Next
अविस्मरणीय आइनस्टाइन
दिलीप चावरे
Friday, November 30 | 05:20 PM
15 0 0
Share this storyआपल्याकडे एक म्हण आहे, ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे.’ याचा अर्थ असा, की आपण गेल्यानंतरही आपण केलेल्या कामाची, योगदानाची आठवण लोकांना व्हावी. आज इतक्या शतकांनंतरही ओठांवर ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास, मीराबाई, जनाबाई, कबीर अशा संतांची नावे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण केल्याशिवाय आपला एक दिवसही जात नाही. या महान स्त्री-पुरुषांनी आपले मृत्युपत्र कोठे ठेवले नाही. आपले पुतळे उभारा की मंदिरे बांधा, असाही संदेश कोणाला दिला नाही, परंतु त्यांचे कार्यच एवढे थोर होते, की त्याची जाहिरात करण्याची गरज त्यांना भासली नाही. मात्र त्यांना असणारी विरक्ती त्यांचे नाव संपूर्ण जगात घेऊन गेली. याच्या उलट प्रवृत्ती आज वाढत आहे. त्यासाठीही आपल्या संस्कृत भाषेत एक वचन उपलब्ध आहे. ‘येनकेन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत्.’ काहीही करून प्रसिद्धी प्राप्त करायच्या विकाराची लागण आपल्या देशात फार दिसते. अगदी शौचालयाचे उद्घाटन केले, तरी त्यावर आपले नाव देण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.

अशा वातावरणात ‘थोरामोठ्यांच्या आठवणी’ या वर्षभर चाललेल्या मालिकेचा समारोप करताना एका महामानवाची वारंवार आठवण येते. ती शब्दबद्ध करून या मालिकेचा समारोप करत आहे. तो दिवस होता १४ ऑक्टोबर २०१७. माझी पत्नी कुमुद आणि माझ्यासाठी तो अविस्मरणीय दिवस ठरला. त्यावेळी आम्ही आमच्या मुलांकडे अमेरिकेत होतो आणि काही कारणाने एका छोट्या शहरात जाण्याचा योग आला. न्यू जर्सी राज्यातील हे शहर जगप्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे प्रिन्स्टन विद्यापीठ त्याच्या शेजारीच आहे. हे विद्यापीठ पाहण्याची संधी आम्ही डावलणे शक्यच नव्हते. त्यामुळे आमच्या यजमानांचा निरोप घेऊन आम्ही लगेचच या विद्यापीठाकडे कूच केले. अत्यंत रम्य परिसरात हजारो एकर क्षेत्रावर विकसित झालेले हे विद्यापीठ अनेक कारणांसाठी प्रख्यात आहे. त्यापैकी एक म्हणजे या विद्यापीठातील प्राध्यापकांना आणि संशोधकांना अत्यंत मोठ्या संख्येने नोबेल सन्मान प्राप्त झाले आहेत. परिणामी या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी झुंबड उडते. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अतिप्रचंड असते. इथे आरक्षण नसते. त्यामुळे इथे प्रवेश मिळणारे अत्यंत गुणवानच असतात. तरीही प्रिन्स्टन विद्यापीठाचे नाव जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात काढले, की आपसूक त्यामागे येणारे नाव म्हणजे महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन. त्यांच्या E=MC२ या  समीकरणामुळे जागतिक संशोधनाची वाटच बदलली. त्यांच्या या समीकरणावरही गेले शतकभर संशोधन चालू आहे. मात्र ते लवकर संपायची कोणतीही चिन्हे नाहीत, एवढे या संशोधनाचे महत्त्व आहे.

आइनस्टाइन हे जन्माने जर्मन ज्यू. जर्मनीत हिटलरशाही डोके वर काढू लागली आणि ज्यू धर्मीयांचा छळवाद सुरू झाला. आपल्या विज्ञानसंशोधनात मग्न असलेले आइनस्टाइन यांनी जर्मनीमधून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर ते मजलदरमजल करत प्रिन्स्टन विद्यापीठात स्थायिक झाले. हा प्रवास सर्वज्ञात आहे. प्रिन्स्टन विद्यापीठात आइनस्टाइन एका छोटेखानी घरात राहिले. विद्यापीठातील एका रस्त्यावर ही दुमजली बंगली आहे. तिचा पत्ता आहे ‘११२ मर्सर स्ट्रीट.’ याच घरात आइनस्टाइन यांनी त्यांच्या सावत्र मुलीसह आपल्या १९५५मधील अखेरीपर्यंत वास्तव्य केले. त्यांचे दुर्दैव म्हणजे त्यांच्या पत्नी एल्सा, ही बंगली १९३५ साली विकत घेतल्यानंतर वर्षभरातच मरण पावल्या. या घराचे कोणतेही वैशिष्ट्य नाही. आपल्याकडे बंगल्याला कुटीर म्हणण्याची रीत आहे. तशीच ही एक साधीसुधी बंगली आहे. एल्सा आइनस्टाइन यांनी २० जुलै १९३५ रोजी बंगली खरेदी केली, अशी स्थानिक पालिका कार्यालयात नोंद आहे, परंतु हा व्यवहार किती रकमेला झाला याचा उल्लेख या खरेदीकरारात करण्यात आलेला नाही.

आइनस्टाइन यांनी स्पष्टपणे लिहून ठेवले होते, की आपल्या पश्चात या घराचे कोणत्याही स्मारकात रूपांतर करण्यात येऊ नये, ते आहे तसेच राहावे. त्यांच्या इच्छेचा ते गेल्यानंतर शब्दश: आदर करण्यात आला. त्यामुळे आम्हीसुद्धा गोंधळून गेलो, कारण त्याची माहिती फारशी कोणालाच नसल्याचे आमच्या लक्षात आले. अखेर आम्ही पुन्हा गुगलला शरण गेलो आणि या घराचा पत्ता शोधला. आम्ही गेलो तेव्हा हे घर बंद होते. ‘प्रायव्हेट रेसिडेन्स’ अशी दारात पाटी होती. याचा अर्थ असा, की या घरातच नव्हे तर या आवारातसुद्धा मालकाच्या परवानगीखेरीज कुणीही प्रवेश करू नये. अशा संकेतांना अमेरिकेत फार महत्त्व देण्यात येते. आपल्याकडे मात्र ‘प्रवेश बंद’ अशी पाटी असली, की हमखास उलट्या दिशेने वाहने येताना आढळतात. मार्गोत या आइनस्टाइन यांच्या सावत्र कन्येने त्यांच्या इच्छेचे पालन केले असले तरी या घराचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने त्याचा समावेश राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तूंच्या संकलित केलेल्या यादीत केला आहे.

आइन्स्टाइन यांच्या निधनानंतर त्यांची मार्गोत नावाची कन्या १९८६ मध्ये निधन होईपर्यंत त्याच घरात राहात होती. नंतर त्याची मालकी एरीक मस्कीन यांच्याकडे २०१२ सालापर्यंत होती. ते प्रिन्स्टन विद्यापीठातील एक प्राध्यापक होते. पुढे ते हार्वर्ड विद्यापीठात अध्यापन करू लागले. या घरात काही काळ नोबेल पुरस्काराने सन्मानित पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक फ्रँक विल्झिक यांचे वास्तव्य होते. इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्सड सायन्सेस म्हणजे आइनस्टाइन यांनी जिथे आपल्या जीवनाचा मोठा काळ व्यतीत केला त्या संस्थेत ते कार्यरत होते. या संस्थेत दाखल होण्यापूर्वी आपल्याला हेच घर वास्तव्यासाठी मिळावे, अशी अट त्यांनी घातली होती. याच घरात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. नंतर त्याची मालकी इन्स्टिट्यूटने स्वीकारली. ते आता बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आइनन्सटाइन यांच्या नावाची कोणतीही पाटी तिथे ठेवण्यात आलेली नाही.

आम्ही या घरासमोर पोहोचलो तेव्हा हे घर नेमके आइनस्टाइन यांच्या वास्तव्याचे होते काय हे कोणालाही सांगता येत नव्हते. आम्ही या घरासमोर उभे राहून छायाचित्रे काढू लागलो तेव्हा रस्त्याच्या समोरच्या बाजूला वाहने पटापट थांबली आणि त्यातील मंडळी उत्सुकतेने आमच्याकडे बघायला लागली. त्यापैकी एकदोघांनी धीर करून आम्हाला विचारले, तेव्हा आम्ही सांगितले, की याच घरात आइनस्टाइन यांनी वास्तव्य केले होते. ते ऐकून काही गाड्यांमधील मंडळी खाली उतरली आणि त्यांनी घरासमोर आपापली छायाचित्रे (सेल्फी) घेण्याचा सपाटा सुरू केला.

आइनस्टाइन गेल्यानंतर त्यांच्या वापरातील सुमारे ६५ वस्तू अमेरिकेतील हिस्टॉरिकल सोसायटी या संस्थेला देण्यात आल्या. त्यांचे लिहिण्याचे मेज, खुर्च्या, कपाटे अशा अनेक वस्तू त्यात आहेत. हे मेज विशेष महत्त्वाचे आहे. ते ऑस्ट्रिया या देशात १७३०च्या सुमारास बनवण्यात आले होते. आइनस्टाइन यांचे एक घड्याळही जतन केलेले आहे.

आइनस्टाइन किंवा इतर थोर लोकांची धर्म अथवा देव या संकल्पनेबद्दलची मते काय होती याबाबत सामान्यांमध्ये कुतूहल असते. आइनस्टाइन यांनी आयुष्यभर डावी विचारसरणी आणि समाजवाद यांचा पुरस्कार केला. त्यांनी लिहिलेले एक पत्र (सोबतच्या चौकटीत) अतिशय प्रसिद्ध आहे. ते मरण पावले, त्यापूर्वी एक वर्ष आधी म्हणजे १९५४ साली हे पत्र त्यांनी लिहिले होते. बायबल विषयक एका ग्रंथाबद्दल त्यात विचार व्यक्त केले आहेत.

देव या शब्दापासून मानवी दुर्बलतेचा आविष्कार होतो असे ते म्हणत. बायबलमधील कथा प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. या कथांचे निरूपण कोणत्याही प्रकारे केले तरी माझे मत बदलणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ज्यू या धर्माविषयीच्या अनेक ग्रंथांमध्ये chosen people म्हणजे (देवाने) निवडलेली माणसे असा उल्लेख कायम करण्यात येतो. याबाबत आइनस्टाइन म्हणतात, की इतर कोणत्याही धर्मियांपेक्षा ज्यू लोकांना विशेष स्थान आहे, असे मला वाटत नाही. माझ्या अनुभवावरून मी असे सांगू शकतो, की इतर मानवी समाजांपेक्षा ते काही वेगळे आणि सरस आहेत असे वाटत नाही. व्यक्तिगत देव ही संकल्पना आइनस्टाइन यांनी कधीच स्वीकारली नाही. ते स्वत:स नास्तिक मानत नव्हते. ते म्हणतात, की माझ्या संदर्भात मी धार्मिक आहे असे म्हणायचे झाल्यास इतकेच म्हणता येईल, की विज्ञानास ज्ञात जग विचारात घेतले तर त्याची रचना करणाऱ्याबद्दल माझी भावना असीम आदराची आहे. हे पत्र ‘देव पत्र’ किंवा God Letter  म्हणून जगप्रसिद्ध आहे. एका लिलावात या पत्राला लाखो डॉलरची बोली लागली होती.

आइनस्टाइन यांना १९२१ सालचा नोबेल सन्मान जाहीर झाला तेव्हा ते टोकियो येथे एका हॉटेलात मुक्कामास होते. या सन्मानाची तार घेऊन येणाऱ्यास देण्यासाठी त्यांच्याकडे रोकड नव्हती. म्हणून त्यांनी त्यास दोन ओळींचा संदेश दिला. “तुझं नशीब चांगलं असेल तर याला नंतर चांगली किंमत येईल” असे त्या दूतास ते म्हणाले. हा संदेश पुढीलप्रमाणे होता, ‘यशाचा सतत पाठपुरावा करणे आणि त्याबरोबर येणाऱ्या अशांतपणापेक्षा शांत आणि नम्र जीवनप्रणाली अधिक सुखप्राप्ती देऊ शकते.’ हा संदेश कालांतराने विक्रीसाठी बाहेर आला तेव्हा संबंधितांना मोठी धनप्राप्ती झाली. हा संदेश त्या दूताच्या एका भाच्याने विक्रीसाठी ठेवला होता.आइनस्टाइन यांची काही अतिप्रसिद्ध वचने अशी :

  •  जी विचारसरणी वापरून समस्या निर्माण होतात, तीच विचारसरणी वापरून त्या समस्यांचे निराकरण होऊ शकत नाही.
  •  बुद्धिमत्तेचे खरे लक्षण ज्ञान नसून कल्पनाशक्ती हे आहे.
  •  निसर्गाने आपल्यासमोर जे उघड करून दाखवले आहे, त्याच्या एक टक्क्याच्या एकहजारावा अंशही आपल्याला ज्ञात नाही.
  •  आपण एखाद्या तरुणीचे प्रियाराधन करत असतो तेव्हा एक तास एका सेकंदासारखा वाटतो, मात्र आपण जळत्या ओंडक्यावर बसतो तेव्हा एक सेकंद एका तासासारखा भासतो. हाच माझा सापेक्षवादाचा सिद्धांत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link