Next
आंबटगोड नात्यांची मसालेदार गोष्ट
अमोघ पोंक्षे
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story

झी ५’ आणि ‘ए.एल.टी. बालाजी’ या दोन प्लॅटफॉर्म्सनी नुकतेच एकत्र येत संयुक्तरीत्या वेब शोज प्रस्तुत करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या शृंखलेतील पहिली वेब सीरिज ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ प्रदर्शित झाली आहे. वेब विश्वात हा नवा प्रयोग होत असल्याने या सीरिजकडे अनेकांचे डोळे लागलेले होते. दहा भागांची ही सीरिज पाहिल्यानंतर हा प्रयोग बऱ्याच अंशी यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही.
‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ ही गोष्ट आहे महत्त्वाकांक्षी नित्या शर्मा आणि वरवर पाहता मनमौजी असणाऱ्या विक्रमसिंह चौहानची! दोघांच्याही हातात चविष्ट पदार्थ बनवण्याची असलेली जादू दोघांना एकत्र आणते. २०१० साली भोपाळमध्ये केटरिंग कॉलेजपासून सुरू होणारी दोघांची गोष्ट २०१९ मध्ये येईपर्यंत अनेक रोमांचक वळणे घेत प्रेक्षक म्हणून आपल्याला गोष्टीशी बांधून ठेवते. हिंदी टेलिव्हिजन विश्वातील दोन प्रसिद्ध चेहरे दिव्यांका त्रिपाठी आणि राजीव खंडेलवाल यांना मुख्य भूमिकांसाठी निवडून लेखक-दिग्दर्शकाने अर्धी लढाई तिथेच जिंकल्याचे जाणवते. कॉलेज लाइफमध्ये एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले नित्या आणि विक्रम लग्न करतात. पण, तिथून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज २०१९ उजाडता उजाडता घटस्फोट घेण्यापर्यंत का आणि कसा होतो याची गोष्ट या सीरिजच्या दहा भागांमध्ये सांगितली आहे. नित्या आणि विक्रमची ही आंबटगोड गोष्ट प्रेक्षकांना सांगताना लेखक-दिग्दर्शकाने त्या भूमिकांमागील शेफच्या प्रतिमेचा पुरेपूर फायदा घेतल्याचे जाणवते. आपल्या आयुष्यात दोघेही उत्तम शेफ असल्याचे दाखवून त्यांचे स्वभाववैशिष्ट्य दर्शवण्यासाठी अनेक ठिकाणी सीरिजमध्ये विविध पदार्थांचा वापर केला आहे. २०११-१२ सालच्या सुमारास विभक्त झाल्यानंतर नित्या आणि विक्रमच्या आयुष्यात होणारे बदल आणि त्या बदलांचा त्यांच्या आजच्या आयुष्यावर होणारा परिणाम छोट्या छोट्या प्रसंगांतून दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहेत. सिंगल मदर म्हणून आपल्या बाळाला लहानाचे मोठे करणारी नित्या छोट्या छोट्या प्रसंगांतून आपली आगतिकता प्रेक्षकांपर्यंत यशस्वीपणे पोचवते. आयुष्यात पुन्हा कधीही भेटायचे नाही असे ठरवून विभक्त झालेले नित्या आणि विक्रम वर्तमानात का, कसे आणि कुठे भेटतात याची गोष्ट सांगताना अतिशय छान गुंफण दिग्दर्शकाने केली आहे. असे असले तरीसुद्धा काही प्रसंगांत मेलोड्रामा करून प्रसंग ताणल्याचेही जाणवते. डोरिस डे यांची कथा आणि पटकथा व संवाद लिहिणाऱ्या जया मिश्रा यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. आजच्या लहान मुलांमध्ये काळानुरूप खूप कमी वयात येणारी प्रगल्भताही वेळोवेळी लेखकाने काही प्रसंगांमध्ये दर्शवली आहे. कलादिग्दर्शक म्हणून हॉटेलच्या सेटसोबत प्रसंगी दिसायला उत्कृष्ट असणाऱ्या डिशेश प्रेक्षकांना दाखवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी कलादिग्दर्शक मधू सरकार यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. राजू सिंह यांचे पार्श्वसंगीतही एक वेगळी छाप सोडून जाते. भूतकाळात घडलेल्या घटना आणि वर्तमानात नित्या आणि विक्रमच्या आयुष्यात होणारी उलथापालथ दाखवताना कुठेही प्रसंग तुटक जाणवत नाहीत, उलट ते कथेला अलगद पुढे घेऊन जातात. संपूर्ण वेब सीरिज पाहिल्यानंतर मात्र योग्य ठिकाणी कात्री लावून या सीरिजचा हा पहिला सीझन दहा भागांऐवजी सहा ते सात भागांतच आटोपता घेता येऊ शकला असता असे राहून राहून वाटते. इतर वेब सीरिजप्रमाणे यामध्येही शेवट करताना प्रेक्षकांना अधांतरी सोडून दिले आहे. ज्यातून दुसऱ्या सिझनची निर्मिती होण्यासाठी स्पेस आधीच निर्माण केली आहे. विभक्त झालेले नित्या आणि विक्रम एकत्र येतात की नित्या विक्रमशिवाय आपल्या मुलाला घेऊन डॉक्टर मित्रासोबत आयुष्यात पुढे निघून जाते या प्रश्नांची उत्तरे शेवटपर्यंत न देऊन लेखक आणि दिग्दर्शकाने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. थोडक्यात सांगायचे तर आजच्या धावपळीच्या आयुष्यात नात्यांमध्ये येणारी निर्णायक वळणे आणि त्यातून ताणली जाणारी परिस्थिती याचे अतिशय वेधक चित्रण  ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ या सीरिजमध्ये करण्यात आले आहे.

 ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’
कलाकार : दिव्यांका त्रिपाठी,राजीव खंडेलवाल,प्रियांशु चॅटर्जी, मानिनी मिश्रा
कथा : डोरिस डे
पटकथा आणि संवाद : जया मिश्रा
दिग्दर्शक : प्रदीप सरकार
निर्मिती : लिंगा भैरवी देवी प्रोडक्शन
प्लॅटफॉर्म्स : झी ५, ए. एल. टी. बालाजी


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link