Next
पदन्यासातून प्रेरणा
शोभा नाखरे
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


गुरुदेव टागोरांच्या जन्मशताब्दीचं निमित्त! कोलकात्यात राधाकृष्णकथेवर आधारित- ‘भानुसिंग पदावली’ ही नृत्यनाटिका ‘सूरझंकार’च्या पुणे केंद्रातर्फे सादर केली गेली.  उत्तम सादरीकरण होताना, एकाने ‘चमूत एक मुलगी विशेष मुलगी आहे. बघा ओळखता येते का?’ असे आवाहन केले. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ती मुलगी कोणालाच ओळखता आली नाही. ताल, लय, पदन्यास, नृत्यमुद्रा, भावविभोरता या साऱ्याबाबत कुठेही कमी नसणारी ही नऊ वर्षाची कर्णबधिर मुलगी म्हणजे प्रेरणा सहाणे.  
डॉ. उज्ज्वला व केशवराव सहाणे या माध्यमिक शिक्षक दाम्पत्याची मुलगी प्रेरणा.   पुण्यातल्या पिंपरी-चिंचवडच्या सांगवी भागात रहाणारे हे सहाणे कुटुंब. ती सहा महिन्यांची असताना तिला पक्षाघाताचा झटका येऊन तिचे शरीर लोळागोळा झाले. पायात शक्ती नाही, फार हालचालही करता येत नाही, यावर अनेक उपाय झाले. आयुर्वेदिक औषध, मसाज कामी आला, त्यामुळे पायात शक्ती आली. मात्र त्या आजारात प्रेरणाला पूर्ण कर्णबधिरत्व आले. उज्ज्वलाताईंनी कर्णबधिरांना शिकवायचे प्रशिक्षण घेतले. पुढे विशेष शिक्षणव्यवस्था असलेल्या शाळेत प्रेरणा जाऊ लागली. ६-७ वर्षांची होती तेव्हा! टी.व्ही.समोर जाऊन नाच निरखून पाहत अनुकरण करे. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लक्षणीय असे. हे लक्षात आल्यावर तिच्या पालकांनी तिला नृत्य शिकवायचे ठरवले, पण ऐकूच न येणाऱ्या प्रेरणाला शिकवायला कोणी तयार होईना.
एक प्रयत्न म्हणून भरतनाट्यम शिकवणाऱ्या गुरू शुमिता महाजन यांच्याकडे नेले. ‘क्लासला प्रवेश देते’, हे त्यांचे वाक्य ऐकताच उज्ज्वलाताई म्हणाल्या, “प्रेरणा ऐकू शकत नाही.” क्षणभर त्या प्रेरणाकडे पाहत बसल्या, तेवढ्यात त्यांच्या आईने त्यांना आत बोलावले आणि सांगितले की, “तू नाही म्हणू नकोस, आशेनं आलेल्या पालकांना नाराज करू नकोस, थोडे दिवस शिकवून पाहा, जमलं नाही, तर ‘नाही’ सांग!” हे महाकठीण आव्हान होते.  शुमिताताईंच्या ‘साधना नृत्यालयात’ सुरुवातीला तीन-चार वर्षें केवळ उपस्थितीइतकाच प्रेरणाचा सहभाग होता! गुरू–शिष्य बंध जुळतच नव्हते.
बऱ्याच दिवसांपासून ती फक्त निरीक्षण करत होती. सिनियर मुलींना जे शिकवले होते ते तिला असे समोर शिकवलेले नसतानासुद्धा, “त्या मुलींसारखं मला करून दाखवायचं आहे,” असे म्हणून अतिशय अवघड अशा नृत्यमुद्रा तिने गुरूंना करून दाखवल्या. इतर मुलींना करणे खूप अवघड जात होते, ते प्रेरणाने सहज केलेले पाहून शुमिताताई चमकल्या. प्रेरणात स्पार्क, नृत्याची दैवी शक्ती असल्याची जाणीव होऊन, विशेष व विविध प्रकारे प्रयत्न होऊ लागले. १४ -१५ वर्षे प्रेरणाची तपश्चर्या सुरू होती. तिच्या बाबांनी एकही दिवस न चुकवता वेळेवर क्लासला आणले. पहिले स्टेजवरचे सादरीकरण होते– ‘अरंगेत्रम’, १ जून २००७, हॉल ठरला. जोरदारपणे सराव चालू होता. एकदा आईबरोबर ती क्लासला निघाली होती. अचानक नकारात्मकतेचे वादळ घोंघावू लागले. लोकांसमोर सादरीकरण म्हणून भीती, निराशा मनात दाटून आली होती. त्यात बराच वेळ बस आली नाही. “आपण घरी जाऊ, नाच नको!” प्रेरणाचा हट्ट! इतक्यात तिला समोर दिसले की, कावळा एका पायाने उड्या मारत होता. झाडावर चढायचा प्रयत्न करत होता. थोडे चढून, परत परत पडत होता, तरी चढत होता. शेवटी कावळा उंच चढला. दोघींनी कुतूहलाने बघत उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. आई म्हणाली, “आता कावळाच अरंगेत्रम करेल, आपण घरी जाऊ!”... या प्रसंगानंतर मात्र प्रेरणा कधी उदास झाली नाही.
हजारभर प्रेक्षकांसमोर पहिले सादरीकरण करताना तिने तालाचे क्लिष्ट, मिश्र आलारीपू सादर केले. तिचा पदन्यास, अभिनय याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात, उभे राहून मानवंदना दिली. सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांनी तिच्या पहिल्या यशाची दखल घेतली. गुरू शुमिताताई म्हणाल्या– “गुरू म्हणून माझ्याकडून ही वेगळी जबाबदारी पडली, प्रेरणाचं आव्हान पेलल्यानं खूप ऊर्जा मिळालीच, पण माझी दृष्टी विस्तारली.’’
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, दक्षिण भारतात कर्नाटकातील कोन्नुर, उडपी, केरळमधील गुरुवायूरच्या बाळकृष्णमंदिरात प्रेरणाने कला सादर केली. महाराष्ट्र व बाहेर ६५ हून अधिक ठिकाणी तिचे जाहीर कार्यक्रम झाले. संगमनेरला मूळ गावी दोन हजार रसिकांसमोर नृत्य करताना तिला विशेष गौरव वाटला. बारावी झालेल्या प्रेरणाने २०११ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची मध्यमापूर्ण परीक्षा पार केली. गुरूंनीही जीव ओतून ज्ञानगंगेत न्हाऊ घातले तिला! याशिवाय प्रेरणा उत्तम चित्रे रेखाटते.
३ डिसेंबर २०१६ रोजी प्रेरणाच्या मानाच्या तुऱ्यात मोरपीस खोचले गेले. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते, राष्ट्रीय स्तरावरचा दिव्यांगांसाठीचा ‘रोल मॉडेल’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय संघर्ष सन्मान, सरस्वती पुरस्कार, आदर्श व्यक्तिमत्त्व अशा ३५ हून अधिक पुरस्कारांनी तिला सन्मानित केले गेले आहे. उज्ज्वलाताईनी लिहिलेल्या आत्मचरित्राला, ‘Prerana -The Sound Of Silence’ या पुस्तकाला शासनाचा ‘लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कार’ मिळाला आहे.
स्वप्निल दीक्षित प्रेरणाचा कर्णबधिर जीवनसाथी! दोघेही सध्या पदवीधर होण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना ‘यश’ हा तीन वर्षांचा मुलगा आहे, तो श्रुतक्षम आहे. “कष्टानं व जिद्दीनं यशश्री मिळवणाऱ्या या खऱ्या कलावंतांना कार्यक्रम करायची संधी देऊन, त्यांनाही इतर कलाकारांसारखे प्रोत्साहन देणं ही समाजाची जबाबदारी आहे,” ही उज्ज्वलाताईची आग्रहाची व रास्त कळकळ आहे. डॉ. अनिल अवचट यांच्या साहित्यावर पीएच.डी करणारी ही आई! यश तान्हा असताना डॉ. अवचट त्यांच्या घरी येऊन त्याला बासरी ऐकवून गेले. श्रुतक्षमता नसताना नृत्यकला जोपासणाऱ्या प्रेरणाला सलाम!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link