Next
जखम पुन्हा भळभळून वाहू लागली…
दिवाकर देशपांडे
Friday, April 26 | 05:00 PM
15 0 0
Share this story

रविवारी ईस्टरच्या दिवशी सात ठिकाणी घडलेल्या आणि ३५० पेक्षाही अधिक लोकांचे बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोटांमुळे श्रीलंकेतील तीन दशकांच्या वांशिक यादवीची बरी होत आलेली जखम पुन्हा भळभळून वाहू लागली आहे. तेथील तामिळींचे ऐतिहासिक बंड मोडून काढल्यानंतर शांततेची दहा वर्षे पूर्ण होत असतानाच हे भीषण बॉम्बस्फोट झाल्याने श्रीलंका पुन्हा एकदा ज्वालामुखीच्या तोंडावर जाऊन बसली आहे. आता हा संहार इथेच थांबणार आहे, की भविष्यात तो आणखी विक्राळ स्वरूप धारण करणार आहे, अशी धास्ती लंकावासीयांच्या मनात आहे. या हल्ल्यांची जबाबदारी आता इस्लामिक स्टेट किंवा आयसीसने स्वीकारली आहे. श्रीलंकेत आयसीसची पाळेमुळे कितपत खोल गेली आहेत, हे स्पष्ट झाल्याशिवाय हा हल्ला एकमेव घटना असेल की हल्ल्यांच्या मािलकेतील ती पहिली कडी असेल हे सांगता येणार नाही. कारण गुरुवारी पुन्हा एक बॉम्बस्फोट झाला आहे.

रविवारच्या या हल्ल्याचे वैशिष्ट्य हे, की त्यात प्रामुख्याने ईस्टरच्या प्रार्थना चालू असलेले चर्च आणि पर्यटकांनी भरलेली पंचतारांकित हॉटेल यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामागचा उद्देश स्पष्ट दिसतो, तो म्हणजे एक विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य करून धार्मिक विद्वेष निर्माण करणे व दुसरे पर्यटन व्यवसायावर आघात करून देशाच्या अर्थव्यवस्थेला लक्ष्य करणे. खरे तर श्रीलंकेतील ख्रिश्चन समुदाय हा अल्पसंख्य आहे व तो अत्यंत शांत आहे. हा समुदाय तामिळ व सिंहली असा दोन्ही वंशाचा आहे. देशातील वांशिक दंगलीत हा समाज तटस्थ होता, त्यामुळे बंडखोर तामिळ किंवा सत्ताधारी सिंहली यापैकी कुणीही त्यांच्या वाटेला जात नव्हते. असे असताना यावेळी नेमके या शांत समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे, त्याचे कारण न्यूझीलंडमध्ये एका मशिदीत एका ख्रिश्चन माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराचा बदला घेणे असल्याचे दहशतवाद्यांनी प्रसारित केलेल्या एका व्हीडिओतून स्पष्ट झाले आहे.
तिसरी गोष्ट अशी, की या हल्ल्यांची पूर्वसूचना स्थानिक सुरक्षादलांना मिळाली होती, पण त्यांनी पुरेशी दक्षता घेतली नाही परिणामी हा हाहाकार घडून आला. सध्या श्रीलंकेत तेथील अध्यक्ष, पंतप्रधान आणि माजी अध्यक्ष यांच्यात जबरदस्त राजकीय सुंदोपसुंदी सुरू आहे. सर्व देशाचे लक्ष त्याकडेच लागले आहे. या गाफिलीचा फायदा घेऊन अतिरेक्यांनी हे स्फोट घडवून आणले आहेत.
आयसीसचे इस्लामी जगताचे स्वप्न सर्वज्ञात आहे व त्यासाठी ते ज्या देशांत मुसलमान आहेत, तेथे त्यांच्यामार्फत हे स्वप्न साकार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना एकाच खिलाफतीच्या अधिपत्याखालील मुस्लीम जगत निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी ते जगातल्या विविध देशांतून मुस्लीम योद्धे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे योद्धे सीरियापासून इंडोनेशियापर्यंतचे सर्व मुस्लीम देश आणि भारत, श्रीलंकासारखे मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशातून मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विशेषत; ज्या देशांत मुस्लीम अल्पसंख्य आहेत, त्या देशांत मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चिथावणी देऊन असे योद्धे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतात केरळमधून आणि मुंबईजवळ कल्याण, दिवा, आंध्र प्रदेशात हैदराबाद येथून असे काही भारतीय योद्धे आयसीसच्या गळाला लागले होते आणि अजूनही लागत आहेत. या तथाकथित योद्ध्यांचा माग घेणे व त्यांना वेळीच पकडण्याची कामगिरी भारतीय गुप्तचर संस्था सतत करत आहेत. नुकतेच वर्धा व हैदराबाद येथून असे काही योद्धे जेरबंद करण्यात आले. भारतात भाजप सरकार आल्यानंतर मुस्लिमांत असंतोष वाढेल व मोठ्या प्रमाणात योद्धे मिळतील, असे आयसीसला वाटत होते, पण तसे फारसे घडले नाही. केरळ व तामिळनाडूतले आयसीसचे प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे आयसीसने श्रीलंकेत तामिळ व सिंहली जनतेत मुस्लिमांविषयी असलेल्या संशयाचा फायदा घेऊन तेथे हातपाय पसरले आहेत, असे सकृतदर्शनी दिसते. कारण श्रीलंकेत हे बॉम्बस्फोट घडवून आणणारी नॅशनल तौहित जमात ही मुस्लीम संघटना तामिळनाडूतही आहे. तेथे तिने योद्धे मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे या संघटनेने श्रीलंकेत आपले जाळे पसरलेले दिसते.
तामिळ यादवीच्या काळात श्रीलंकेतील मुस्लीम तटस्थ होते, पण तामिळ अतिरेक्यांना मुस्लिमांनी साथ दिली नाही त्यामुळे तामिळींनी त्यांना लक्ष्य केले होते. श्रीलंकेतील सिंहली राष्ट्रवाद कुप्रसिद्ध आहेच. त्यामुळेच तामिळींनी बंड केले होते. या राष्ट्रवादाचा फटका वेळोवेळी मुस्लिमांनाही बसला आहे, त्यामुळे मुस्लिमांत असंतोष होताच. वांशिक यादवीच्या काळात हा असंतोष आणखी वाढला होता. त्यामुळे मुस्लिमांमध्येही कट्टरता वाढण्यास सुरुवात झाली होतीच. त्याचा नेमका फायदा आयसीसने उचललेला दिसतो.

श्रीलंकेतील आयसीसची पाळेमुळे खणून काढणे आता आवश्यक आहे. त्यासाठी श्रीलंका सरकारला आपली गुप्तचर व सुरक्षा व्यवस्था पुन्हा मजबूत बनवावी लागेल. भारत अनेक वर्षांपासून आयसीसच्या कारवायांचा माग ठेवत आहे. त्यामुळे भारताने श्रीलंकेला आवश्यक ती मदत देण्याचे ठरवले आहे व ते भारताच्याही फायद्याचे आहे, कारण भारताच्या शेजारी आयसीसने मूळ धरणे भारताला परवडणारे नाही.
दुसरी गोष्ट ही, की सिंहलींच्या कडव्या राष्ट्रवादाला आळा घालून अल्पसंख्य मुस्लिमांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी श्रीलंका सरकारला प्रयत्न करावे लागतील. एका यादवीत श्रीलंका होरपळून निघाली आहे व आता कुठे स्थिरस्थावर होत असताना मुस्लिमांनी कट्टरतावादाकडे वळून आयसीसला थारा देणे श्रीलंकेला परवडणारे नाही.

सीरियात आयसीसचे मुख्य ठाणे होते, ते अमेरिकेने बऱ्यापैकी नष्ट केले आहे, पण आयसीस म्हणजे फक्त शस्त्र घेऊन लढणारे इस्लामिक योद्धे नाहीत. ती एक मानसिकता आहे व ती विविध देशांतल्या कट्टर मुस्लिमांच्या मनात ठसलेली आहे. ती नष्ट करणे अत्यंत जिकिरीचे आहे. समाजमाध्यमांतून आयसीसच्या तत्वज्ञानाचा प्रसार होतो आहे. तो रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. भारताने हे आव्हान आतापर्यंत बऱ्यापैकी पेलले आहे, पण भारतीय समाजात मुस्लीमद्वेष वाढीस लागला तर आयसीसचा कर्करोग फैलण्यास वेळ लागणार नाही. सामाजिक व धार्मिक सलोखा हेच आयसीसला खरे उत्तर आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link