Next
खरी परीक्षा
अनुजा हर्डीकर
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story

सहामाही परीक्षा अगदी तोंडावर आल्यात, पण परीपेक्षा तिच्या आईला, मृणाललाच अभ्यासाचे जास्त टेन्शन होते आणि त्यामध्ये काही चुकीचे आहे असे परीला वाटत नव्हते की मृणाललादेखील. मृणाल रोज स्वतःच्या दिनचर्येसोबत परीसाठीही अभ्यासाचे नियोजन करत होती. जे विषय जास्त महत्त्वाचे आहेत त्यासाठी जास्त सराव, अधिक प्रश्न, भरपूर वर्कशीट्स असे सगळे साहित्य मृणालाने जमवून ठेवले होते. मृणालने बनवलेली ही अतिरिक्त वर्कशीट्सची फाईल परीने एकदा जरी हातात घेतली असती तरी मृणाल खुश होणार होती. पण आईला बरे वाटावे म्हणूनही ती फाईल हातात घ्यायला परी तयार नव्हती. “अग, तू जेवढे प्रश्न काढले आहेस तेवढे तर आमच्या पुस्तकातही नाहीत. तुला लहान असताना अभ्यास करायला मिळत नव्हता का ग? की माझ्या अभ्यासाची इच्छा तूच पूर्ण करते आहेस.”
परी अगदीच काही सामान्य मुलगी नाही, पण हुशार असूनही खूप छान मार्क मिळवते असेही नव्हते. म्हणून मृणालला वाईट वाटे. मृणालाच्या वाटण्याकडे जराही लक्ष न देता परी तिच्या व्यापात व्यग्र असायची. नेहमी स्वतःच्या खोलीत रमलेली ही परी नेमके करते तरी काय? परीला खूप मैत्रिणी आहेत असे नाही त्यामुळे मैत्रिणींबरोबर फिरायला जाणे, टाइमपास करणे, मोबाइलमध्ये तासनतास रमणे अशा कोणत्याच गोष्टी ती करत नाही. परीक्षा, पुढच्या वर्षी दहावी, त्यानंतर कोणत्या शाखेकडे जायचे अशा कोणत्याच गोष्टीची तिला जणू पर्वाच नाही. तिच्या ह्या बेफिकीर जगण्याचीही मृणालला अनेकदा काळजी वाटायची. परंतु परीशी कित्येकदा बोलूनही तिच्या मनाचा तळ काही समजत नव्हता. “सोडूनच देतेस का एकदाच्या शाळा आणि परीक्षा, म्हणजे निदान मलातरी टेन्शन नको...” मृणालचा एके दिवशी अगदीच धीर सुटला. त्यावर हसून परी म्हणाली, “आणि मी जर असं केलं तर तुझ्या मैत्रिणींना काय सांगशील?” असे म्हणून परी पहिल्यांदा मृणालला काहीतरी दाखवायला लागली.
“हे काय काय लिहिलं आहेस तू?” समोरच्या सात-आठ मोठमोठ्या वह्या आणि त्यातले फोटो पाहून मृणालने विचारले. “बारावीनंतर एकेक करून मी ह्या सगळ्या ठिकाणी जाणार आणि ह्या लोकांसोबत काम करणार.” त्यातल्या बऱ्याचशा जागा ह्या मृणालला माहीतही नव्हत्या आणि ज्या लोकांसोबत ती काम करायचे म्हणत होती त्यातला एकही चेहरा ओळखीचा दिसत नव्हता.
त्यातले बरेचसे लोक हे निसर्गाच्या पूर्णपणे सान्निध्यात राहणारे होते. परीच्या वयाची काही मुले औपचारिक शिक्षणासोबत स्वतःच्या भिन्न क्षमता आजमावून बघणारे वेगवेगळे उद्योग, प्रयोग करत होती. गेली दोन वर्षे परी ह्या सगळ्यांशी जोडली होती. त्यांचे आयुष्य रोजनिशीच्या माध्यमातून ते एकमेकांना कळवत होते. एकमेकांच्या भाषा शिकत होते. ह्या सगळ्यात बोटीवर असणाऱ्या बाबाचा परीला पाठिंबा होता. ‘मला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळे करायचे आहे’ हे तिने सर्वांसमोर सांगितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशा देत होता. वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या, प्रसिद्धीपासून अलिप्त असणाऱ्या लोकांशी तिचा परिचय करून देत होता. बाबा फक्त ओळख करून द्यायचा, पुढचा संवाद परीचा होता. जगभरातल्या लोकांशी जोडल्याचा तिला आनंद होत होता, पण आईला हे सारे किती पटेल ह्याचा अंदाज नसल्याने तिने आईला काही सांगितले नव्हते.
परीक्षेच्या दिवसांत आपण आईला अधिक टेन्शन दिले नाही ना? ... परी विचारात पडली. समोरचे फोटो आणि ह्या साऱ्या परीच्या वयाच्या आणि इतर अनेक लहानमोठ्यांशी झालेले पत्रव्यवहार ती बघत होती. मृणालच्या मनातही कधी असे आले नव्हते की परी इतक्या सगळ्यांशी बोलत असेल. इतके दिवस मृणालला वाटे की परी म्हणजे केवळ पुस्तकात रमणारी एक मुलगी आहे. तिच्या वेगवेगळ्या विषयांवरील वाचनाने तिला किती समृद्ध केले आहे, हे आज ती प्रत्यक्ष पाहत होती.
“मला माहीत होतं की हे जेव्हा कधी मी तुला सांगेन तेव्हा तू चिडणार नाहीस. तुम्ही दोघं मला कायम समजून घ्याल. माझ्या शाळेतल्या इतर कोणाच्या पालकांना हे आवडलं नसतं कदाचित. पण तुम्ही मला स्वातंत्र्य देता, माझ्यावर विश्वास ठेवता. इतरांसारखं तुम्ही सतत माझ्यावर लक्ष ठेवत नाही.” असे म्हणत परी आईजवळ आली. “मोठ्या परीक्षेची तयारी करतेस तू…. ह्या छोट्या चाचण्यांची काळजी कशाला करू? आता परीक्षा तर माझीच आहे,” असे हसत म्हणत मृणालनेही परीला जवळ घेतले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link