Next
कर्तव्याची व्याख्या
मिथिला दळवी
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


अभिषेकला शाळेतून रिमार्क आला होता. टीचरने चार वेळा सांगूनही त्याने क्राफ्टचं मटेरियल शाळेत नेलं नव्हतं.
अभिषेक पाचवीमधला. शाळेत अभ्यास, खेळ अशा अनेक आघाड्यांवर नावाजला जात होता. इतक्या दिवसांमध्ये त्याला कधीही रिमार्क मिळाला नव्हता. त्यामुळे तो घरी आला तेच चिडून...
त्याच्या आईवर तो खूप चिडला होता, पालकांचा व्हॉट्स अॅप ग्रुप होता. त्याच्यावरपण कोणीतरी ते लिहिलं होतं, पण नेमकं त्याची आई रेखानं त्या दिवशी ग्रुपवरचे चॅट्स पाहिले नव्हते. काही कारणानं ती बिझी होती आणि राहून गेलं होतं.
अभिषेकचं म्हणणं, आईनं ग्रुप रोजच्या रोज पाहिला असता तर ही वेळ आलीच नसती. रेखाचं म्हणणं, ‘पण, अभिषेकचंही हे काम आहे, मला येऊन सांगणं.’
दोघांच्या वादात प्रकरण एवढं चिघळलं की रेखानं त्याला एक फटका दिला....परिणाम असा झाला की अभिषेकनं आता शाळेतच जाणार नाही असं जाहीर केलं.
एकेक करता मी अभिषेकबद्दल काही गोष्टी जाणून घेत होते. अभिषेकला रेखानं याआधी कधीही मारलं नव्हतं, रागवलीही फारशी नव्हती कधी ती त्याला. तिच्या मते तसा अभिषेक गुणी होता. अनेक गोष्टी आम्ही त्याला विचारून त्याच्या कलेनं घेऊन समजावून सांगूनच करतो.
अभिषेकचं दप्तर भरण्यापासून सगळं रेखा करायची. त्यामुळे अभिषेकनं दप्तरात हात घातल्यावर हव्या त्या गोष्टी तिथे मिळायची त्याला सवय झाली होती. हाच प्रकार इतर अनेक गोष्टींसाठी होता.
त्यामुळे अशा सोयी असणं, हा अभिषेकला आपला हक्क वाटू लागला होता. जोडीला अभिषेकला कधीही रिमार्क मिळाला नाही, याचा वारंवार उल्लेख. खरंतर रिमार्क न मिळायचं काही श्रेय रेखाचंही होतं. पण ते सगळंच्या सगळं अभिषेकला द्यायला रेखाही उत्सुक होतीच की! कारण अभिषेकसाठी ती करायची ते सगळं तिचं कर्तव्यच आहे, असं ती
समजत होती.
अनेक सोयीसुविधा  मिळणं, मिळत राहणं, हा आपला हक्कच आहे,  असं वाटणाऱ्या मुलांबद्दल मागच्या लेखापासून आपण बोलतो आहोत.  आणि हक्क आणि कर्तव्य या एका नाण्याच्या दोन बाजू असण्याबाबत आपण अगदी शाळकरी दिवसांपासून (मुख्यतः आपल्या देशाच्या राज्यघटनेसंदर्भात) ऐकत असतो. पालकत्वाच्या बाबतीत मात्र त्याचा एक वेगळाच पैलू दिसून येतो. मुलं एखादी गोष्ट त्यांचा हक्क समजतात ते स्वतःच्या कर्तव्याच्या बळावर नाही, तर पालकांनी ती आपली कर्तव्यं म्हणून शिरोधार्य मानलेली असतात म्हणून! एका नाण्यावर हक्क लिहिलेलं असावं, आणि दुसऱ्या वेगळ्याच नाण्यावर कर्तव्य लिहिलेलं असावं, अशी ही परिस्थिती. पटदिशी लक्षात न येणारी!
आज पंचविशी ते पस्तिशीत असणाऱ्या स्थिर आणि सुस्थितीची पार्श्वभूमी असणाऱ्या तरुणवर्गाबद्दल जगभरातल्या मानसतज्ज्ञांना एक गोष्ट आढळून येते आहे ... ती म्हणजे या मुलांची ताण सहन करण्याची तोकडी क्षमता. याची कारणं काय असावीत? एक तर सोशल माडियाचं वास्तवापासून फटकून राहणारं आभासी जग आणि त्यातले इन्स्टण्ट लाईक्स हे याला जबाबदार आहेच, पण एक ठळक बोट या मुलांच्या पालकांकडेही वळतं आहे.
काय होतं आहे नेमकं? मुलांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अतिरेकामुळे, वास्तव जगातल्या खाचखळग्यांपासून ही मुलं कोसो मैल दूर
राहत आहेत.
अभिषेकच्या आईनं बोलता बोलता  एक गोष्ट सांगितली, “आम्ही कधी आवाज चढवूनही नाही बोललो अभिषेकशी. कायमच त्याला वाईट वाटणार नाही याची काळजी घेतली, अगदी केजीमध्येही एका शर्यतीत तो पाचवा आला होता, तेव्हाही आम्ही त्याला बक्षीस आणून दिलं होतं.”
“का बरं?” मी विचारलं.
“त्याला वाईट वाटू नये म्हणून....पण आम्ही एक केलं, त्याला कसून सरावही करायला लावला. आज अभिषेक खेळातही बक्षीस मिळवतो आहे ना!”
“खेळातलं यश हे काही केवळ सरावानं येत नाही ना, त्यासाठी मुलाचा तसा कलही असायला हवा ना.”, मी म्हटलं.
“हो ना, अहो तो आहेच आणि आम्हीही त्याला देतो आहोतच ना पुरेसं प्रोत्साहन, बक्षिसं देतो. मी करते सगळी त्याची कामं ते त्यासाठीच ना!”
अभ्यास आणि खेळ दोन्हीकडे बक्षिसं मिळत असतील, तर सगळ्या सुविधा मिळत राहतील आणि, कोणतीही स्वतःच्या कामांची जबाबदारी घेतली नाही तरी चालेल, असा छुपा संदेश यातून अभिषेकला मिळत होता. वर त्याला घरून शाळेतून कधीही काहीही ऐकून घ्यावं लागलं नव्हतं, आणि ऐकून घ्यावं लागलं नाही, याचाही वारंवार कौतुकवजा उल्लेख तो ऐकत होताच.
एका लहानशा रिमार्कमुळे सगळे एवढे हळवे होण्यामागे या कौतुकाचा मोठाच हात होता.
छोट्या  ताणाच्या प्रसंगातून वातावरण स्फोटक बनलं होतं.
छोट्या ताणांना तोंड देताना खरंतर आपल्याला मोठ्या ताणतणावांना तोंड द्यायचं बळ मिळत असतं. मुलांना येणारे छोटे मोठे निराशेचे, हताशपणाचे क्षण हे रोजच्या जगण्यात स्वाभाविक आहेत, आवश्यकही आहेत. तो जगण्याचा, नव्या गोष्टी शिकण्याचा, मोठं होण्याचा अपरिहार्य भाग आहे. त्यामुळे छोट्या निराशेच्या क्षणांचा पालक म्हणून आपण किती बाऊ करतो, त्याचं किती ओझं वाहतो, हे ठरवणं आपल्याच हातात आहे. अभिषेकच्या कोणत्याही रिमार्क न मिळण्याचा एवढा गाजावाजा झाला नसता, तर कदाचित प्रकरण एवढं चिघळलंच नसतं. खेळ आणि अभ्यासाच्या दिवसभरातल्या आखीवरेखीव शेड्युलमुळे सगळ्या गोष्टी हातात तयार देणं, हे रेखानं आपलं कर्तव्य मानलं नसतं, तर अभिषेकनेही तो आपला हक्क मानला असता का?
मुलांप्रती आपल्या कर्तव्याच्या व्याख्येमध्ये आधुनिक पालकांनी कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या आहेत, हे पाहणं आज फार महत्त्वाचं आहे. आपली कर्तव्यांची व्याख्या व्यवहार्य, वास्तववादी असेल, तर मग मुलांची हक्काची भावनाही त्याच्याशी सुसंगत अशीच असेल. त्यासाठी पालक म्हणून आपल्याला काय करता येईल, पाहूया पुढच्या लेखात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link