Next
निष्ठावान विदुषी
पल्लवी मुजुमदार
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story


आपल्या देशातल्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या सक्रिय कार्यकर्त्या , SNDT महिला विद्यापीठातील निवृत्त डीन ऑफ सोशल सायन्सेस व राज्यशास्त्र विभाग प्रमुख, देशभक्तीच्या विचाराने कार्यरत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील अनेक चळवळींमधले लढवय्ये नेतृत्व अशी विविधांगी भूमिका निभावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. रोहिणीताई गवाणकर. आज त्यांनी नव्वदी पार केली आहे. मात्र उत्साह आहे युवकांना लाजवेल असा! त्यांच्याशी गप्पा मारताना निखळ हास्याचा कारंजा अनुभवावा!
  रोहिणीताईंचे मामा वकील बाळकृष्ण तेंडोलकर कोल्हापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीला उभे होते, तेव्हा चुणचुणीत लहानग्या बेबीला जबाबदारी देण्यात आली, महिलांना एकत्र करून सभेला आणण्याची!  ती तर तिने फत्ते केलीच, शिवाय ‘आजचा खेळ संपला’ अशी सभा संपल्याची उद्घोषणा खणखणीत आवाजात केली. घरातल्या या चिमुरडीच्या ‘नेतृत्वशाली’ व्यक्तिमत्त्वाची चुणूक घरच्यांना मिळाली.
कोल्हापुरात व्यावसायिक वडील आणि पुरोगामी विचारांच्या आईच्या संस्कारांची बीजे गिरवत पाच बंधू आणि दोन भगिनी अशा ऐसपैस कुटुंबात लहानपणीचा सुखाचा काळ रोहिणीताई अनुभवत होत्या. मात्र अचानक चक्रे फिरली. व्यावसायिक नुकसानीच्या नैराश्याने वडिलांनी घर सोडले. कणखर आई नावाप्रमाणेच ‘दुर्गा’ होती. सगळ्या मुलांसह त्यांनी मुंबई गाठली. घराजवळच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी लहानग्या रोहिणीने स्वतःहून हट्ट केला. कर्मठ विचारांच्या आजोळी त्यांचे बालपण फार शिस्तीत गेले. उपवास-अध्यात्म यांचे अवडंबर ना कधी त्यांच्या आईने केले, ना कधी मुलांवर लादू दिले. काव्य-गायन, वक्तृत्व याबरोबरीने बेबी अभ्यास, खेळ यांतही अव्वल होती. त्यावेळी निघणाऱ्या देशभक्तीपर चळवळी, मोर्चातही ती आईचा डोळा चुकवून, प्रसंगी बोलणी ऐकून हिरिरीने सामील होई.
सेवादलातल्या दिग्गजांचे संस्कार रोहिणीताईंवर रुजत होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळीने भारलेले ते दिवस होते. शाळा मॅट्रिकनंतर थांबली होती. घरच्या मंडळीच्या मागे आग्रह करूनही पुढचे महाविद्यालयीन शिक्षण काही सुरू होत नव्हते. मग भूमिगत देशभक्तांच्या चिठ्ठ्या पोचवण्याच्या कामाने जोर धरला. तिथेच एका टप्प्यावर देखणे हेमचंद्र सहकारी म्हणून भेटले आणि पुढे रोहिणीताईंचे ते सहचरही झाले. त्या काळी चळवळीतल्या भारलेल्या या जोडीचा विवाहही पक्षाच्या पध्दतीने अंगठा कापून रक्ताने परस्परांशी वचनबद्ध होत झाला. या विवाहात रोहिणीताईंच्या आईने लेकीच्या मनाला जाणून ठामपणे पाठिंबा दिला. आईचा तो पाठिंबा रोहिणीताईंना आजही मोलाचा वाटतो. गंमत म्हणजे, चळवळीच्या या दोन धडाडीच्या कार्यकर्त्यांचे लग्न त्यावेळी गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. नंतर सेवादलाच्या साक्षीने पुन्हा एकदा खादीच्या कपड्यातले वधू-वर उपस्थितांच्या हौसेसाठी वचनबद्ध झाले आणि मग सर्वांना पेढे वाटले गेले. मंगळसूत्रासाठी हेमचंद्र यांनी त्यांच्या आईने दिलेले पैसे त्यांच्या मित्राच्या मदतीला सहजपणे देऊन टाकले होते. मग तुळशीबागेतल्या नकली मंगळसूत्राने हे नाते बांधले गेले. मात्र ते विचारांनी स्पष्ट, प्रगल्भ होते आणि म्हणूनच अस्सल ठरले.
सासरी नव्या सुनेचे साऱ्यांनाच कौतुक होते. चुलत सासूबाईंनी तर त्यांच्या  हातातल्या सोन्याच्या बांगड्या सुनेच्या हातात प्रेमाने चढवल्या. एकत्र कुटुंबात भरपूर कामाच्या रगाड्यात नोकरी नाही तर मग शिक्षण सुरू करण्याची परवानगी रोहिणीताईंनी हेमचंद्र यांच्याकडून पटकावली. मग काय, जणू स्वर्गच गवसल्याचा आनंद त्यांना झाला. सर्व आघ्याड्या सांभाळून, मोठ्या कष्टाने, स्वाभिमानाने त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली.
एव्हाना लहानग्या अंजलीचेही आगमन झाले होते. आता एम.ए. करण्याची इच्छा होती, पण स्वतःचे आरोग्य, सासर-माहेरच्या जबादाऱ्या, अंजलीचे बालपण हे सर्व जपून पदव्युत्तर शिक्षण घेण्याची ओढ होती. त्यासाठी घरून परवानगी मिळवायला तीन वर्षे लागली. पुढे आपल्या वडिलांची इच्छा म्हणून मैत्रिणीच्या प्रोत्साहनाने त्यांनी बी.टी.ला प्रवेश घेतला. शिकवण्यातला आनंद येथे गवसला. आणि सामाजिक-कौटुंबिक विरोध, कष्ट, मनस्ताप असूनही त्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
हेमचंद्र यांचे म्हणणे होते की स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करत पत्नीने इतके कष्ट घेऊ नयेत. एकमेकांच्या काळजीमुळे घरात वाद नाही तर अबोला सुरू झाला. लहानग्या अंजलीला मध्ये घेत अत्यावश्यक असेल तेवढाच संवाद होत होता. एकदा ‘परीक्षेचा निकाल उद्या आहे, अमुक क्रमांक आहे’ असे रोहिणीताईंनी मुद्दाम लहानग्या अंजलीला सांगितले. भल्या पहाटे स्वत: जाऊन निकाल बघून आलेल्या हेमचंद्र यांनी रोहिणीताईंना अत्यानंदाने पेढा भरवला! ५७ टक्के गुण मिळवत त्या एम.ए. झाल्या होत्या! रोहिणीची हुशारी निर्विवाद आहे, पण कष्टाला सीमा हवी; असे सांगत हेमचंद्र यांनी रोहिणीताईंना स्वतःला जपण्यास सांगितले. आज त्या शुभेच्छांच्या जोरावर आयुष्याची निरोगी वाटचाल सुरू असल्याचे रोहिणीताई आवर्जून नमूद करतात. हेमचंद्र यांचे प्रेम व काळजी समजत होती, मात्र त्यावेळचा त्यांचा अबोला जीवघेणा होता, असे त्या आज अगदी दिलखुलास हसत सांगतात.
पुढे पीएच.डी. करण्याचे मनात घोळू लागले. ‘महाराष्ट्रीय स्त्रियांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणीबाणीपर्यंत राजकारणात घेतलेला सहभाग’ या विषयाची नोंदणी योगायोगाने आणीबाणीच्या दिवशी झाली. संशोधन सुरू झाले. अभ्यास सुरू होता, पण या गहन विषयाला गाईड मिळेना. त्या प्रक्रियेत एक दीड वर्ष वायाही गेले. १९८२ साली एसएनडीटी विद्यापीठातून स्त्री-अभ्यासात डॉक्टरेट प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या
संशोधक ठरल्या!
रोहिणीताईंनी  कधीच कष्टात कसूर केली नव्हती, आता सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नियतीने साथ देण्याचे ठरवले. शैक्षणिक क्षेत्रात विविध पदांवर काम करण्याची संधी त्यांच्याकडे चालून येऊ लागली. शिक्षिका, लेक्चरर होण्याची इच्छा एव्हाना पूर्ण झालीच होती. एसएनडीटी विद्यापीठात त्यांनी इतिहास विषय शिकवला, राज्यशास्त्र विषयाचा स्वतंत्र विभाग सुरू केला. डॉक्टरेट मिळाल्यावर ‘विभागप्रमुख’ म्हणूनही संधी आली. स्त्री-अभ्यासाची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद त्यांनी विद्यापीठात घेतली. या वेळी ‘इंडियन असोसिएशन ऑफ विमेन स्टडीज’ या संस्थेच्या स्थापनेचा निर्णय झाला. रोहिणीताई त्याच्या पहिल्या सदस्य आहेत. त्याची पहिली परिषद भारतात झाली. आज त्या संस्थेची सदस्यसंख्या अडीच हजारांहून अधिक आहे. स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता या विषयावर विश्वास ही सभासदत्वाची अट आहे. या संस्थेच्या निवडणुकीत त्या निवडून आल्या. ‘महाराष्ट्र पॉलिटिकल सायन्स असोसिएशन’च्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. देशातल्या महिलांसाठी परिषदा, कार्यशाळा आयोजित केल्या. अनेकविध प्रश्नांवर महिलांना संघटित करण्याची मोलाची कामगिरी त्यांनी बजावली.
‘महाराष्ट्र स्त्री अभ्यास व्यासपीठ- मुंबई’च्या त्या पहिल्या संस्थापक अध्यक्ष ठरल्या. या मंडळात त्यांनी विविध पदांवर १२ वर्षे काम पाहिले.
रोहिणीताईंच्या मार्गदर्शनाखाली एका समितीने महिलांविषयक कल्याणकारी योजना आखून त्याचा मसुदा तत्कालीन मुख्यमंत्रीमहोदयांना सादर केला. त्यातूनच पुढे महिलांना सरकारी यंत्रणेत ३३ टक्के आरक्षण देण्याचे ठरले. ग्रामीण भागातल्या महिलांना पंचायत स्तरावर स्थान मिळावे म्हणून त्या प्रयत्नशील राहिल्या. त्याअंतर्गत जवळपास पाच हजार महिला सरपंचांना विविध संस्थांमार्फत प्रबोधन केले.  स्थानिक स्वराज्यसंस्थांवर स्त्रियांचे प्रतिनिधित्व असावे, यातही आवड आणि क्षमता असलेल्या महिलांना संधी मिळावी याबाबत त्यांचा आग्रह होता. त्या विचारांनी, ‘पंचायत राज्य लोकआंदोलन’ या चळवळीअंतर्गत त्यांनी गावोगावी कार्यशाळा घेतल्या. आदिवासी भागातही महिला पुढे याव्यात यासाठी स्थानिक भाषा समजून मार्गदर्शन करण्यासाठी त्या संयोजकांना सांगत. त्यावेळच्या प्रयत्नांची परिणती म्हणजे, आज त्या विभागातल्या महिला हिरिरीने पुढे येत असल्याचे त्या सांगतात.  
कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या विशाखा समितीचा ढाचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आला. त्यातही समितीच्या कामासाठी त्यांनी गावोगावी जाऊन तिथल्या महाविद्यालयांना भेटी देऊन परिस्थिती समजून घेण्याचा आग्रह धरला.
अनेक समित्यांवर त्यांनी मोलाची भूमिका निभावली. अनेकविध विषय आणि त्यांच्या विविध समित्यांवर त्यांच्या भूमिका यांच्यावर एक पुस्तक होईल अशी लांबलचक यादी व अनुभवांची मोठी पोतडी रोहिणीताईंकडे आहे. आपली भूमिका चोख बजावताना स्त्री-पुरुष कोणावरही कधीही अन्याय होऊ नये, म्हणून त्या प्रयत्नशील राहिल्या. त्या समतोल विचारांनी प्रकरणे हाताळतात असा त्यांचा लौकिक आजही कायम आहे.
कॅप्टन लक्ष्मी, पाणीवाली बाई, राजकारणातल्या महिला, मराठी स्त्रीशक्ती, आझाद हिंद सेना, स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचे योगदान,  ग्रामीण स्त्रीनेतृत्व, मणीभवनच्या आठवणी, पंचायत समितीतल्या महिला सदस्यांना मार्गदर्शन अशा एक ना अनेक विषयांवर त्यांची अभ्यासपूर्ण पुस्तके आहेत. बरोबरीने तितक्याच पुस्तिकाही आहेत. शिवाय, हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झाली आहेत.  संशोधनपर लेख, मुलाखती यांची तर गणनाच नाही.
रोहिणीताईंनी पुस्तके लिहिताना व संदर्भ मिळवताना देश-परदेशवाऱ्या केल्या, मेहनतीने पत्रव्यवहार केले. आजही त्यांची लेखणी चालू आहे. आकाशवाणी,  दूरचित्रवाणीवर, विविध मंचावर भाषण देताना त्या रंजक संदर्भ व माहिती आजही देतात.
मुंबईमध्ये अनेक वर्षे घालवल्यावर सध्या त्या पुण्यात ‘अथश्री’मध्ये राहत आहेत. अनेक पुरस्कारांनी, अनेक मंचानी रोहिणीताईंच्या कार्याची दखल घेतली आहे. अतिशय साधी, शाश्वत जीवनमूल्यांना चिकटून असलेली जीवनशैली त्यांनी कायम जोपासली आहे. मनाने संवेदनशील, हळव्या, माणूसपण जपणाऱ्या, श्रेय न घेणाऱ्या, निष्ठेने कार्य करणाऱ्य विदुषी डॉ. रोहिणीताई गवाणकर अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link