Next
मलभावन हा श्रावण
शोभा नाखरे
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

आषाढ लागला की क्षणाचीही उसंत न घेता पाऊस कोसळतो. घनघनमाला नभी दाटून येतात. नभं उतरू लागतं. घनदाट नि निळंजांभळं जलवैभव कोसळताना काळेकभिन्न हत्ती आकाशात जाऊन जणू काही या पांढऱ्याशुभ्र मौक्तिकांचीच बरसात करतात की काय, असा भास होतो. प्रियकरानं आपल्या प्रेयसीला बाहुपाशात वेढून घ्यावं, तसा धरेला कवटाळत तो बरसत रहातो. सोसाट्याचा वारा, लालबुंद पाण्यानं दुथडी भरून वाहणारे नदी-नाले, कोसळणारे धबधबे, निथळणारी सृष्टी... हे सारं आषाढाचंच ओलंकंच लेणं! याचं नेमकं रूप शांता शेळके रेखतात–

पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहळ, जाती खळखळ, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ...

मुलांचं भावविश्व रेखाटणारे राजा मंगळवेढेकर गंमत लिहून जातात–

नदीला आला पूर, तेव्हा चांदोबा गेला दूर!
रात्र झाली काळी, तेव्हा विजेने दिली टाळी
पडू लागला पाऊस, तेव्हा गोड झाला ऊस
वाहू लागला वारा, तेव्हा थंड झाल्या गारा
गमती झाल्या अशा, तेव्हा मनीला फुटल्या मिशा

आषाढ सरत आला की वरुणराजाची लगबग काहीशी कमी होते. गडद, फिकट, चकचकीत अशा हिरवाईच्या असंख्य छटा चहूबाजूंनी पांघरत रानफुलं डोलू लागतात. त्यांचा मादक रानगंध आसमंतात भरून जातो. आषाढाच्या कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र गालिच्यावर आपली सप्तरंगी पदचिन्हं रेखीत येतो श्रावण! आषाढघनांनी न्हाऊ घातलेल्या वसुंधरेची निथळती काया निरखत, तिला हिरव्याजर्द रंगाचं मुलायम वस्त्र नेसवीत येतो श्रावण! धरतीच्या कुशीत रुजलेल्या बीजांना हळुवार कुरवाळत, त्यातून इवल्या कोंबांचे पलक उमटवीत येतो तो श्रावण!

पावसानं दिलीया हिरवी साडी, धरणीला डोहाळजेवण करताना
नाहीतर नेसलं असंल, ठेवणीचं लुगडं, आला असंल कुणीतरी पाहुणा !

आनंद यादव यांची ही कल्पनाच बेफाट आहे ना! आपल्या संजीवक स्पर्शानं वृक्षराजीलाही हिरवे वस्त्रालंकार घालायची किमया श्रावणाचीच! आभाळाच्या अंगणात रंगलेली ऊन–पावसाची लपाछपी, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडण्याचा हा लोभसवाणा काळ! काळ्या मेघांतून चमकणारी वीज, अवखळ वारा, ओलाकंच निसर्ग! या भरजरी वस्त्रावर कवितांची नक्षी रेखताना प्रत्येक कवीचा बाज आगळा, साज वेगळा!
प्रा. शंकर वैद्य यांना सायंकाळच्या कोवळ्या उन्हाला पाहून वाटतं–

मेघ सावळा फुलारुनिया विरघळला अंबरी
कलत्या रवीचे ऊन विंचरत आल्या श्रावणसरी!

तर कविवर्य सुरेश भट यांना वाटतं–

काळ्या–काळ्या मेघाआडून क्षणभर चमकून गेली बिजली
जणू मोकळ्या केसामधुनी, पाठ तुझी मज गोरी दिसली...

तर कवी राम मोरे आर्जव करतात–

गंधवाऱ्या थांब दारी, आत तू येऊ नको
झोपली माझी सखी रे, तू तिला उठवू नको

हा श्रावण मोठा खट्याळ, अवखळ, नटखट, ऊन-पावसाशी मस्ती करणारा, पावसाच्या धारांशी दांडगाई करणारा... कधी जुई-चमेलीच्या प्रेमात फसणारा, तर कधी कदंबाच्या गेंदफुलांच्या सुगंधानं भ्रमरांना मोहवणारा, बकुळीला लाजवणारा, सुवर्णचंपकाला सोनकेशरी रंग बहाल करणारा, पारिजातकाच्या भगव्या देठांना तर कधी रातराणीला धरून सुगंधाची उधळण करणारा अवखळ श्रावण! मोगऱ्याला अधिकच दरवळ देणारा हा मधुगंधी, हळवा नि भावविभोर श्रावण! पुष्पगंधित, सुमनमंडित, रंगजडित, गंधभारीत, शीतल, हळवा श्रावण! बरसणारा, दरवळणारा, काहुरणारा, झिमझिमणारा, झुरमुरणारा, छुमछुमणारा, मनभावन, प्रियसाजण, मनकवडा श्रावण! ... साहित्यात अशी किती विशेषणं बहाल केली आहेत या श्रावणाला!

अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी ..कारण
अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले

असं चंद्रशेखर सानेकर लिहून जातात.
पावसा पावसा किती येशील? आधीच ओलेत्या रानराणीला आणखी किती भिजवशील? असं आर्जवणारे कवी अनिल पुढे म्हणतात–

पावसा–पावसा थांब ना थोडा, पिळून काढून न्हालेले केस
बांधू दे ना एकदा तिला सैल अंबाडा...

अशा या कुंद वातावरणात तिच्यासोबत खंडाळ्याच्या घाटात जावं, घाटातली थंडगार हवा, झिमझिमणारा पाऊस, एकाच छत्रीत, घट्ट मिठीत सावरत चालताना, वळणावर बुट्टेवाल्याकडून काळ्याभोर कोळशात, लालबुंद ज्वाळांवर तडतडणारं कणीस घ्यावं. त्यावर लिंबानं मीठमसाला फासलेला असावा. अहाहा!, स्वर्गसुख याहून वेगळं तरी काय? जरा पुढे जाऊन वाफाळलेली कॉफी घ्यावी. हातात हात गुंफून हे सारं अनुभवताना मंगेश पाडगावकरांच्या ओळी सहज ओठावर येतात–

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं
एक चॉकलेट अर्धं-अर्धं खाल्लं असाल जोडीनं..
.
‘तेरे नयना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा’ ...अशी त्याची अवस्था करणारा हाच नटखट श्रावण!
मधूनच ऊन पडलं की मदनाचे चाप असलेलं इंद्रधनुष्य सहजच आकाशात उमटून जातं. श्रावणाच्या गालावरची गोड खळी म्हणजेच हे सप्तरंग! पण हे असं ऊनही न झेपणारी ना. धो. महानोरांची प्रेयसी म्हणते– ‘बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना...’ पण प्रत्येकीचा साजण असा रसिक असेलच असं नाही ना? उमाकांत काणेकर यांची प्रेयसी हीच तक्रार करते–

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना, आवरू मनाला कैसे मला ते जमेना
मुकी नेत्रभाषा त्याची कळूनी वळेना, माझिया प्रियाला प्रीत कळेना..

श्रावण आणि मेंदीचं गहिरं नातं ! त्यामुळे शांता शेळके त्याला ‘मदरंगी’ हे नाव सुचवतात. वसंत बापट यांचे खट्याळ प्रेमिक म्हणतात–

तो– गोरे तळवे, नाजूक हळवे, वरती नक्षी काढू नको
ती– पुसून जाईल, ओली मेंदी, हात साजणा ओढू नको

एका लावणीत पावसाबद्दलची गोड तक्रार वाचायला मिळते. वसंत बापट यांचेच हे शब्द-

कधी उन्हात हळव्या, ओल्या हळुवार पाऊली येतो (हा पाऊस)
मी सावध नसताना, झड घालून हा चुंबन घेतो

‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी’ म्हणणाऱ्या इंदिरा संत त्याला विचारतात, ‘तू कोण आहेस? भाऊ, मित्र की पंढरीचा सखा सावळा?’
तर पुण्याचे कवी रमण रणदिवे पावसाला विचारतात –

अरे पावसा, पावसा कधी पाहशील खाली?
तुझ्या भेटीसाठी सृष्टी कासावीस झाली
मनमोराच्या पायात कधी बांधशील चाळ?
नाचे हिरवा पिसारा स्वप्नभारल्या महाली

श्रावणाचा हा हिरवा साज कितीदा जरी ल्याला तरी कधीच त्याचा रंग फिका पडणार नाही!
आज शहरातून आपण श्रावणाच्या पाऊलखुणा पुसत चाललो आहोत. सिमेंटच्या राज्यात हरवलेलं हिरवं वैभव मिळवायलातरी आपण पर्यावरण जपूया, तरच पुढच्या पिढीला श्रावण कळेल.

विचार चाललाय, पंक्चर करून एक ढग
पेरावा अंगणात, कारंजे म्हणून !

असे नलेश पाटील म्हणून जातात.
यासाठी अंगण तर हवे ना ?

माझ्या सख्या पावसा तू, जरा थांब माझ्या घरी
देते दही हातावर, मग जा तू परतुनी
जाता जाता पायरीशी, ठेव तुझ्या ओल्या खुणा
आज माझ्या अंगणात, आला पाउस पाहुणा!

असे राजश्री पोतदार लिहून जातात.     
साहित्यसंपदेतील हे शब्द अनुभवण्यासाठी तरी हिरवाई जोपासायला हवी!
 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link