Next
घरपोच दुचाकीदुरुस्ती
मानसी बिडकर
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


सविता मूळची पुण्याची, तिनं तिचं पदव्युत्तर शिक्षण वाणिज्य शाखेतून पूर्ण केलं. त्यानंतर तिनं CA आणि CS इंटरमीडीएट (intermediate) हे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिनं एका प्रायव्हेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत नोकरी केली. तिथं ती अकाउंट्स , फायनान्स, अॅडमिनिस्ट्रेशन अशी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळत होती. घरातील वातावरण शिक्षणाला व करिअरला पूरक होतं. मूळचीच हुशार व कर्तबगार असल्यानं तिला त्याच कंपनीत डायरेक्टरचं पद मिळालं. चार वर्षें त्या कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तिनं खंबीरपणे पेलली. नंतरची पाच वर्षें तिनं ऑटोमोबाइल स्पेअर पार्ट्सच्या क्षेत्रात निर्यात विभागाची जबाबदारी घेतली.
ऑटोमोबाइल स्पेअर पार्ट्सचे व्यवहार करताना तिला व तिच्या सहकाऱ्यांना ‘मोबाइल सर्व्हिस व्हॅन’ची संकल्पना सुचली. त्याचं झालं असं, की सवितानं पुण्याच्या बाणेर भागात नवीन घर घेतलं. तिथं आय. टी. क्षेत्रातील बरेच जण राहतात. तिला तिच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये बोलताना हे जाणवलं की या लोकांना गाडी दुरुस्तीला टाकण्यासाठी कामावर उशिरा जावं लागतं किंवा सुट्टी काढावी लागते. मग तिला वाटलं, की इतक्या व्यग्रतेमध्ये जर त्यांना ही सेवा ऑफिसमध्ये किंवा घराजवळच मिळाली तर... आणि मग ‘एक्स्प्रेस मेन्टेनन्स सेवा प्रायव्हेट लिमिटेड (इएम-सेवा)’ या कंपनीचा जन्म झाला. साधारणतः २०१५ मध्ये त्यांची ही संकल्पना सत्यात उतरली. त्यासाठी त्यांनी बालेवाडी येथे एक कंपनीचं ऑफिस सुरू केलं व टू-व्हीलरच्या दुरुस्तीची सुविधा ग्राहकांच्या ऑफिसमध्ये किंवा घरी जाऊन द्यायला सुरुवात केली. त्यासाठी अद्ययावत अशी मोबाइल सर्व्हिस व्हॅन (MSV) घेतली. कोणत्याही अधिकृत सर्व्हिस स्टेशनप्रमाणेच याचाही सेटअप आहे. तिनं टेम्पो ट्रॅव्हलर गाडीत गॅरेज केलं, ज्याला मोबाइल गॅरेज म्हणता येईल.
यामुळे ग्राहकांची मोठी सोय झाली. ग्राहकाला स्वत: कुठेही जावं लागत नाही. ग्राहकाच्या घराजवळ दुरुस्तीची व देखभालीची सुविधा मिळाल्यानं त्याचा वेळ वाचतो. त्याचप्रमाणे गाडी सर्व्हिस स्टेशनला नेणं म्हणजे प्रदूषणात भर! इथे एकच व्हॅन प्रवास करून सेवा देत असल्यामुळे वेळ, पैसा, पेट्रोल व प्रदूषण यांची बचत होते. तसंच कामाच्या दिवशी ही व्हॅन कंपनीत तर सुटीच्या दिवशी घराजवळ उपलब्ध होऊ शकते. मोबाइल सर्व्हिस व्हॅन ज्या आवारात ठेवली जाते, तिथे येणाऱ्या व तेथील रहिवाशांना या सेवेचा लाभ घेता येतो. एका गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी ४५ ते ६० मिनिटं इतका वेळ लागतो. त्यामुळे ग्राहकाला गाडी गॅरेजला टाकून ती येण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. गेल्या चार वर्षांत १२ हजार पेक्षा जास्त ग्राहक सवितानं जोडले आहेत. १०० पेक्षा जास्त ठिकाणी ही सेवा दिली जाते.
सविताला भविष्यात अशा आणखी मोबाइल सर्व्हिस व्हॅन वाढवायच्या आहेत. पुण्याप्रमाणेच पुण्याबाहेरही ही सेवा उपलब्ध करून द्यायची तिची इच्छा आहे. दोनचाकीबरोबरच चारचाकीसाठीसुद्धा ही सेवा उपलब्ध करून द्यायचं तिचं उद्दिष्ट आहे. हे सर्व करताना कंपनीचा कारभार पाहणं, त्याप्रमाणेच ग्राहकांचं समाधान करणं, वेळेत सेवा देणं, त्याप्रमाणे कामगार उपलब्ध करून त्यांना प्रशिक्षण देणं हे सर्वच ती लीलया करत आहे. या क्षेत्रात महिला कमी आहेत, पण सविता तिच्या व्यवसायात कुठेही कमी न पडता ग्राहकांना सतत सेवा देत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link