तयार करण्यासाठी वापरल्या जातात. याही आपण नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. स्वत:च्या पायावर धोंडा टाकून घेणं म्हणजे हेच तर नव्हे?

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link