Next
१लाख टनांची सुपरकॅरिअर
समीर कर्वे
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this storyविमानवाहू युद्धनौका यापुढेही सागरी युद्धखेळीचा भाग असतील का, त्यात गुंतवणूक करावी का, असे प्रश्न जेव्हा उपस्थित होत होते, त्याचवेळी अमेरिकेने पुढच्या पिढीची प्रगत सुपरकॅरिअर आणली आणि विमानवाहू युद्धनौका अजूनही प्रगत होत राहतील, याचे संकेत जगाला दिले. तब्बल एक लाख टन वजनाची, सर्वाधिक मोठी आणि १३ अब्ज डॉलर खर्चून बांधलेली यूएसएस जेराल्ड फोर्ड ही अणुइंधनावर चालणारी शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका २२ जुलै २०१७ रोजी अमेरिकन नौदलात कमिशन झाली. गेल्या चार दशकांतले आजवरचे हे सर्वात आधुनिक आरेखन ठरले आहे.
अमेरिकेला आपल्या देशापासून दूर विविध खंडांमध्ये ‘पहारेदारी’ करण्याची हौस पूर्ण करण्याचे महत्त्वाचे अस्त्र म्हणजे विमानवाहू युद्धनौका. इराकविरोधातील आखाती युद्धाच्या वेळी यूएसएस थिओडोर रुझवेल्ट, हॅरी ट्रूमन, कॉन्स्टेलेशन, अब्राहम लिंकन, किटी हॉक व निमिट्झ या सहा विमानवाहू युद्धनौका तैनात करण्यात आल्या होत्या. अफगाणिस्तानातील ऑपरेशन एन्ड्युरिंग फ्रीडम या मोहिमेतही एन्टरप्राइझ, कार्ल विन्सन, थिओडर रुझवेल्ट, किटी हॉक या विमानवाहू युद्धनौकांचा ताफा तैनात करण्यात आला होता. गेल्या चार दशकांमध्ये विमानवाहू युद्धनौकांमध्ये काय असे मोठे बदल घडू शकतात, असे वाटत असतानाच, अमेरिकेने १ लाख टनांची सुपरकॅरिअर बांधताना आधुनिकीकरण काय असेल, हे दाखवून दिले. त्यासाठीच तर या नौकेच्या आरेखनाच्या संशोधनावर ४ अब्ज डॉलर इतका अवाढव्य खर्च करण्यात आला.
अमेरिकन नौदलातील विमानवाहू युद्धनौकांचे पर्व १९२२ मध्ये यूएसएस लँगली नौकेपासून सुरू झाले. नंतर अनेक विमानवाहू युद्धनौका आल्या व त्या ब्रिटिश विमानवाहू युद्धनौकांच्या तुलनेत बऱ्याच अजस्र होत्या. १९६१ च्या काळात किटी हॉक श्रेणीतील विमानवाहू युद्धनौका आल्या व त्याच श्रेणीतील तिसरी एन्टरप्राइझ ही विमानवाहू युद्धनौका अणुइंधनावरची पहिली नौका ठरली. २५ नोव्हेंबर १९६१ रोजी ती दाखल झाली व ५५ वर्षे सेवा बजावून ती अलीकडेच निवृत्त झाली. तिचीच जागा यूएसएस जेराल्ड फोर्डने घेतली. जेराल्ड फोर्डच्या पूर्वी १९७५ मध्ये निमिट्झ श्रेणीतील अणुइंधनावरच्या विमानवाहू युद्धनौका दाखल झाल्या. त्या श्रेणीतील सर्वात अलीकडची नौका यूएसएस जॉर्ज बुशचे (कमिशनिंग मे २००९) डिझाइन निमिट्स श्रेणीतील नौकांवरच बेतलेले होते. म्हणजे तसे पाहता १९७५ पासून २०१७ पर्यंत यूएसएस जेराल्ड फोर्ड दाखल होईपर्यंत विमानवाहू युद्धनौकांमध्ये काही नवे बदल झाले नव्हते.
 निमिट्स श्रेणीनंतर चार दशकांनी आलेल्या यूसएसएस जेराल्ड फोर्डमध्ये एक महत्त्वाचा बदल होता तो म्हणजे नौकेवर लढाऊ विमानांचे लँडिंग (उतरणे) व टेकऑफ (उड्डाण) यासाठी अत्यंत अत्याधुनिक सामग्री बसवण्यात आली होती. आतापर्यंत विमानांना उड्डाण घेण्यासाठी वाफेवरचे कॅटापूल्ट म्हणजेच बेचकीसारखे तंत्रज्ञान वापरले जायचे. त्याऐवजी विद्युतचुंबकीय बलाचा वापर करणारे तंत्रज्ञान बसवण्यात आले. ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लाँच सिस्टिम’ (EMALS) या कॅटापूल्टद्वारे अवघ्या ३०० फुटांत १ लाख पौंड वजनाची वस्तू ताशी सव्वाशे मैल वेगाने भिरकावणे शक्य होते. त्याचप्रमाणे अॅडव्हान्स्ड अॅरेस्टर गिअर हे तंत्रज्ञान विमानाच्या लँडिंगसाठी वापरले जाते. या तंत्रज्ञानात विमानातील एक दांडा एका दोरखंडात अडकतो व विमानाचा वेग मंदावून ते थांबते. अत्याधुनिक तंत्रामुळे विमाने हाताळण्याची कार्यक्षमता २५ टक्क्यांनी वाढली व त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळातही २५ टक्के बचत झाली. जेराल्ड फोर्डच्या फ्लाइटडेकवरून दिवसाला १६० ते २२० उड्डाणे होऊ शकतात.
या नौकेचा फ्लाइटडेक ११०६ फूट लांब असून नौकेची सर्वाधिक रुंदी २५६ फूट आहे, तर उंची २५० फूट आहे. नौकेवरील विमानांच्या दिशादर्शनाचा मनोरा काहीसा मागे आहे. फ्लाइटडेकवरून चार ठिकाणांहून विमाने उड्डाण करण्याची सुविधा आहे व एकाचवेळी दोन विमाने हवेत झेपावणे शक्य होते.
नौकेमध्ये १ कोटी फूट लांबीची विजेची केबल फिरवण्यात आली आहे, तर ४० लाख फूट लांब फायबर ऑप्टिक केबलचे जाळे आहे. दिवसाला ४ लाख गॅलन शुद्ध पिण्याचे पाणी नौकेवर तयार होते व १५ हजार जणांना जेवण पुरवण्याची क्षमता तिच्या भटारखान्याची आहे. नौकेवर ४६६० इतके मनुष्यबळ लागते. निमिट्स श्रेणीच्या तुलनेत पाचशे ते नऊशे मनुष्यबळाचीही बचत होते. नौकेच्या अणुभट्टीतून यापूर्वीच्या यूएसएस एन्टरप्राइझ नौकेपेक्षा २५० टक्के अधिक वीजनिर्मिती होते. संगणकआधारित आरेखनाने तयार केलेली ही पहिली नौका ठरली आहे. या नौकेचे लिखित आयुर्मान ५० वर्षांचे असून २०५८ पर्यंत अशा दहा नौका निर्माण करण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे.
नौकेला स्वतःच्या बचावासाठी क्षेपणास्त्र, मशीनगन अशी शस्त्रास्त्रे आहेत. परंतु विमानवाहू नौकेची सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणजे तिच्यावरची विमाने. अमेरिकन नौदलातील सीटूए ग्रेहाऊन्ड, ईटूसी व ईटूडी प्रगत हॉकआय, एफए १८ ईए सुपरहॉर्नेट, ईए१८जी ग्राऊलर अशी अमेरिकन नौदलातील विमाने तिच्यावरून कार्य करू शकतात व एकावेळी ती ९० विमाने-हेलिकॉप्टर वाहू शकते.
 एका शहरासारख्याच असलेल्या या अणुइंधनचालित विमानवाहू युद्धनौका अर्थव्यवस्थेला महागड्या ठरत आहेत, असा सूरही अमेरिकेत निश्चितच ऐकू येतो.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link