Next
घरातले प्रदूषण
दिलीप नेर्लीकर
Friday, May 31 | 01:45 PM
15 0 0
Share this story

प्रत्येकाला आपलं घर प्रिय असतं. यासाठीच तर आपण घराला Home Sweet Home असं लाडिकपणानं म्हणतो. आपण ते आपल्यापरीनं सजवतो. त्यातली प्रत्येक गोष्ट ही कोणत्या ना कोणत्या कारणांनी आपल्या भावनांशी जोडली गेलेली असते. पण, आपण त्याला भावनिक आवेशात कितीही स्वीट म्हटलं तरीही ते खरंच sweet होतं का हो? याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागतं, कारण ते घर जर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून माणसाला अपाय करत असेल तर ते खऱ्या अर्थानं Sweet Home असूच शकत नाही.
बऱ्याचवेळा आपल्या घरातील हवा औद्योगिक वसाहतीतील हवेपेक्षाही अधिक प्रदूषित असते, असं धक्कादायक विधान पर्यावरणात काम करणाऱ्या नामवंतानी आणि विख्यात संस्थांनी केलंय. घर म्हटल्यानंतर ते स्वच्छ ठेवणं आलंच. ते तसं ठेवण्यासाठी आपण निरनिराळी रसायनं वापरतो. टीव्हीवरील जाहिरातींच्या भडिमारामुळे घराच्या स्वच्छतेसाठी कितीतरी प्रकारची केमिकल्स विचार न करता आपण घरात आणत असतो, कारण काय तर एक अभिनेता जाहिरातीत विचारतो “तुम्ही तुमची बाथरूम कशी स्वच्छ करता?” आणि मग आणखी एक रंगीबेरंगी रसायन छान छान आकारांच्या बाटल्यांतून तुमच्या गळी उतरवलं जातं. आपण किती प्रकारची रसायनं घर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरतो याबाबतची आपल्या देशातली आकडेवारी फारशी उपलब्ध नाही. अमेरिकेत असा आढावा घेतला गेला आणि त्यात असं निष्पन्न झालं, की एका घरात अंदाजे ६३ प्रकारची कृत्रिम रसायनं वापरली जातात आणि यातून तब्बल ४० लिटर प्रदूषित पाणी दररोज बाहेर पडून आपले अनेक पाण्याचे स्रोत त्यामुळे दूषित होत असल्याचं निदर्शनास आलं. अमेरिकेत एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन एजन्सी (Environment Protection agency) नावाची एक नामवंत संस्था आहे. त्यांच्या मते तिथलं प्रत्येक घर हे पर्यावरणाला प्रदूषित करण्यात नंबर एकची खूप मोठी भूमिका बजावतं. कारण घरात वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या प्लास्टिक बाटल्या शेवटी कचऱ्यात जातात आणि घरात वापरली जाणारी रसायनं अखेर सांडपाण्यातून गटारात सोडली जातात.
हे वाचल्यावर तुम्ही नक्की म्हणणार, की मग आम्ही काय वानप्रस्थाश्रमात जाऊन पर्णकुटीत राहायचं की काय? खरं तर इतकं वैराग्य पर्यावरणासाठी अंगीकारायची काहीही आवश्यकता नाही. तुमच्याच Sweet Home मध्ये काही अल्पमोली पण बहुगुणी आणि अत्यल्प धोकादायक अशा वस्तू, पदार्थ, रसायनं आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही घर स्वच्छ ठेवू शकता. त्याकरता जाहिरातींनी गळी उतरवलेली, मॉलमधून आणलेली महागडी रसायनं नकोत. थोडा विचार केला आणि शोध घेतला तर अधिक धोकादायक रसायनं न वापरता, शक्यतो नैसर्गिक, नेहमीच्या गोष्टी वापरून, पैसा तर नक्कीच वाचवू शकाल शिवाय पर्यावरणसंवर्धनाला हातभारही लावू शकाल.
घरात प्रवेश केल्यापासून किती प्रकारची रसायनं ‘आम्ही तुमच्या घरात आहोत’ हे त्यांच्या वासांनीच सिद्ध करत असतात. घराला लावलेला रंग, दिवाणखान्यातील कार्पेट, खिडक्यांना लावलेले पडदे, सोफासेटचं कव्हर, त्यात वापरलेलं लाकूड अधिक चमकदार दिसण्यासाठी लावलेलं पॉलिश, या सगळ्यांतून पटकन हवेत मिसळणारी रसायनं बाहेर पडत असतात आणि ती श्वसनविकार असणाऱ्या व्यक्तींना धोकादायक असतात. तुमचं स्वयंपाकघर. ते स्वच्छच असावं यावर दुमत नाही. परंतु त्यासाठी धोकादायक कृत्रिम रसायनं वापरण्याची गरज नाही. किचनकट्टा स्वच्छ ठेवण्यासाठी त्यावरील तेलाची पुटं काढावी लागतात, ती काढणारी तयार रसायनं मिळतात. ती आम्लयुक्त असल्यामुळे तुमच्या हाताला अपायकारक असतात. बेसिनमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी मिळणारी पावडर, भांडी घासण्यासाठी वापरली जाणारी पावडर, इत्यादी रसायनं विशेषत: लहान मुलांना विषबाधेचा धोका निर्माण करतात. शिवाय यातली फॉस्फेटससारखी रसायनं पर्यावरणासाठीही धोकादायक आहेत.
आपल्या बाथरूममध्येही अनेक रसायनं वापरली जातात. उदाहरणार्थ, टॉयलेट क्लीनरसारखं रसायन आपण वापरतो. यात हायड्रोक्लोरिक अॅसिड, ऑक्झॅलिक अॅसिडसारखी (oxalic acid) धोकादायक रसायनं असतात. बाथरूम  सुगंधित राहावं म्हणून सुगंधित स्प्रेही वापरले जातात, यातही आपल्याला त्रास देणारी रसायनं वापरलेली असतात. बेडरूम, लिव्हिंगरुममध्येही फर्निचरवरील पॉलिश, प्लायवूडमधून अनेक दिवस बाहेर पडणारा फार्माल्डेहाईड मिश्रित वायू, भिंतीना लावलेल्या रंगातून बाहेर पडणारे तीव्र वासाचे हवेत मिसळणारे वायू, या सर्वांतून घरातील हवा दूषित होत असते.
घरातील स्वच्छतेसाठी नेहमीच्या वापरातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी वापरू शकतो? सर्वात प्रथम आपण स्वयंपाकघरात वापरतो तो खायचा सोडा. ते रसायनशास्त्रात ‘सोडियम कार्बोनेट’ या नावानं ओळखलं जातं. याला बेकिंग सोडा असंही म्हटलं जातं. किचन कट्टा साफ करायला इतर कोणतेही क्लीनर न वापरता हा सोडा वापरत चला. साधे डाग काढायला आणि दुर्गंधी घालवायला हा उपयोगात आणता येतो. फ्रीजमधील स्वच्छतेसाठीही याचा वापर करा. महागड्या रसायनांच्या जागी स्वच्छतेसाठी खायचा सोडा वापरायला लागा. याचे अनेक उपयोग आहेत. थोडा शोध घेतला तर हा नेहमीच्या वापरातला अल्पमोली बहुगुणी असा पदार्थ किती प्रकारे आपले पैसे वाचवू शकतो आणि पर्यावरणरक्षणालाही हातभार लावतो हे लक्षात येईल.
घरातील कृमी-कीटक घालवायचे असतील, तर स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या व्हाइट व्हिनेगरचा वापर करा. घरातील कोपऱ्यांत, खिडक्यांच्या फटीत याचा फवारा मारल्यास घरात शिरणाऱ्या कृमी-किटकांना मज्जाव करता येतो. खिडक्यांच्या काचा, काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग करता येतो.
बोरॅक्स (borax) या नावानं एक पावडर बाजारात मिळते. ही भूगर्भात सापडते. ही खरोखरच बहुउद्देशीय पावडर आहे. ही पाण्यात पटकन विरघळते आणि त्याचे पाण्यातील द्रावण हे जंतुनाशक असल्यामुळे याचा उपयोग घरात अनेक ठिकाणी करता येतो. हे नैसर्गिक रसायन दुर्गंधीही थोड्या प्रमाणात कमी करू शकतं. याचे इतरही अनेक उपयोग आहेत ऑलिव्ह तेल हे नैसर्गिक तेल आपण लाकडाला पॉलिश करण्यासाठी वापरू शकतो. या तेलात लिंबाचा रस मिसळल्यास ते सुवासिकही बनतं. रसायनं वापरून बनवलेलं लाकडाचं पॉलिश काही लोकांना त्रासदायक असतं. त्यानं श्वसनविकार बळावतात. परंतु ऑलिव्ह तेल कोणालाही एकदम सुरक्षित.
घरातलं साधं मीठही अनेकवेळा उपयोगी पडतं. भांडी घासण्यासाठी याचा उपयोग केल्यास भांडी, चिनी मातीच्या वस्तूंवरचे कॉफी-चहाचे डाग काढण्यासाठी मीठ आणि व्हिनेगर मिसळून बनवलेलं मिश्रण छान काम देतं. तुम्हाला स्वस्तात जंतुनाशक द्रावण बनवायचं असेल तर बाजारात केमिस्टकडे मिळणारं हायड्रोजन पेरॉक्साइड वापरा. यातून इतर कोणतीही धोकादायक रसायनं बाहेर पडत नाहीत. त्याचं विघटन झालंच तर त्यातून हायड्रोजन आणि पाणी तयार होतं.
शेवटी एक धोक्याचा इशारा, या लेखात सांगितलेली रसायनं, पदार्थ वगैरे लहान मुलांपासून दूर ठेवा. ती जरी जीवघेणी नसली तरी ती लहान मुलांना अपायकारक ठरू शकतात. 

बहुपयोगी लिंबू
नेहमीच्या वापरातलं फळ म्हणजे लिंबू. लिंबू आम्लयुक्त असल्यामुळे घरातील स्वच्छतेत अनेक कामांसाठी उपयोगात येते. तेलाचा चिकटपणा काढण्यासाठी याचा खास उपयोग होतोच, शिवाय कपड्यावरील डाग काढण्यासाठीही हा बहुउपयोगी आहे. महागडी रसायनं वापरण्यापेक्षा हा साधा सोपा उपाय केल्यास तुमचे कपडे स्वच्छ होतीलच शिवाय पर्यावरण तुम्हाला धन्यवाद देईल. लिंबू आणि पाणी यांचं समप्रमाणातील मिश्रण कोणत्याही वस्तू स्वच्छ करण्यासाठी एकदम मस्त उपाय ठरू शकते. करून तर पाहा. बाजारात मिळणारं सोडा वॉटर हेही घरातील स्वच्छतेला हातभार लावू शकतं. कार्पेटवरील, पडद्यांवरचे डाग काढण्यासाठी, स्टेनलेस स्टीलची भांडी लखलखीत करण्यासाठी याचा छान उपयोग होऊ शकतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link