Next
मनोबलाची रुंद किनार!
मनीषा सोमण
Thursday, August 15 | 06:30 PM
15 0 0
Share this story

‘एस. ए. इनामदार रेडिमेड ब्लाउजच्या श्वेता इनामदार, डॅलस येथे BMM मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला रवाना झाल्या.’ ही बातमी वाचून काहींना वाटले असेल, त्यात काय एवढे?
श्वेता इनामदारने तिथे जाऊन येणं हे तिच्या जिद्दीचं द्योतक आहे. जिवावरच्या दुखण्यातून उठलेली आणि आधाराशिवाय चालू शकत नसलेली श्वेता एकटी अमेरिकेला जाऊन, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी संमेलनात (BMM) सहभागी होते आणि यशस्वी होऊन परत येते, हे विशेष आहे.   
हा अनुभवकथन करताना श्वेता म्हणते, “माझ्यासाठी खूपच अवघड पण तितकाच आनंददायी अनुभव होता. माझी शारीरिक अवस्था अशी आहे की फार वेळ बसणं, तेही वातानुकूलित वातावरणात, मला त्रासदायक होतं. कोणाच्याही आधाराशिवाय लांबवर चालणं जमत नाही... ते सगळं मला झेपलं आणि मी जगण्याची नवी उमेद घेऊन अमेरिकेहून आले, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.”
काही वर्षांपूर्वी अगदी थोड्या उंचीवरून पडण्याचं निमित्त होऊन तिच्या कंबरेपासून खालच्या संवेदनाच गेल्या. या परिस्थितीत असणाऱ्या व्यक्ती व्हीलचेअरशिवाय हालचाल करू शकत नाहीत. मात्र श्वेता मनोबळावर पुन्हा उभी राहिली. तिच्या पावलांना जमीन कळत नसूनदेखील ती काठीच्या आधाराने चालू लागली. आधीच्याच विश्वासानं पुन्हा व्यवसायाचा डोलारा सांभाळू लागली. नवी भरारी घेण्याचं स्वप्न बघू लागली. मानसिक कणखरपणा शारीरिक अपंगत्वावर मत करू शकतो, याचं श्वेता हे उत्तम
उदाहरण आहे.
अमेरिकेला BMM ला जायचं आणि तिथं रेडिमेड ब्लाउजचं दालन थाटायचं, असं  तिनं ठरवलं तेव्हा एकटीनं इतका लांबचा प्रवास करण्याचा निर्णय धाडसी होता, असं सर्वांनाच वाटलं. श्वेता म्हणते, “मी एकटीनं जाणं किती मूर्खपणाचं आहे, हे पटवून देताना अनेकांनी माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचमुळे मी अधिक जिद्दीनं ठरवलं की मी जाणारच. मात्र तिथे जाऊन खरंच काही त्रास झाला असता तर मात्र मी कदाचित कोलमडले असते. पण तसं व्हायचं नव्हतं ही देवाची कृपा.”  
“जवळपास २८ तासांचं फ्लाईट होतं. इतका वेळ थंड वातावरणात बसणं माझ्यासाठी खूपच अवघड होतं. तिथे चालावं खूप लागायचं. एखाद्यावेळी कधी हेलपाटली गेले तर बाजून चालणाऱ्या कोणाचाही आधार घ्यायला मला कसलाही कमीपणा वाटला नाही. हॉटेलपासून संमेलनाचं ठिकाण बरंच लांब होतं. रोज जवळपास १२ तास काम करत होते. त्याचाही काही त्रास झाला नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सामान बांधण्यापासून मला आधार देण्यापर्यंत प्रत्येकवेळी पुढे आलेले मदतीचे हात आणि कौतुकाची थाप.”

कौतुकाची थाप मिळाल्याचे काही अनुभव?
“तिथे ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे भेटल्या. त्यांनी फार कौतुकानं विचारपूस केली. संगीतकार अशोक पत्की, गायिका आर्या आंबेकर, अभिनेता मकरंद अनासपुरे अशा अनेकांनी माझ्यापेक्षा माझ्या कामाचं कौतुक केलं, हेही माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या अडचणीच्या काळात माझी उमेद वाढवणारा हात माझ्या पाठीवर पडला आहे.”
“अगदी वयाच्या विसाव्या वर्षापासून मी अशा परीक्षांना तोंड देते आहे. त्याची सुरुवात झाली वडिलांच्या अचानक निधनापासून. आजही प्रत्येक बऱ्यावाईट प्रसंगी बाबांची आठवण येतेच. नंतर खूप परीक्षा दिल्या. प्रत्येकवेळी वाटलं चला आता ही परीक्षा शेवटची. पण असा विचार करतानाच काहीतरी नवी अडचण दत्त म्हणून समोर उभी राहते. आता या अडचणीना तोंड देत नव्या उमेदीनं जगायला, नवी स्वप्नं बघायला शिकले आहे!”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link