Next
अग्निशिखा
अमिता बडे
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story
आगीशी खेळ म्हणजे जिवाशीच खेळण्यासारखे! हे काम महिला करूच शकत नाहीत, या मानसिकतेला छेद देत देशातील पहिली महिला अग्निशमन अभियंता होण्याचा मान नागपूर येथील हर्षिनी बापूराव कान्हेरकर यांच्याकडे जातो. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रामध्ये हर्षिनी यांनी स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे.  
लहानपणापासूनच हर्षिनी टॉमबॉय आणि स्वभावाने अतिशय जिद्दी होत्या. त्यांच्या वडिलांची फिरतीची नोकरी होती. त्या सात-आठ वर्षांच्या असताना वडिलांची नाशिकला बदली झाली. नागपूरला मोठ्या घरात राहणारे हे कुटुंब नाशिकला एका इमारतीमध्ये वास्तव्यास आले. त्याबद्दल हर्षिनी यांनी सांगितले, “आपल्या मुलांना सगळ्या गोष्टींची सवय असायला हवी, यावर बाबांचा कटाक्ष होता. नागपूरला आमचं मोठं घरं होतं. नाशिकला बदली झाल्यानंतर लहान जागेत कशी तडजोड करायची, आसपासच्या लोकांमध्ये कसं मिळून मिसळून वावरायचं हे आपल्या तिन्ही मुलांना माहीत व्हावं, या उद्देशानं त्यांनी एका इमारतीमध्ये घर घेतलं आणि आम्ही तिथं राहू लागलो.” नाशिक येथील ‘सीडीओ मेरी हायस्कूल’मध्ये प्रवेश घेतला. ही शाळा केवळ मुलींचीच होती. दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण याच शाळेत झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांची बदली पुन्हा नागपूरला झाली.
हर्षिनी यांनी नागपूरमधील लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयात अकरावी विज्ञानशाखेत प्रवेश घेतला. हर्षिनी यांना गणित फारसे आवडत नव्हते, परंतु मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून त्यांनी  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या जोडीने गणित हाही  विषय घेतला. बारावी झाल्यानंतर हर्षिनी यांनी पहिल्या महिला पायलट शिवानी कुलकर्णी यांची मुलाखत वाचली. त्याचा प्रचंड प्रभाव पडला आणि युनिफॉर्म सेवेबद्दल आकर्षण निर्माण झाले. भविष्यात आपणही युनिफॉर्म असलेल्या क्षेत्रात जाऊन देशसेवा करायची, हे बीज त्यांच्या मनात रुजले. आपणही वायुदलामध्ये जावे, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी आईवडिलांना त्याबद्दल सांगितले.  आईवडिलांनी प्रोत्साहन दिले.
हर्षिनी यांचे युनिफॉर्मबद्दलचे आकर्षण त्यांच्या सर्व मित्रमंडळीना माहीत झाले होते. तेव्हा त्यांच्या एका मित्राने कॉलेजमधील एन.सी.सी.मध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हर्षिनी तेथे गेल्या, परंतु ‘तुला यायला उशीर झालाय. अर्ज घेणे कधीच बंद झालेय, तुझा अर्ज घेता येणार नाही,’ असे त्यांना सांगण्यात आले. परंतु जिद्दी स्वभावाच्या हर्षिनी तेथेच उभ्या राहिल्या आणि त्यांचा अर्ज घेण्याबद्दल त्या अधिकाऱ्याला विनवू लागल्या. त्याचवेळी कॉलेजमधील एन.सी.सी.चे कमांडर तेथे आले. त्यांनी हर्षिनी यांना तेथे पाहिले. त्यांना हर्षिनीविषयी कुतूहल वाटले. त्यांनी हर्षिनी यांची मुलाखत घेऊन त्यांना प्रवेशही दिला. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने गती मिळाली. एन.सी.सी.च्या कठोर ट्रेनिंगमधून हर्षिनी घडत होत्या. प्रखर राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले जात होते. वायुदलामध्ये जाण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत, एकाग्रता हे सारे गुण हर्षिनी यांनी एन.सी.सी.च्या प्रशिक्षणावेळी आत्मसात केले. हर्षिनीमधील नैपुण्य पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही त्या लाडक्या झाल्या होत्या.


अकरावी-बारावीच्या वर्षांत हर्षिनी यांनी कॉलेजमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काही केले नव्हते. मात्र तेरावीला गेल्यावर त्यांनी कॉलेजमधील स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घ्यायला सुरुवात केली. त्याबद्दल त्यांनी सांगितले, “कॉलेजमध्ये मला कुणी फारसं ओळखत नव्हतं. आपली स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी असा ध्यास मी घेतला. त्यामुळे तेरावीला असताना मी त्या वर्षी कॉलेजमधल्या १५ स्पर्धांमध्ये सहभागी झाले, त्यातील आठ स्पर्धा जिंकले. त्याच वर्षी विद्यापीठ पातळीवर चित्र आणि घोषणा स्पर्धेत कॉलेजतर्फे माझी निवड झाली होती. त्या स्पर्धेत मला पहिलं पारितोषिक मिळालं. ही बातमी जेव्हा उपप्राचार्य मॅडमना कळली तेव्हा त्या मला शोधत शोधत आल्या. तेव्हा मी प्रयोगशाळेत होते. तिथे येऊन त्यांनी माझं अभिनंदन केले… हळूहळू कॉलेजमध्ये माझी ओळख निर्माण झाली.”  
हे सर्व सुरू असताना एन.सी.सी.च्या एअरविंगमध्ये हर्षिनी एअरोमॉडेलर होत्या. २००० मध्ये एअरफोर्सतर्फे एन.सी.सी.च्या प्रशिक्षणार्थींसाठी घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये त्या सहभागी झाल्या. इतकेच नाही, त्यांनी एअरोमॉडेलिंगच्या स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करत ब्राँझ मेडल मिळवले होते.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यांनतर पुढे काय करायचे, म्हणून त्यांनी एम.बी.ए.ला प्रवेश घेतला, पण त्यांना त्यात काडीमात्र रस वाटेना. त्या शिकत होत्या, पण त्यात त्यांचे मन रमत नव्हते. अशातच एका मित्राने हर्षिनी यांना ‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज’ची माहिती दिली. त्याबद्दल हर्षिनी सांगतात, “युनिफॉर्मबद्दल आकर्षण सर्वांनाच माहीत होतं. त्यामुळे एका मित्रानं मला नागपूरमधल्या नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये अॅडमिशन सुरू असून तूही प्रयत्न कर, असं सांगितलं. मग मी आणि माझी मैत्रिण पल्लवी दोघींनी जाऊन फॉर्म विकत घेतला. या कॉलेजबद्दल काहीच माहिती नव्हती. बाबांनी मला त्यासाठी प्रोत्साहन तर दिलंच, शिवाय त्या कॉलेजची सर्व माहिती काढून माझ्यासमोर ठेवली.”
‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज’ हे भारतातले एकमेव आणि जगातले दुसऱ्या क्रमांकाचे कॉलेज. पूर्णत: मुलांचे कॉलेज. या कॉलेजमध्ये एक मुलगी अ‍ॅडमिशनसाठी आली असल्याची बातमी कर्णोपकर्णी झाली. तिला पाहण्यासाठी अनेक जण तिथे आले. ही घटना होती २००१ या वर्षातील. वास्तविक १९५६ मध्ये या कॉलेजची स्थापना झाली होती. तेव्हापासून ते २००१ पर्यंत या कॉलेजमध्ये एकाही मुलीने प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे हर्षिनी तेथे गेल्या तेव्हा ‘ही इथे कशाला आली, ही चुकून इथे आली का’ असे भाव तेथील कर्मचाऱ्यांच्या  चेहऱ्यावर होते. तिथले विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षकही तिच्याकडे पाहून हसत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हर्षिनी वडिलांसह कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेल्या. तेव्हा तिला ‘मुली या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत,’ असे सांगितले गेलं. यावर ‘या कोर्ससाठी मुली अर्ज करू शकत नाहीत, असं तुम्ही तुमच्या जाहिरातीत म्हटलेलं नाही. मग आम्ही अर्ज का करू नये?’ असा सवाल हर्षिनी यांनी केला. मग तो फॉर्म त्यांनी घेतला. त्यानंतर तिने  प्रवेशपरीक्षाही दिली. काही दिवसांनी  फायर कॉलेजच्या परीक्षेत पास झाल्याची तार घरी आली. ते पाहून हर्षिनी यांना पहिला धक्का बसला. आपण पास झालोत, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांनी पल्लवीला फोन केला, तेव्हा तिला तार आली नसल्याचे समजले. त्यामुळे आपल्या एकटीचीच निवड झालीय, ही मोठी जबाबदारी आल्याची जाणीव पहिल्यांदा  झाली. हर्षिनी मुलाखतीसाठी गेल्या, तेव्हा कायम जीन्स, टीशर्टमध्ये वावरणाऱ्या हर्षिनी यांनी  जाणीवपूर्वक पंजाबी ड्रेस घातला होता. ‘हा कोर्स खूप अवघड आहे, तुला जमेल का, खूप कठीण टास्क असतात, कडक शिस्तीचं पालन करावं लागेल, इथेच राहावं लागेल, तू एकटीच मुलगी आहेस, अर्धवट सोडून तर जाणार नाहीस, आग कितीतरी वेळ विझत नाही.. अगदी दोन-तीन महिनेदेखील. हे सगळं तुला झेपेल का?’ अशी सरबत्ती त्यांच्यावर झाली. मात्र या सर्व प्रश्नांना हर्षिनी यांनी ‘मी का करू शकणार नाही, मला स्वत:विषयी पूर्ण विश्वास आहे, तुम्ही मला संधी तर देऊन पाहा, ते मी करू शकले नाही तर मग अपात्र ठरवा. त्याच्याआधी नाही.’ असे चोख उत्तर दिले.
‘मेडिकल टेस्ट’मध्ये मुलींसाठी असे वेगळे निकष नव्हते.  शेवटी ‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज’मध्ये हर्षिनी यांची निवड झाली. ही बातमी नागपुरात वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण कुटुंबासाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट होती.
प्रवेश मिळाला, पण एक प्रश्न होताच, तो म्हणजे त्यांच्या राहण्याचा. कारण ते निवासी कॉलेज होते आणि कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सगळे मुलगे राहत होते. अखेर त्यांना घरून कॉलेजला येण्याची परवानगी मिळाली. फायर कॉलेजमध्ये त्यांच्या दोन शिफ्ट्स होत्या. सकाळची आणि दुपारची. कोर्सच्या पहिल्याच दिवशी त्या युनिफॉर्म घालून कॉलेजला गेल्या, तो प्रसंग आजही त्यांच्या डोळ्यांसमोर तरळतो. या पहिल्या दिवसाची आठवण त्या सांगतात, “युनिफॉर्म घालून कॉलेजला आले, तेव्हा तिकडे एक वरिष्ठ उभे होते. त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना म्हटलं, अ‍ॅडमिशन घ्यायला आले तेव्हा तुम्ही मला हसला होतात. तेव्हा ते खूप खजिल झाले. त्या दिवशी त्यांनी माझं स्वागत केलं. हा प्रसंग आजही माझ्या स्मरणात आहे. कारण माझी तेव्हा हर्षिनी म्हणून नव्हे तर मुलींची प्रतिनिधी म्हणूनच ओळख तयार होत होती.”
हे शिक्षण खूप खडतर होते. फोर्स पाइप उचलायला लागायचे, लॅडर खांद्यावर उचलून न्यायला लागायची. हे सगळे टास्क मुलांसाठीही कठीण होते. मुलींवर कोणी ठपका ठेवू नयेत, याची त्या नेहमीच काळजी घेत असत. साडेतीन वर्षाच्या या कोर्समध्ये त्या कधीच गैरहजर राहिल्या नाहीत किंवा कॉलेजमध्ये उशिरा पोहोचल्या नाहीत. शेवटचे सहा महिने प्रॅक्टिकल वर्क होते. तीन महिने कोलकोता येथील बेहला फायर स्टेशन आणि तीन महिने दिल्लीच्या लक्ष्मीनगर फायर स्टेशन येथेही प्रशिक्षण होते. या काळात त्यांनी कित्येक फायर कॉल्स अटेंड केले. दिल्लीत फायर ऑफिसर म्हणूनही काम केले. हे सगळे करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती, पण कधीच कोणत्या टास्कला त्यांनी ‘नाही’ म्हटले नाही. कठीण वाटतील, अशा गोष्टी चांगल्या रीतीने व्हाव्या यासाठी त्या सगळ्यांच्या आधी दहा मिनिटे लवकर जाऊन सराव करत. स्क्वॉडमध्ये ‘राइट मार्कर’ असतो. त्यांच्या इन्स्ट्रक्टरला त्यांच्यावर इतका विश्वास होता की, मुलांऐवजी ते हर्षिनी यांनाच ‘राइट मार्कर’ म्हणून कमांड द्यायचे. ही खूप मोठी गोष्ट होती.
कोर्स संपल्यानंतर हर्षिनी यांचे ओ.एन.जी.सी. (मेहसाणा, गुजरात) येथे नेमणूक झाली. तिथला अनुभव वेगळा होता. एक मुलगी म्हणून त्यांना कधीच वेगळी वागणूक मिळाली नाही. या ठिकाणी त्यांनी भरपूर फायर कॉल्स अटेंड केले. त्याबद्दल त्या सांगतात,  ‘तिथे वेगळं अग्निशमनदल नसल्याने आम्हालाच लोकल कॉलही अटेंड करावे लागायचे. मी ऑन शोअर आणि ऑफ शोअर अशा दोन्ही ठिकाणी काम केलंय. ऑफ शोअरमध्येही मुलींना पाठवलं जात नसे, कारण ही ड्युटी समुद्रात असायची. मात्र हट्टाने मी तिथे गेले आणि काम केलं.” त्यानंतर हर्षिनी यांची मुंबईला बदली झाली. सध्या त्या  ‘ओएनजीसी’त ‘वरिष्ठ अग्निशमन अधिकारी’ म्हणून कार्यरत आहेत.
अतिशय साध्या पण स्पष्टवक्त्या, कडक शिस्तीच्या आणि धाडसी असणाऱ्या हर्षिनी यांना संगीताचीही आवड आहे. त्या  गिटारही छान वाजवतात. वेळ मिळेल तेव्हा गिटारवर त्या आपली आवडती गाणी वाजवून छंद जोपासतात. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलींना काय सल्ला द्याल, असे विचारले असता त्यांनी सांगितले, “मुलींमध्ये खूप क्षमता असते. ती दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे. तुम्हाला अशी संधी मिळते तेव्हा तुम्ही मेहनत घ्यायला कमी पडू नका.”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link