Next
आधुनिक भारताचे द्रष्टे अभियंते
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


“रात्रीच्या अंधारात गाडी वेगानं धावत होती. खिडकीला टेकून डब्यात एक प्रवासी झोपला होता. अचानक जाग येऊन त्यानं तत्काळ गाडीतली धोक्याची साखळी खेचली. गाडी थांबल्याबरोबर लोक डब्याकडे धावले. गार्डानं विचारल्यावर त्या प्रवाशानं ठामपणे सांगितलं की, ‘इथून काही मीटरवर रूळ तुटलेला आहे!’ ‘चला, बघूया,’ असं म्हणून गार्ड त्या प्रवाशाला घेऊन थोडा पुढे गेला. तिथे खरोखरच रूळ तुटलेला होता. ‘बापरे! गाडी इथून गेली असती तर मोठा अपघात झाला असता. पण तुम्हाला हे अंधारात कसं कळलं?’ गार्डनं आश्चर्यानं विचारलं. त्यावर प्रवासी म्हणाला, ‘गाडी धावतानाच्या रुळांच्या आवाजात अचानक झालेला बदल माझ्या लक्षात आला आणि धोका टाळण्यासाठी मी लगेच साखळी खेचली.’ हा प्रवासी म्हणजेच भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. १५ सप्टेंबर या त्यांच्या जन्मदिवशी आपण ‘अभियंता दिवस’ साजरा करतो,” प्रथमेशने सांगितलेल्या आख्यायिकेला मुलांनी टाळ्यांचा गजर करून
दाद दिली.
“अभियंता म्हणून विश्वेश्वरय्यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी कोणती?” तनिष्काने विचारले.
“धरणांच्या बंधाऱ्यांमधून पाण्याचा अतिरिक्त निचरा होण्यासाठी त्यांनी शोधलेली ‘स्वयंचलित पूरनियंत्रण प्रणाली’ जगभर नावाजली गेली,” मुक्ता म्हणाली, “पुण्याजवळच्या खडकवासला धरणामध्ये १९०३ मध्ये ही प्रणाली पहिल्यांदा वापरण्यात आली. तेव्हा या प्रणालीमुळे धरणाला कोणताही धोका न पोचता धरणात जास्तीत जास्त पाणी साठवता येतं याचा प्रत्यय आला. या प्रणालीचं एकस्वही (पेटंट) त्यांनी घेतलं. नंतर इतरही अनेक धरणांमध्ये ही प्रणाली यशस्वीपणे वापरली गेली.”
“विश्वेश्वरय्यांना ‘म्हैसूर राज्याचे पिताश्री’ का म्हणतात?” निधीने विचारले.
“विश्वेश्वरय्यांनी म्हैसूरजवळ कावेरी नदीवर कृष्णराजसागर हे धरण बांधलं,” सोहम म्हणाला, “धरणाचा आराखडा बनवण्यापासून ते पूर्ण होईपर्यंतच्या सर्व कामांची आखणी आणि देखरेख करून त्यांनी आशियातलं तेव्हाचं सर्वात मोठं सरोवर निर्माण केलं. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. म्हैसूर सोप फॅक्टरी, कीटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्क्स, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, सेंचुरी क्लब, म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स असे अनेक प्रकल्प त्यांनी म्हैसूर राज्यात सुरू करून प्रगतीला चालना दिली. त्यामुळे त्यांना ‘आधुनिक म्हैसूर राज्याचे पिताश्री’ म्हणतात.”
“विश्वेश्वरय्यांचा महाराष्ट्राशी संबंध आला होता का?” नीलयने विचारले.
“हो,” शाश्वत म्हणाला, “१८८१मध्ये मद्रास विद्यापीठाची बीएची पदवी मिळवल्यावर पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात मुंबई, नाशिक, खान्देश आणि पुण्यात साहाय्यक अभियंता म्हणून कितीतरी योजना राबवल्या. भारतीय सिंचन आयोगाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण दख्खनच्या पठारासाठीच्या सिंचनजालकाची आखणी केली. अर्थात, त्यांचं कार्य केवळ म्हैसूर किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी अवघ्या भारताच्या आभियांत्रिकी आधुनिकीकरणाची धुरा वाहिली.”
“युवकांसाठी विश्वेश्वरय्यांनी काय केलं?” राधाने विचारले.
“आधुनिक ज्ञानविज्ञानातल्या विविध मूलभूत तत्त्वांची भारतातल्या युवकांना उत्तम जाण यायला हवी, असं त्यांनी ‘रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं होतं,” अमना सांगू लागली, “त्यांच्यात चौकसपणा आणि उद्यमशीलता निर्माण झाली तरच त्यांच्यातून ध्येयवादी, पुरोगामी आणि स्वतःचं भान असलेले सुजाण नागरिक निर्माण होऊन ते देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल करतील. युवकांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी बंगळुरूला १९१७मध्ये पहिलं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केलं. आता या महाविद्यालयाला त्यांचं नाव देऊन गौरवण्यात आलं आहे. जयचमाराजेन्द्र पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, बंगलोर ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी यांचीही स्थापना त्यांनी केली. युवकांसाठी प्रेरणादायक आणि देशालाही मार्गदर्शक ठरणारी अनेक उत्तम पुस्तकं त्यांनी लिहिली.”
“अरे वा! या पुस्तकांची नावं सांगा ना, म्हणजे ती वाचता येतील,” रवीन म्हणाला.
“त्यांनी ‘स्पिचेस’, ‘रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया’, ‘अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया’ आणि ‘प्लॅण्ड इकॉनॉमी फॉर इंडिया’ अशी अनेक चिंतनात्मक पुस्तकं लिहिली,” सानिया सांगू लागताच मुले उत्साहाने नावे लिहून घेऊ लागली, “आपल्या अनुभवांचं सार सांगणारं ‘मेमरीज ऑफ माय वर्किंग लाईफ’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं. ही पुस्तकं आता अंकीय (डिजिटल) रूपातही उपलब्ध आहेत.”  
“खरोखरच गौरवास्पद कार्य आहे त्यांचं!” गौरांग उद्गारला.
“त्यांच्या कार्याचा गौरव करणारे अनेक सन्मान त्यांना मिळाले,” प्रथमेश म्हणाला, “सार्वजनिक कार्यातल्या उत्तम योगदानासाठी त्यांना १९११मध्ये कंपॅनियन आणि म्हैसूर राज्याचे दिवाण असताना १९१५मध्ये नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर म्हणून नियुक्त करण्यात आलं. मानद सदस्यत्वापासून डॉक्टरेटसारख्या पदव्यांपर्यत अनेक सन्मानांनी कितीतरी वेळा त्यांना जगभरातून गौरवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर भारतानं १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानानं गौरवलं. मागच्या वर्षी १५ सप्टेंबरला गुगलनं त्यांना गुगलडुडलनं आदरांजली वाहिली.”    
“विश्वेश्वरय्यांच्या यशाचं रहस्य काय?” धवलने विचारले.
“देशाचा विकास आणि आपलं कार्य याविषयी त्यांना नितांत तळमळ होती,” मुक्ता म्हणाली, “ते यासाठी सतत अथकपणे काम करत राहत. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी गंगेवर पूल बांधण्याच्या योजनेचा अभ्यास करून पूल कुठे उभारावा याबाबत सल्ला दिला. तेव्हा पंतप्रधान नेहरूंनी त्यांच्या अभियांत्रिकीतल्या नैपुण्याचं, निष्ठेचं आणि स्थानिक दबावांना बळी न पडता केवळ वैज्ञानिक निकषांच्या आधारावरच आपलं मत ठामपणे मांडण्याचं मनापासून कौतुक केलं. त्यांनी शंभर वर्षं पुरी केली तेव्हा ते म्हणाले, ‘मी सतत कार्यरत राहिल्यामुळे माझं शरीर आणि मन आजतागायत तरुण राहिलं आहे.’ अशा या आधुनिक भारताच्या द्रष्ट्या अभियंत्यांचा आदर्श सर्वांसमोर राहावा, यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘अभियंता दिवस’ म्हणून आपण आज साजरा केला.” 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link