Next
‘गरबा ग्रूमिंग’चा ट्रेंड!
मनीषा सोमण
Friday, September 27 | 03:00 PM
15 0 0
Share this story

गेल्या वर्षी याच सुमारास म्हणजे नवरात्र तोंडावर आली असताना एक फोन आला, “मॅडम, हम गरबा ग्रूमिंग क्लासेस चलाते है, क्या आप देखने आ सकती है? पेपर में इसके बारेमें कुछ लिख सकते है?”
‘गरबा ग्रूमिंग’ हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी तिथे पोहोचले. मोठ्या वातानुकूलित हॉलमधे जवळपास ५०-६० मुलं-मुली होत्या. शनिवार-रविवारी प्रत्येकी दोन तासांच्या तुकड्यांमध्ये हे वर्ग घेतले जात असल्याचं मला समजलं. प्रत्येक वर्गामध्ये ५०-६० मुलं... दोन तासांसाठी दोन हजार रुपये फी!
म्हणजे गरब्यामधे कसं नाचायचं हे शिकणं इतकं महत्त्वाचं आहे? मुळात गरब्यासाठी कसं नाचायाचं हे शिकावं लागतं? गरबा आणि दांडिया... यात फेर धरायचा आणि टाळ्या वाजवत किंवा टिपरी पडे टिपरीवर म्हणतात ना, त्या तालात नाचायचं... त्यात शिकायचं ते काय? पण हे प्रश्न किती फोल होते ते दुसऱ्याच क्षणी समजलं. गरबा खेळतांना किती वेगवेगळ्या प्रकारे टाळ्या द्यायच्या, कशा आणि कधी गोल गिरक्या घ्यायच्या... नृत्याच्या भाषेत सांगायचं तर सम कशी पकडायची... अर्थात तिथे उपस्थित असणाऱ्या मुलांना सम वगैरे असे टेक्निकल शब्द कळणं शक्य नव्हतं.... टिपरीवर टिपरी किती वेगवेगळ्या प्रकारे पडू शकते, त्यावेळी पायांच्या हालचाली कशा असाव्यात, हे सगळं विस्तारानं शिकवलं जात होतं. शिकणारेही त्यात रममाण होऊन इमानदारीनं शिकत होते.
गरब्यासाठी नऊ दिवस कपडे कसे असावेत, मिक्स अॅण्ड मॅच कसं करता येईल, हेअर स्टाईल, मेकअप यावर टिप्स दिल्या गेल्या आणि ग्रूमिंग सेशन संपलं! काहीतरी वेगळं शिकण्याचा आनंद घेऊन ती मंडळी बाहेर पडली. गंमत म्हणजे एरवी विविध वयोगटाचे लोक एकत्र यायला नाकं मुरडात. परंतु इथे १५ ते ४० वयाची मंडळी दोन तास एका छताखाली सुखानं नांदत होती.
सगळ्यांनी एकत्र मिळून नाचायचं-गायचं, उत्सव-आनंद साजरा करायचा ही आपली संस्कृती. त्याच संस्कृतीचा गरबा हा एक भाग. मग त्याचं इतकं व्यावसायिकीकरण कशाला, हा विचार करत असतानाच लक्षात आलं या नाण्याची दुसरी बाजूदेखील आहे. एरवी ताल-सूर-ठेका-सम-लय या शब्दांशी काही देणंघेणंही नसणारी ही मंडळी या गरब्याच्या निमित्तानं ठेक्यावर नाचायला शिकताहेत, समेवर गिरक्या घेताहेत, लयीत टाळ्या किंवा टिपऱ्या वाजवतायत... त्यांच्या अंगात नऊ दिवसांसाठी का होईना पण नृत्य भिनतंय, तर काय हरकत आहे? मुळात काहीतरी शिकावं असं वाटतंय, हेच किती महत्त्वाचं आहे!
गरब्यासाठीच नव्हे तर हल्ली कोणत्याही कारणासाठी नाचायचं असो, तो नाच प्रेक्षणीय व्हावा याकडे लोकांचा कल वाढताना दिसतो आहे. लग्नाआधी मेंदी आणि संगीत हे प्रकार आता अगदी खेड्यापाड्यातही रुजू लागले आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना- नव्हे इव्हेंटना- नाचणं तर अपरिहार्य! आणि तेही असं तसं नव्हे तर अगदी कोरिओग्राफर वगैरे बोलावून. माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं. मुलीकडची मंडळी धुळ्याच्या भागातली. लग्न मुलीच्या मांडवी... अगदी साग्रसंगीत चार दिवसांचा सोहळा... म्हणजे त्यात मेंदी आणि संगीत हेही कार्यक्रम! त्या मैत्रिणीनं तिच्या घरच्यांना (त्यात वयोगट होता ८ ते ८०) संगीत कार्यक्रमाला नाच शिकवण्यासाठी कोरिओग्राफर नेमला. इतकंच नाही तर तोच कोरिओग्राफर तिनं त्या मुलीच्या घरीही रवाना केला. कोरिओग्राफला बोलावून, हजारो रुपये फी देऊन खास लग्नासाठी नाच शिकण्याची पद्धत आहे हल्ली!
आता शाळा-कॉलेजच्या गॅदरिंगला नाच बसवायलाही कोरिओग्राफर नेमला जातो. आम्ही शिकत असताना एखाद्या हौशी बाई किंवा सर त्यांना येतं तितकं आणि तसं नाचायला शिकवायचे. आता असा इमॅच्युअर नाच ना नाचणाऱ्यांना आवडतो, ना बघणाऱ्यांना. जितकी मोठी शाळा किंवा कॉलेज, तितका महागडा कोरिओग्राफर! अगदी गणेशउत्सवाच्या कार्यक्रमात किंवा सोसायटीच्या स्नेहसंमेलनात नाच बसवून घ्यायला कोरिओग्राफर बोलावला जातो.
एक कोरिओग्राफर मित्र सांगत होता, “सिनेमासाठी कोरिओग्राफर म्हणून किती जणांना काम मिळणार? या नवीन पद्धतीमुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतल्या कोरिओग्राफरना चांगले दिवस आले आहेत.”
तसंही हल्ली टीव्हीवर सातत्यानं दिसणाऱ्या नाच-गाण्यांच्या रिअॅलिटी शोजमुळे असेल कदाचित, पण नाच-गाणं शिकणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यातही हिंदी सिनेमासारखे नाच शिकवणाऱ्या, बॉलीवूड डान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी वेटिंग लिस्ट असते.
एकंदरीत या नव्या ट्रेंडमुळे चाकोरीबाहेरच्या, अभ्यासेतर क्षेत्रांतही मुलं करिअर करू शकतात, हे पालक पिढीला समजू लागलं आहे. हा फायदा काय कमी आहे?
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link