Next
निसर्गाची कुरबूर
दिलीप नेर्लीकर
Friday, March 29 | 04:00 PM
15 0 0
Share this story


अमेरिकेतील विख्यात साप्ताहिक न्यूजविकनं २००६च्या ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या कव्हरवर एका तांबड्या, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या बेडकाचा फोटो छापला होता. हा रंगबिरंगी बेडूक कोस्टारिका या देशातील घनदाट जंगलात दिसायचा. न्यूजविकनं त्या फोटोखाली  हेडलाइन दिली होती ‘जागतिक तापमानवाढीचा पहिला बळी.’ सन १९८८च्या सुमारास हा बेडूक अचानक त्या जंगलातून गायब झाला. त्याच्या अशा गायब होण्यामागे कारण शोधताना प्राणिशास्त्रज्ञांना एक वेगळंच कारण सापडलं. त्या जंगलात त्यांना एक वेगळ्या प्रकारची बुरशी सापडली, जी पूर्वी कधीही त्यांनी तिथे पाहिली नव्हती. त्या बुरशीचा मागोवा घेताना त्यांच्या लक्षात आलं, की ती फक्त वाढलेल्या तापमानातच वाढू शकते आणि तिचा परिणाम वन्य जीवांवर होतो. या बुरशीमुळे बेडकाना जंतूसंसर्ग होतो आणि या नवीन जिवाणूंशी लढण्याचं सामर्थ्य या रंगबिरंगी बेडकांत निर्माण होण्याआधीच ते निर्वंश झाले आणि जागतिक तापमानवृद्धीचा पहिला बळी ठरण्याचा त्यांना ‘मान’ मिळाला.
थंडीच्या दिवसांत निसर्ग डासांच्या उत्पत्तीवर बरेच निर्बंध घालतो. त्यामुळे त्यांची उत्पतीही कमी होते, पण जागतिक तापमानवाढीमुळे थंडी कमी झाली. मलेरिया आणि इन्फ्लुएन्झासारखे आजार भारतासारख्या खंडप्राय देशात वाढीस लागले आहेत. कॅनडात थंडी अत्यंत कडाक्याची असते. या थंडीत छोटे बीटल (छोटा कीटक) थिजून जायचे, पण तापमानवृद्धीमुळे हे छोटे कीटक मोकाट सुटले आणि त्यांनी हजारो एकरांतील पाइन वृक्षांची जंगलं कुरतुडून फस्त केली. वृक्षांमुळे तर हवेतील कार्बन-डाय-ऑक्साइड शोषून घेतला जातो आणि त्यामुळे तापमानवृद्धीला पायबंद बसतो, पण अशी जंगलंच गायब होऊ लागली तर काय होईल याचा विचारच पर्यावरणप्रेमींना अस्वस्थ करून जातो.
अमेरिकेतील मानाचा समाजाला जाणारा पुलित्झर पुरस्कार मिळवलेला संपादक आणि लेखक रोस गेल्ब्सन तर म्हणतो, ‘ही तर साधी सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या!’ अशी धोक्याची सूचना देताना तो म्हणतो, की ‘आपण जागतिक तापमानवृद्धी फक्त हवेतील मोजतो, पण खरा धोका रोखायचा असेल तर समुद्रातील पाण्याची तापमानवृद्धीही विचारात घ्यावी लागेल, कारण ती खूप मोठा धक्का देऊ शकते. आज समुद्रातील पाण्याच्या वरच्या थरातील तापमान एक डिग्री फॅरनहाइटनं वाढलं आहे. त्याचवेळी गेल्या शतकात हवेतील तापमानवृद्धी चार डिग्री फॅरनहाइटनं वाढली आहे. मानवाचे निसर्गाच्या विरोधातील सर्व उपद्व्याप असेच चालू राहिले तर एकविसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात तापमानवृद्धी सहा ते १४ डिग्री फरनहाइट इतकी प्रचंड असेल. या सगळ्या परिणामावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्व राष्ट्रांनी मिळून पर्यावरणाचा होणार ऱ्हास अत्यंत कडक कायद्यांनी थांबवला पाहिजे. ते जर केलं नाही तर निसर्ग आपला सूड असा उगवेल की प्रलय म्हणजे काय याची झलक मानवजातीला त्यावेळी कळेल.
या सगळ्या धोक्यांच्या मागे अनेक व्हिलन आहेत, पण त्यातला सर्वात मोठा आणि क्रूर व्हिलन म्हणजे CO2 (काबर्न-डाय-ऑक्साइड) हा वायू. आपल्या धरेवर साधारण १५० वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि तेव्हापासून मानवानं औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली वातावरणात इतका काबर्न-डाय-ऑक्साइड वायू घुसडलाय, की त्याला आता आवर घालणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. आपण वातावरणात सोडलेल्या एकूण काबर्न-डाय-ऑक्साइड वायूच्या ९० टक्के वायू हा आपण जाळत असलेल्या खनिजतेलातून, खनिज कोळशाच्या वापरातून तयार होतो.
यासंबंधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. समजा, सर्व राष्ट्रांनी एकमतानं काबर्न-डाय-ऑक्साइड वायूचं हवेतील प्रमाण कमी करण्याचा विडा उचलला तर ते सहज शक्य आहे, पण तसं होण्याची शक्यता धूसर आहे. कारण तेलाच्या आणि कोळशाच्या खाणी मुबलक असणारी काही बडी राष्ट्रं आणि तिथल्या खूप मोठ्या विश्वविख्यात कंपन्या ते घडू देत नाहीत. कारण त्यांची त्यातली गुंतवणूक इतकी मोठी आहे, की ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊन त्यात खोडा घालू शकतात. एक-दोन छोट्या राष्ट्रांत तिथल्या तेलसाठ्यावर स्वामित्व मिळवण्यासाठी तिथली सरकार उलथून टाकण्यातही त्यांचा हात होता, असं सांगण्यात येतं. इतकंच काय तर अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रानं पर्यावरणरक्षणाकरता इतर राष्ट्रांनी स्वीकारलेला क्योटो करार स्वीकारण्यास दिलेला नकार आणि त्यांचे या करारातून २००१ साली बाहेर पडणे हाही या तेल  कंपन्यांचा त्या सरकारवर असणारा प्रभाव दर्शवतो. गेल्या शतकात ऊर्जेचे सोपे आणि मुबलक उपलब्ध असणारे स्रोत मुख्यत्वे खनिजतेल आणि कोळसा हेच होते आणि त्यामुळेच या कंपन्या इतक्या गब्बर झाल्या आणि मनमानी करू लागल्या.
या तेल आणि कोळसा कंपन्यांनी जागतिक तापमानवृद्धी हे सगळं शास्त्रज्ञांनी रचलेलं कुभांड आहे, असा अपप्रचार सुरू केला होता. अफाट पैशांच्या जोरावर तो जनमानसात ठसवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. सन २००६च्या आसपास नासा या विख्यात अवकाश संशोधनसंस्थेच्या जेम्स हॅनसन या वैज्ञानिकानं असाही दावा केला होता, की त्याचं ग्लोबल वॉर्मिंग या विषयावरचं संशोधन जनतेसमोर येऊच नये, असे प्रयत्न केले गेले.
आणखी एक गंमत. या कंपन्यांनी एक जावईशोध लावला. काय तर म्हणे, की आपापल्या कारखान्यांतून तयार होणारे विषारी  वायू हवेत न सोडता ते जमिनीत गाडले तर प्रदूषण होणारच नाही. आपलं नशीब इतकंच की ही ‘अफलातून’ कल्पना आपल्या गळी येनकेन प्रकारे उतरवण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या, लोकांच्या हाती येत असलेला पैसा, प्रगतीच्या नावाखाली होणारं औद्योगिकीकरण, वाहनांच्या संख्येत होणारी प्रचंड वाढ, शहरांच्या वाढीमुळे होणारी झाडांची, जंगलाची कत्तल, निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून माणसानं पाहिलेली त्याची स्वत:ची सोय. हे सगळं असह्य झाल्यानं निसर्गाची सुरू झालेली कुरबूर ही आपल्यासाठी धोक्याची सूचना आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link