Next
लज्जतदार फराळ
विष्णू मनोहर
Friday, November 02 | 04:00 PM
15 0 0
Share this story


छेना मुर्की

साहित्य
पनीर, साखर, वेलचीपूड, बदामाचे काप, कॅस्टर शुगर (पिठीसाखर)

कृती
प्रथम एका भांड्यात साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून साखरेचा घट्ट पाक तयार करावा. या पाकात वेलचीपूड घालावी. त्यानंतर, पनीरचे चौकोनी काप करून ते साखरेच्या पाकात खरपूस परतून घ्यावे. त्यानंतर एका बाऊलमध्ये खरपूस परतलेले पनीर काढून ठेवावे. त्यावर पिठीसाखर भुरभुरावी. तयार झाले छेना मुर्की.

पनीर चिवडा
साहित्य
पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे बारीक काप,खोबऱ्याचे तुकडे, चिवडा मसाला, मीठ आणि तेल.

कृती
किसणीवर पनीर किसून घ्यावे. पनीरचे लांब काप होतील अशा पद्धतीने किसावेत. किसलेले पनीरचे काप तेलात मंद आचेवर तळून घ्यावेत. पनीर तळून झाल्यानंतर त्याच गरम तेलात सुक्या खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता तळून घ्यावे. त्यानंतर, तळलेल्या पनीरमध्ये चिवडा मसाला, चवीनुसार मीठ आणि तळलेले सर्व साहित्य घालून तो व्यवस्थित ढवळून घ्यावा. अशा पद्धतीनं खुसखुशीत पनीर चिवडा तयार होतो.

बेसन मोगरी लाडू
साहित्य
बेसन, दूध, दुधाची पावडर, चिमूटभर मीठ, बदाम आणि गुलकंद.

कृती
प्रथम दोन वाट्या बेसनात चिमूटभर मीठ घालून ते पीठ दुधात भिजवून घ्यावे. या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्यानंतर पुऱ्यांना काट्याने टोके पाडून घ्यावी. त्यानंतर या पुऱ्या गरम तेलात तळून घ्याव्यात. पुऱ्या गार झाल्यानंतर, त्यांची मिक्सरमधून जाडसर भरड करून घ्यावी. या भरडीमध्ये  दुधाची पावडर , गुलकंद आणि बदामाचे काप टाकून लाडू वळून घ्यावेत. अशा पद्धतीनं तुमचे बेसन मोगरी लाडू तयार.

चौडे

साहित्य
मैदा, पिठीसाखर, चिमूटभर मीठ, तूप आणि वेलचीपावडर.

कृती
मैद्यात मीठ घालून तो भिजवून घ्यावा. त्यानंतर पोळीच्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्याव्या. पुऱ्या लाटून झाल्यानंतर त्याला टोके पाडून त्या तुपात तळून घ्याव्या. पुऱ्या तळून झाल्यानंतर त्यावर पिठीसाखर, वेलचीपूड पसरावी. त्यानंतर या पुऱ्या त्रिकोणी आकारात दुमडून ठेवाव्या. तयार झाले त्रिकोणी आकारातील चौडे…

गुलगुले (विदर्भातील पदार्थ)

साहित्य
अर्धे वाडगे भरून कणीक, साधारण पाऊण वाटीभर गूळ (७०० ग्रॅम) ( किंवा साखर), चिमूटभर तीळ, चिमूटभर सोडा किंवा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.

कृती
प्रथम एका भांड्यात पाणी गरम करून, त्यात गुळाचा (वा साखर) पाक तयार करून घ्यावा. कणकेमध्ये चिमूटभर मीठ, कच्चे तीळ आणि सोडा घाला. हे मिश्रण चांगले एकजीव झाल्यानंतर त्यात थोडा थोडा गुळाचा पाक घालून ते सरसरीत भिजवून घ्यावे. (सोडा घातला नाही तर हे मिश्रण तासभर मुरण्यासाठी ठेवावे.) भिजवताना हे चांगले फेटून घ्यावे. (हे पीठ साधारण भज्यांसाठी जसे पातळ असते तितके करावे.) हे मिश्रण चांगले फेटून घेतल्यानंतर  गरम तेलात हे मिश्रण भज्यांसारखे सोडून खरपूस तळून घ्यावे. तयार झाले रुचकर गुलगुले.

सजावट
गुलगुले खसखशीत बुडवून त्यावरून पिठीसाखर भुरभुरावी आणि सर्व्ह करावेत.

हातकांद्याची चकली

साहित्य
भाजलेली कणीक, जाड किसलेला कांदा (अंदाजे एक वाटी), हळद, आमचूरपावडर, धणे-जिरेपावडर प्रत्येकी एक चमचा, हिरव्या मिरचीचा ठेचा (तुम्हांला जसे तिखट हवे त्यानुसार), लसूण पेस्ट (एक लहान चमचा), बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, मीठ.

कृती
प्रथम एक किसलेला कांदा, मीठ, मिरचीचा ठेचा, धणे-जिरेपावडर, आमचूरपावडर, हळद हे सर्व एकत्र करून घ्यावे. या मिश्रणात बसेल इतकी कणीक मळून घ्यावी (गरज वाटल्यास गरम पाणी वापरा.). हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे. महत्त्वाचे म्हणजे हे मिश्रण फार पातळ नसावे.  एका सुती कपड्याला मध्यभागी तिरक्या आकारात छोटेसे भोक पाडावे. त्यानंतर हे फडके ओले करून घ्यावे. या ओल्या कपड्यात तयार मिश्रण घालावे. केळ्याच्या पानाला तेल लावून त्यावर जिलेबीप्रमाणे ही चकली पाडावी. त्यानंतर कढईतील गरम तेलात मंद आचेवर या चकल्या तळून घ्यावात. या खमंग, रुचकर चकल्या दह्याबरोबर सर्व्ह कराव्यात.
संकलन : मधुरा सुरपूर

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link