Next
जिद्दी मारिआतु
मंगला गोखले
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


युद्धात सापडलेल्या निरपराध मुला-माणसांना किती हालअपेष्टा सोसाव्या लागतात याचा आपणा भारतीयांना, विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांना अनुभव नाही. पण पुनर्वसन करणाऱ्या विविध देशांतील माणसांमुळे, समाजसेवी संस्थांच्या मदतीनं अशाही विलक्षण परिस्थितीवर मात करून, त्यातून सावरून, पुन्हा माणुसकीनं वागण्याची ताकद, हिंमत दाखवणाऱ्या मारिआतु कामाराची ही सत्यकथा आहे- ‘द बाइट ऑफ द मँगो.’
तशा या सर्व घटना अगदी अलीकडच्या. विसाव्या शतकातील एका बंडाळीनं, युद्धानं एका बारा वर्षांच्या कोवळ्या मुलीला जिवंतपणीच मरणयातना सोसाव्या लागल्या. या युद्धानं तिचं बालपण हिरावलं. जवळची माणसं पांगली. एवढंच नव्हे तर तिच्यासह अनेकांच्या दोन्ही हातांचे पंजेही कापले गेले. परंतु इतक्या रानटी, अघोरी अत्याचारातूनही, इतरांच्या मदतीमुळे मारिआतु सावरली. या सगळ्यांविषयीची कहाणी आहे- आफ्रिका खंडातील सिएरा लिओन या देशातील छोट्याशा वस्तीत राहणाऱ्या एका निष्पाप, छोट्या मारिआतु कामाराची.
मानार्मा गावावर, बंडखोर तरुणांनी हल्ला केला. घरं उद्ध्वस्त केली. माणसं मारली. मारिआतुला दहा तास ओलीस ठेवलं. नंतर मागे करकचून बांधलेल्या दोन्ही हातांचे पंजे कापून टाकले. तसंच तिच्या भावंडांचे, अनेक मुलांचे हातपाय कापून, कायमचं अपंग केलं. सरकारविरुद्धच्या असंतोषातून ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
कसा आहे हा सिएरा लिओन देश, इथे असे बंडखोर का निर्माण झाले, ही पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे.
१६ व्या शतकात एक पोर्तुगीज आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याची सफर करत असताना, फ्रीटाऊन बंदराशी पोचला. त्यावेळी तिथे वादळ-विजा कडकडत होत्या. सिंहाच्या गर्जनेसारखा आवाज डोंगरशिखरातून उमटत होता. तो सिंहाच्या गर्जनेसारखा आवाज वाटला, म्हणून त्यानं या भागाचं नाव ‘सिएरा ल्योआ’ म्हणजेच Mountain Lion किंवा सिंहाचा डोंगर ठेवलं. हा सिएरा लिओन देश जास्त काळ परकीयांच्या ताब्यात राहिला. ही ब्रिटिशांची मालमत्ता समजली जात असे. आफ्रिकेतील या भागातील अनेक लोकांना जबरदस्तीनं जहाजात भरून, गुलाम करून उत्तर अमेरिकेत नेण्यात आलं. अन्नावरी फुकटात राबवून घेण्यात आलं. पुढे गुलामगिरी बंद झाली. तेव्हा तिथून सुटून निघालेले लोक सिएरा लिओनमध्ये परत आले. परंतु या सगळ्या लोकांना इथली टेम्ने किंवा मेंडे भाषा येत नव्हती. अनेक वर्षं अमेरिकेत राहिल्यानं ते ‘क्रिओ’ म्हणजे इंग्रजी भाषेचं मोडकं-तोडकं स्वरूप असलेली भाषा बोलायचे. बाकी सुधारणा, शिक्षण काही नाही. अनेक प्रथा-परंपरा पाळणारी ही सामान्य माणसं होती. नवऱ्या मुलीला मागणी घालायला आलेल्यांना पाण्यानं पूर्ण भरलेले मोठे मोठे कप दिले जातात. पाणी म्हणजे युद्ध व शांततेचं प्रतीक. अशाप्रकारे केवळ पाणी देऊन आम्हाला ही सोयरीक पसंत आहे, हे व्यक्त केलं जात असे. नवऱ्यामुलानं, नवऱ्यामुलीला एका मोठ्या भोपळ्यात संसारोपयोगी वस्तू भेट देण्याची यांच्यात पद्धत आहे. या भोपळ्यात सुईदोरा, चॉकलेट्स, कुराणाची प्रत आणि कित्येक हजार लिओन्स हुंडाही दिला जातो. दहा हजार लिओन्स म्हणजे तीन अमेरिकन डॉलर. मुलगी वयात आल्यावर तिच्यावर बोंडो इनिसिएशनचा एक अघोरी विधी केला जातो. हा झालेला नसेल तर त्या मुलीला परकं, परदेशी समजलं जातं. गावात कुणाचं निधन झालं की सगळे जण तीन दिवस घरात राहून दुखवटा पाळतात. कुणीही काम करत नाही. सगळी माणसं गोलाकार बसून राहतात आणि मोठी माणसं रडत असतात. अखेर सिएरा लिओनच्या मृत व्यक्तींच्या सन्मानार्थ तीन वेळा जेवणावळी घालण्याची पद्धत आहे. त्याला दफन केलं जातं त्या दिवशी. या भागातील वडील माणसांना उलट उत्तरं देण्याची, त्यांच्यापुढे बोलण्याची मुलांची टाप नसते. तो उद्धटपणा समजला जातो. टेम्ने भाषेत ‘या’ म्हणजे आई, ‘पा’ म्हणजे बाबा. तर ‘पाम’ म्हणजे लाकडी होडी. मारिआतुला आजी म्हणायची, ज्या दिवशी आपल्याला स्वप्नात ‘पाम’ दिसेल त्या दिवशी नक्कीच रक्त सांडलेलं पाहावं लागेल! अशा अनेक समजुती, प्रथा, परंपरा असलेला हा देश.
अखेर १९६० मध्ये सिएरा लिओनला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं. हिरे, बॉक्साइटसारख्या खनिजांनी भरलेला असा हा देश. नैसर्गिक संपत्ती भरपूर असूनही सामान्य माणसांपर्यंत ही संपत्ती पोचत नव्हती. त्यामुळे आपण दरिद्रीच राहिलो, ही जाणीव आता देशवासीयांना होऊ लागली. हातात पैसा नाही, तरुण मुलांना नोकऱ्या-धंदे नाहीत, याचा परिणाम अखेर बंडखोर युद्धाला तोंड फुटलं. खाणीतील हिरे विकून, शस्त्रं खरेदी करून लढा उभारला. तरुण मुलांची माथी भडकावून त्यांना बंडखोर सैनिक बनवायला सुरुवात झाली. १९९९ मध्ये तर बंडखोरांनी फ्रीटाऊनवर हल्ला केला. गावंच्या गावं उद्ध्वस्त केली. अनेकांचे हातपाय तोडले. अनेकांना गोळ्या घालून मारून टाकलं. अत्याचार, आक्रोश, वेदना, फसवणूक, असहायता हेच प्राक्तन स्वीकारून याही परिस्थितीत आयुष्याचा पट नव्यानं मांडून, कापलेल्या हाताच्या दंडाला वेलक्रोनं चमचा बांधून जेवायची सवय करून, शिकून, समजसेवी संस्थांच्या मदतीनं मारिआतुनं स्वत:चं आयुष्य सावरलं. आता ती फ्रीटाऊनमधील अबरदीनच्या मदतछावणीत राहून दिवसा भीक मागून पैसे मिळवू लागली.
या कॅम्पमधील छावणीतील काही मुलांनी थिएटर ग्रुप तयार केला. बंडखोरांच्या हल्ल्यावरची ‘माफी आणि समेट’सारखी नाटकं सादर करायला सुरुवात केली. बंडखोर आणि युद्धबळींवरच्या या नाटकांद्वारे त्यांनी बंडखोरांना आता आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चात्ताप होत आहे आणि आता त्या सगळ्यांना आपल्या गावाकडे परत जाऊन साधं जीवन जगण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. एखाद्या मदत करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी किंवा राजकीय पुढारी आले की थिएटर ग्रुप त्यांच्यापुढे नाटकं सादर करत. यामुळे आपल्या देशातील समस्यांची लोकांना जाणीव, जागृती करून देत असत. यामुळे कॅम्पमधील अनेक मुलांचं कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, जर्मनीत पुनर्वसन झालं. असंच एक दिवस, कंफर्ट नावाची एक समाजसेविका, मारिआतुला भेटायला आली. तिनं सांगितलं की तुझ्याविषयीची फोटोसह बातमी कॅनडामधील बिल नावाच्या माणसानं वाचली आणि तुझ्यासाठी अन्न, कपडे, पैसे पाठवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अबरदीन कॅम्पमध्ये राहयला लागून तिला आता दोन वर्षं झाली होती. एवढ्यात एक दिवस याबोम ही स्त्री तिला म्हणाली, “इंग्लंडला चल. तिथे डेव्हिड नावाच्या माणसानं तुला कृत्रिम हात बसवून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.” तेव्हा याबोमबरोबर ती इंग्लंडला गेली. डेव्हिड आणि मारियामाच्या मदतीमुळे तिला कृत्रिम हात मिळाले. थोडंफार इंग्रजीही शिकली. परंतु तिचं मन तिथे रमेना. तिला कॅनडाला जायचे वेध लागले. कंफर्टच्या मदतीनं कॅनडाचा व्हिसा मिळवून तिच्यासह ती कॅनडाला पोचली, तर विमानतळावर अनेक पत्रकार तिला भेटायला आलेले होते. तेवढ्यात बिल, त्याची बायको शेली आणि मुलगा रिचर्ड तिथे पोचतात आणि तिला घरी घेऊन येतात. विशेष म्हणजे कॅनडात स्थानिक झालेल्या अनेक सिएरा लिओन कुटुंबांनी आपल्या देशातील युद्धपीडित मुलांना आणून, त्यांचं पुनर्वसन करण्याचं मनावर घेतलं होतं. त्यांपैकीच एक टोरंटोमधील काडी आणि अबाऊ हे जोडपं. त्यांनी ‘सिएरा लिओन स्थलांतरित पुनर्वसन केंद्र’ तिथे सुरू केलं होतं, अशी मदत बंडखोरांच्या लढाईपूर्वीच लंडनमध्ये राहायला आलेल्या मारियामानं लंडनच्या सिएरा लिओन समाजासाठी सुरू केलेली होती. लंडनमध्ये नवीन आलेल्या विस्थापित लिओनी लोकांना घर, नोकऱ्या शोधायला मदत करायची. वैद्यकीय मदत मिळवून द्यायची. उपचारासाठी पैसे गोळा करणं, अशी कामं करायची.


ठरल्याप्रमाणे मारिआतु काडी आणि अबाऊ यांच्या कॅनडातील घरी जाते. तिथे क्रिओ भाषा बोलणारी मुलं भेटणार आणि लिओनी पदार्थ खायला मिळणार म्हणून मारिआतु आणखीच खुश झाली होती. तिथल्या मुलांबरोबर तिला टेम्ने भाषा बोलायला मिळते. त्यांच्या शाळेच्या गमतीजमती ऐकून तिलाही शाळेची
ओढ लागते.
खरं तर सिएरा लिओनमध्ये क्रिओ, मेंड, टेम्ने या भाषा बोलल्या जात असत. तरी शिक्षण मात्र इंग्रजीतूनच घ्यावं लागतं. इंग्रजी ही जगाची भाषा असल्यामुळे नोकरीधंदा करण्यासाठी लिओनच्या लोकांना इतरांशी इंग्रजीतून बोलता यावं, म्हणून इंग्रजी भाषेचा आग्रह. पण मारिआतु कधी शाळेतच गेली नव्हती. त्यामुळे कॅनडात तिला शाळेत शिकावंसं वाटलं तरी भीतीही वाटत होती. तेव्हा काडीनं तिला इंग्रजी बोलण्याच्या क्लासमध्येही घातलं. कॅनडातील सिएरा लिओन स्थलांतरित पुनर्वसन केंद्राचीही मदत तिला मिळाली. अखेर दहा महिन्यांत मारिआतु इंग्रजी भाषेचा डिप्लोमा पूर्ण करते आणि त्यानंतर शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेते. २००४ पर्यंत काडीच्या कुटुंबात राहूनच ती स्वत:ला घडवते. पुढे अपंग व्यक्तींना हाताळायला सोपा जाईल असा एक लॅपटॉप तिला मिळतो. त्याचा माऊस एका मोठ्या चेंडूच्या आकाराचा असल्यानं मारिआतु तो दंडानं हलवू शकत होती. त्यामुळे ती इंटरनेट जोडायला, इमेल पाठवायलाही शिकली. पुढे तिला अतिशय हलके, मज्जातंतूंशी जुळवलेले, खऱ्या हातासारखी स्नायूंची हालचाल करणारे, कृत्रिम हात मिळाले. तरीही दंडाच्या साहाय्यानं अनेक गोष्टी करण्याची सवय
तिला होतीच.
कॅनडात असतानाच तिला कळलं की जगात अनेक ठिकाणी लढाया चाललेल्या असतात. बंदुका आणि बॉम्बमुळे जायबंदी झालेली तिच्यासारखी लहान मुलं आज अनेक देशांत आढळून येतात.
ओळखीच्या एका शिक्षिकेनं तिला तिच्या आयुष्यातील विलक्षण अनुभवांवर आधरित पुस्तक लिहायला सांगितलं. नऊ वर्षांच्या या उलथापालथीत मारिआतुचं सारं आयुष्यच बदलून गेलं होतं. ही सारी सत्यपरिस्थिती जगाला कळावी, कळायला हवी, म्हणून २००७च्या एप्रिल महिन्यात ती पुस्तक लिहायचं ठरवते.
आता मारिआतु ‘युनो’साठी काम करते. त्यांच्यातर्फे ती उत्तर अमेरिकेत ठिकठिकाणी ‘युद्धपरिस्थितील बालके’ या विषयावर, स्वत:च्या अनुभवाच्या आधारे व्याख्यानं देत असते. तसंच ‘युद्धपरिस्थितीचे लहान मुलांवर होणारे परिणाम’ याविषयी जनजागृती करण्याचा तिचा मानस आहे. एवढंच नव्हे तर तरुणांना शांततारक्षणाच्या दृष्टीनं शिक्षण द्यायचाही तिचा विचार आहे.
आयुष्य उद्ध्वस्त झालं, अपंगत्व आलं, म्हणून खचून न जाता योग्यवेळी मिळालेल्या मदतीच्या हातामुळे, राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखं आपलं आयुष्य सावरणाऱ्या जिद्दी मारिआतुची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link