Next
अरुणाचलचा चहा थेट मुंबईत!
शुभदा चौकर
Friday, September 06 | 01:15 PM
15 0 0
Share this story


नावातच ‘अरुण’ आहे, असे रमणीय राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश! रोज अरुणोदय होताच चहाने दिवस सुरू करण्याची सवय असलेल्या भारतीयांसाठी ज्या ज्या प्रांतात चहाचे मळे फुलवले जातात, त्यातील एक महत्त्वाचे राज्य म्हणजे अरुणाचल.
मध्यंतरी ताना निकम नावाचा एक वल्ली भेटला. अरुणाचल प्रदेशमधील पापुम्पारे जिल्ह्यातील सोनाजुली हे गाव ताना निकमच्या चहाच्या मळ्यांनी फुलले आहे. अवाढव्य टी इस्टेटचा मालक आहे हा! बेताची शरीरयष्टी, मंगोलियन चेहरेपट्टी असलेला ताना निकम बोलायला, वागायला एकदम साधा. वाटणार नाही हा एवढा बडा असामी आहे असे!
त्याच्याकडील चहाची लज्जत आवडीने चाखणाऱ्या खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी तानाकडचा चहा ‘मुंबई ग्राहक पंचायत’च्या वाटपात देता येईल का बघा, असे सुचवले. कोणताही माल दलालीविना थेट उत्पादकाकडून ग्राहकाकडे पोचावा असा प्रयत्न ‘मुंबई ग्राहक पंचायत’ करत असते. सुमारे ३३,००० ग्राहक सदस्यांना असा थेट माल मिळतो तेव्हा दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत मिळू शकतात. ताजी चहापावडर अशी थेट उत्पादकाकडून मिळू शकली तर बघूया म्हणून ताना निकम यांची भेट घेतली. नमुने मागवले. त्यांनी नमुने पाठवले. परंतु ‘मुंबई ग्राहक पंचायत’च्या चोखंदळ खरेदी समितीने ते नापसंत केले. कारण विचारले, तेव्हा कळले, की तो नुसता पत्ती चहा होता, आपल्याला लागतो तसा ‘ब्लेन्डेड’ नव्हता. मग ब्लेन्डेड चहापावडरचे नमुने मागवले. ते एकदम पसंत पडले. त्याचा स्वाद, रंग आणि ताजेपणा खरेदी समितीच्या मनात भरला.
‘मुंबई ग्राहक पंचायत’च्या शिरस्त्याप्रमाणे एक टीम उत्पादनप्रकल्प बघायला अरुणाचल प्रदेशात गेली. तानाच्या गावातील डोंगररांगाच्या उतरणीवर दूरदूरपर्यंत चहाच्या मळ्यांनीच नक्षीकाम करावे अशा रांगा ‘पापुम्पारे टी इस्टेट’ने व्यापल्या होत्या. त्या बघून अचंबित झालेली टीम प्रत्यक्ष चहा कसा बनतो हे पाहून आली. तेथे त्यांनी पाहिले, की चहाच्या झुडपावरील फक्त तीन पानांचा तुरा चहा बनवण्यासाठी कसा खुडला जातो ते! तोडणीनंतर सर्व पाने मोठ्या जाळ्यांवर पसरली जातात, धुतली जातात. पानावरील व पानांतील अतिरिक्त पाणी सुकवले जाते. ही पाने मोठाल्या जाळीदार पिशव्यांतून कन्व्हेअर बेल्टवरून ग्राईंडिंग मशीनपर्यंत नेली जातात. पुढे आपल्या पाटा-वरवंटासदृश मोठाल्या ड्रममधून पाने वाटली जातात. मग त्या पानांना उष्णता दिली जाते. त्याचा हिरवागार रंग हळूहळू बदलत काळपट तपकिरी होऊ लागतो. दाणेदार ते बारीक पावडर अशा विविध ग्रेडचा चहा तेथे तयार होतो. ‘पापुम्पारे टी’ या ब्रँडनेमने बाजारात येतो.
‘पापुम्परे’चे मालक ताना निकम हे मुंबईत शिकलेले आहेत. व्हीजेटीआयचे सिव्हिल इंजिनीयर. १९९० मध्ये इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांच्या आदेशावरून ते गावात परतले आणि वडिलोपार्जित टी इस्टेट पाहू लागले. त्यांनी तो व्यवसाय खूप वाढवला. ‘पापुम्पारे’ हा ब्रँड विकसित केला. ते मुंबईत शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता होते. तेव्हा संगीतकार सुधीर फडके यांच्या घरी त्यांचे जाणे, येणे, राहणे होत असे. सुधीर फडके हे मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य आणि पहिले अध्यक्ष. बाबूजींशी ऋणानुबंध असलेल्या संस्थेच्या सभासदांना स्वनिर्मित चहा देण्याची कल्पना प्रत्यक्षात येणे हा ताना निकम यांच्यासाठी कृतकृत्यतेचा क्षण होता.
आता मुंबई ग्राहक पंचायतीचे अनेक सभासद रोजचा अरुणोदय थेट अरुणाचलच्या मळ्यातून येणारा निर्भेळ व स्वादिष्ट ‘पापुम्पारे’ चहा पीत साजरा करत आहेत.

नोंद : 
चहा विषयाचे महात्म्य आणखी वेगळ्या पद्धतीने उलगडणारा विस्तारली चहाची पाळेमुळे 
आणि  ‘चहानिशा ’ चहाच्या मार्केटिंगची हे लेख ही जरूर वाचा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link