Next
असा मी नंदी!
ललिता बर्वे
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


आपल्या पुराकथांचा स्वभाव पडला अघळपघळ आणि गोष्टीवेल्हाळ. त्यामध्ये मुख्य देवांच्या गोष्टीबरोबरच आणखी लहान-मोठ्या दैवी अवताराबद्दल एवढा भरभरून मजकूर असतो, की एखादा छोटासा ग्रंथ लिहिता यावा- जसं, “नंदी - जन्म आणि कारकीर्द.” आता तुम्हीच स्कंदपुराणातली ही गोष्ट बघा! नंदीचं नाव इथे वीरक आहे.
त्याचं असं झालं, एक दिवस शिव-पार्वती कैलासावर बसले होते. शिवाचं शरीर दिसत होतं फिकट, कारण आधीच तो भस्मविलेपित आणि त्यात भाळी अर्धचंद्र. पार्वती मात्र पूर्ण काळी होती. शिव चेष्टेत पार्वतीला म्हणाला, “माझ्यापुढे तू कशी दिसतेस सांगू? गोऱ्या चंदनवृक्षाला विळखा घातलेल्या काळ्या नागिणीसारखी! किंवा कृष्णपक्षातल्या रात्रीसारखी!” हे ऐकून संतापलेली पार्वती म्हणाली, “अरे, चंद्राचा अर्धा-मुर्धा तुकडा मिरवणाऱ्या, मारे आपल्या तपाचं सामर्थ्य मिरवतोस, पण खरं तर तूच आहेस दुर्गुणांची खाण आहेस. महा-काळ कसला, महा-काळा आहेस तू.” आता शिव गडबडला. त्यानं पार्वतीची माफी मागण्याचा प्रयत्न केला. आपण फक्त प्रेमातली थट्टामस्करी करत होतो, असंही म्हणून पाहिलं. पण, पार्वती कसली ऐकते! मग शिवही चिडला. म्हणाला, “बाकी तू हिमालयाचीच मुलगी. त्याच्या खोल खोल दऱ्यांसारखी आतल्या गाठीची. त्याच्या धारदार दगडांसारखी तीक्ष्ण. त्याच्या वळणावळणाच्या नद्यांसारखी नागमोडी.” त्यावर पार्वतीचा जबाब, “आणि तुम्ही हो, तुमच्या सापासारखे दुतोंडी! तुमचं हृदय, तुमच्या चंद्रासारखं डागाळलेलं. अंगाला राख फासता. तुम्हाला प्रेम म्हणजे काय ते कसं कळणार?”
तरी मूळ स्कंदपुराणात उल्लेखलेले हे पती-पत्नीमधल्या शेला-पागोट्याचे तपशील सौम्य करूनच इथे मांडले आहेत! मग पार्वती तरातरा राजवाड्याबाहेर पडली. त्याबरोबर शिवाच्या बाहेर असणाऱ्या गणांमध्ये हलकल्लोळ माजला. “आई, आम्हाला सोडून तू कुठे चाललीस?” त्यातल्या वीरकानं तर पार्वतीचे पायच धरले. “आई, आपल्या मुलाला सोडून तू कुठे चाललीस? मलाही घेऊन चल तुझ्याबरोबर. कारण आई मध्ये नसली तर वडिलांचा सगळा राग मुलावरच निघतो ना!” पार्वती त्याची समजूत घालत म्हणाली, “तू नको माझ्याबरोबर येऊस. एखाद्या शिखरावरून पाय घसरून पडायचास तू, पण मी सांगते, तू माझ्यासाठी काय काम कर ते. या शिवानं माझा भयंकर अपमान केला आहे. तेव्हा मी आता गोरी गौरी होण्यासाठी तपश्चर्येसाठी निघाले आहे. तू सतत इथेच दरवाजाबाहेर पहारा दे. सारखा किल्लीच्या भोकातून आत बघत जा. चांगलं लक्ष्य ठेव माझ्या वतीनं.”
पार्वतीचं काम ऐकून वीरक एकदम खुश झाला. त्याला जगण्याचा हेतूच मिळाला. तो आंनदानं आपल्या कामाला निघून गेला. मग आला गणपती. त्यानंही आपल्याला बरोबर नेण्यासाठी विनंती केली. पार्वती विचार करत म्हणाली , “शिवानं मला काळी म्हणून चिडवलं. तुझं तर डोकंसुद्धा हत्तीचं आहे. तुला तो काय बोलेल कोण जाणे. मुला, तू चल आपला माझ्याबरोबर. कारण अपमान करून घेण्यापेक्षा मृत्यूदेखील परवडला.” असा घोर निर्धार करून पार्वती निघाली. वाटेत तिला भेटली कुसुमामोदिनी. ही तिच्या आईची जवळची मैत्रीण. मग पार्वतीनं तिच्या गळ्यात पडून सर्व कहाणी तिला सांगितली. वर या मावशीलाही तिनं वीरकाप्रमाणेच शिवावर लक्ष ठेवायला सांगितलं.
येणेप्रमाणे आपल्या वैवाहिक आयुष्यावरची पकड जराही ढिली न होऊ देता पार्वतीची तपसाधना सुरू झाली. गणपती तिच्या मदतीला होताच. इकडे आदी नावाचा एक राक्षस होता. त्याला शिवाबरोबरच जुना हिशेब चुकता करायचा होता. पार्वती नाही असं बघून तो शिवाच्या निवासस्थानी पोचला. वीरक पहारा देत होता. तेव्हा त्याला चकवण्यासाठी सापाचं रूप घेऊन तो आत शिरला. आणि आत गेल्यावर शिवाला चकवण्यासाठी त्यानं पार्वतीचं रूप घेतलं. पार्वतीला बघून शिव खूप खुश झाला. ही पार्वती म्हणाली, मी तप करायला गेले होते खरी. परंतु तुझ्या ओढीनं परत आले. तेव्हा शिवाच्या खरा प्रकार लक्षात आला. आपला निर्धार पूर्ण न करता येते, ती पार्वती असूच शकत नाही. शिवाय तिच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला असणारी त्याच्या ओळखीची ती सुंदरशी कमलपुष्पाच्या आकाराची केसाची बटही दिसली नाही! हे कळल्यावर त्यानं त्या राक्षसाला ठार केलं.
वीरकाला याचा काहीच पत्ता नव्हता. कुसुमामोदिनीला मात्र काहीतरी अर्धवट गोष्ट कळली, की शिवाकडे कोणी बाई आली होती. तिनं ताबडतोब वाऱ्याच्या झुळुकीबरोबर पार्वतीला ते कळवून टाकलं. त्याबरोबर पार्वतीचा संताप उफाळून आला. तोही वीरकावर. याला राखण करायला बसवला पण मी सांगितलेलं काम यानं केलं नाही. तिनं तडकाफडकी त्याला शाप देऊन टाकला. “माझ्या जरुरीला तू असा थंड प्रतिसाद दिलास. आता तुझी आईही एक थंडगार शिळा असेल.” बिचारा वीरक! वडिलांच्या रागापासून स्वतःला वाचवायला गेला. परंतु आता सावन जो अगन लगाये असं झालं! पार्वतीचा राग इतका भयंकर होता, की त्यापासून एक महाभयंकर सिंह बाहेर आला. त्याचवेळी ब्रह्मा प्रकट झाला. त्यानं पार्वतीच्या इच्छेप्रमाणे तिला वर दिला, तू शिवाला साजेशी अशी त्याची अर्धांगी होशील, म्हणजे त्याचं अर्धं गोरं शरीर तू असशील. ब्रह्मा हे बोलला मात्र, झपाटणाऱ्या अस्तित्वानं मूळ शरीर सोडावं तशी पार्वतीच्या शरीरामधून एक आकृती बाहेर पडली. ती होती गडद निळ्या कमळासारखी. काळी आकृती, त्रिनेत्र, लाल-पिवळे कपडे, भरपूर दागिने अशा त्या देवीला ब्रह्मा म्हणाला, तू आता विंध्यवासिनी हो. हा सिंह तुझे वाहन असेल. आणि या गौरी-पार्वतीचं मूळ आणि अखंड स्वरूप म्हणून तूच ओळखली जाशील.
याप्रमाणे विंध्यवासिनी असणारी मूळ देवी विंध्य पर्वतावर निघून गेली. तर गौरी झालेली पार्वती कैलासावर परत आली, तेव्हा वीरकानं तिला ओळखलं नाही. तिला अडवत तो म्हणाला, माझ्या आईशिवाय कोणतीही स्त्री आत जाऊ शकत नाही. एक राक्षस इथे आला होता. त्याचं शिवानं पारिपत्य केलं. वर मला मात्र तो रागावला की कोणत्याही स्त्रीला आत सोडू नकोस. आता सर्व घोटाळा पार्वतीच्या ध्यानात आला. ती हळहळत म्हणाली, सगळी वस्तुस्थिती जाणून न घेता मी उगीचच की रे तुला शाप दिला. पण आता त्याला नाइलाज आहे. तुला मनुष्य जन्म घ्यावाच लागेल. तुझी आई असेल गणेशचिन्ह असणारी शिळ‌ा. परंतु काळजी करू नकोस. तिथे राहून तू शिवाची साधना केलीस, की परत इकडे कैलासावर द्वारपाल म्हणून येशील.
दुर्लभ मनुष्यजन्म मिळणार म्हणून बिचारा नंदी खुश झाला. गणेशचिन्ह असणारी शिळा म्हणजे ‘ॐ’ अशी खूण असणारी शिळा. गणपतीच्या अनेक जन्मकथांपैकी एक अशीही आहे, की पार्वतीनं गणेशजन्माआधी ॐचा पवित्र आकार पाहिला. म्हणून ॐ हे चिन्ह गणेशाशी जोडलं गेलं आणि गणेशचिन्हाची शिळा, म्हणजे जिच्यावर ॐचा आकार असेल, अशी शिळा.
आता नंदीच्या गोष्टीशी याचा संबंध असा, की शिलदा नावाचा एक भक्त शिवाची तपश्चर्या करत होता. त्याला पुत्रप्राप्तीची इच्छा होती. तेव्हा शिवाच्या आशीर्वादानं त्याला शेत नांगरताना मुलगा मिळाला. म्हणून शिळा ही त्या मुलाची आई. तोच हा वीरक किंवा नंदी. नंतर या वीरकानंही तपश्चर्या केली आणि पार्वतीच्या आशीर्वादाप्रमाणे तो परत कैलासावर द्वारपाल म्हणून रुजू झाला. नंदीच्याही कथा काही कमी नाहीत. रावणानं त्याला बैल म्हटलं म्हणून त्यानं रावणाला शाप दिला, की एक माकड त्याचं राज्य नष्ट करेल. त्याप्रमाणे हनुमानानं लंका पेटवून दिली. नंदीनं इंद्राशी युद्ध केलं आणि त्याच्या ऐरावताचं डोकं छाटून ते गणेशाला लावलं. आता असा प्रश्न पडू शकतो, की गणेशचिन्ह असणारी शिळा जर नंदीची आई होती, तर नंदीनं गणेशासाठी डोकं कसं बरं आणलं असेल? या उलट्या-सुलट्या घटनांचा कालक्रम कसा लावायचा? - तर पुराणाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये वेगवेगळे तपशील सामावले गेले असा त्याचा अर्थ!
समुद्रमंथनातून हलाहल बाहेर पडलं. ते शिवानं प्राशन केलं. त्याच्या शरीरभर ते पसरू नये म्हणून पार्वतीनं शिवाचा गळा धरून ठेवला. तरीही त्यातलं थोडंसं हलाहल खाली सांडलं आणि ते नंदीनं प्राशन केलं. परंतु त्याला काहीही झालं नाही, कारण तो शिवाचा निस्सीम भक्त होता.
तमिळ पुराणातल्या एका कथेप्रमाणे शिव एकदा पार्वतीला वेद समजावून सांगत होता. परंतु तिचं त्या शिकण्यावरचं लक्ष्य ढळलं, म्हणून तिला पृथ्वीवर येऊन कोळीण व्हावं लागलं. आता या पार्वतीला शोधायचं कसं आणि परत आणायचं कसं? मग नंदी झाला देवमासा. त्यानं सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग पार्वती कोळिणीच्या वडिलांनी जाहीर केलं, की जो कोणी या देवमाशाची शिकार करेल, त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. मग काय, शिवानं येऊन देवमासा आणि कोळीण अशा दोन्ही शिकारी साधल्या आणि परत एकदा शिव-पार्वतीचं मिलन झालं.
कुशाणकाळापासून म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून नंदी हे शिवाचं वाहन बनलं. पशुपती हे शिवाच्या नावांपैकी एक आहे. तरी इथे पशू म्हणजे फक्त नंदी किंवा फक्त गाई-बैल नव्हेत. नंदी हा झूमॉर्फिक म्हणजे बैलाच्या रूपातच आपल्या जास्त ओळखीचा आहे. दक्षिण भारतात अँथ्रोपॉमॉर्फिक म्हणजे मनुष्याकृती नंदी बघायला मिळतो. त्यांना नंदीकेशवर किंवा अधिकारनंदी म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे या स्वरूपात त्याची मूर्ती शिवासारखीच असते. तसाच तिसरा डोळा, चार हात, डोक्यावर चंद्रकोर आणि तसाच जटासंभार. फरक इतकाच की या नंदीचे हात जोडलेले असतात.
शिवलिंगाचं दर्शन प्रथम नंदीच्या गोलाकार असलेल्या शिंगामधून घ्यायची पद्धत आहे. तसंच शिवाकडे करायची मागणी अगोदर नंदीच्या कानात सांगायची पद्धत आहे. या दोन्ही गोष्टी पार्वतीनं त्याच्यावर जी द्वारपालाची कामगिरी सोपवली होती त्याच्या जवळच जाणाऱ्या आहेत. शिंगामधून शिवाला बघणं हे किल्लीच्या भोकातून बघण्याचीच आठवण करून देणारं आहे! तसंच धन्यासाठीचा निरोप, त्याच्याकडे असलेलं काम हे अगोदर द्वारपालाच्या कानी घालायलाच हवं. कारण आपल्या बॉसकडे जाणाऱ्या सर्व मॅटरची ‘प्रायमा फेसी स्क्रुटिनी’ करण्याची त्याची जबाबदारीच आहे मुळी!
खरंच, नंदी एवढा भोळा आणि प्रामाणिक आहे, की त्याचं भोलानाथ नाव अगदी सार्थच आहे!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link